कथा: रमेश तांबे
सकाळचे दहा वाजले होते. अंगात मळकट कपडे, पायात तुटक्या चपला आणि हातात शेवरीचीस पातळ काठी घेऊन चंदू रानात निघाला होता. आपल्या पंधरा-वीस बकऱ्या घेऊन! पण त्याच वेळी त्याचा सावत्र भाऊ दिनेश हा मात्र शाळेत निघाला होता. दिनेशकडे कुतूहलाने बघणाऱ्या चंदूवर त्याची आई खेकसली, “अरे नुसता उभा काय राहिलास ठोंब्यासारखा. चल जा लवकर रानात आणि संध्याकाळशिवाय परत येऊ नकोस.” आई ओरडल्याचं चंदूला वाईट वाटलं नाही. कारण तसा ओरडा नेहमीच त्याच्या वाट्याला यायचा. त्यापेक्षाही आपल्याला शाळेत जायला मिळत नाही याचे त्याला खूप वाईट वाटत होते.
चंदूने सगळ्या बकऱ्या रानाच्या दिशेने हाकारल्या आणि तो शांतपणे निघाला. रानात जाऊन आपल्या नेहमीच्या भल्यामोठ्या झाडाखाली जाऊन बसला. आज त्याचे कशातही मन लागत नव्हते. त्या ठिकाणी त्याचे सात-आठ मित्रदेखील आपली गाई-गुरे घेऊन रानात आली होती. नेहमी आनंदात असणारा चंदू आज गप्प गप्प का? म्हणून सारेजण चंदूभोवती जमा झाले होते. शेवटी चंदू म्हणाला, “अरे मित्रांनो आजपासून शाळा सुरू झाली. सगळी मुले शाळेत चालली आहेत आणि आपण मात्र इथे रानात गाई-गुरांच्या मागे! आपल्यालाही शाळेत जायला मिळालं पाहिजे.” त्याचं ते बोलणं ऐकून काही मुलं हसली, तर काही विचारात पडली.
तेवढ्यात एक पोरगा म्हणाला, “अरे तिकडे बघा कोणीतरी येतंय.” तशा साऱ्यांनी माना वळवल्या. कुणीतरी एक मुलगा आणि त्याच्यासोबत एक सायकल हातात धरलेला मोठा माणूस त्यांच्याच दिशेने येत होते. ते स्पष्ट दिसू लागताच चंदू ओरडला, “अरे हा तर दिनेश!” आणि हा शाळा सोडून इकडे काय करतोय? या सायकलवाल्या माणसाला त्याने का आणलाय? आता चंदू मनातून घाबरलाच. कारण दिनेश जरी त्याचा भाऊ असला तरी तो सावत्र भाऊ होता. सावत्र आईची आठवण येताच त्याच्या मनातून भीतीची एक लहर उमटली.
त्यांंच्या जवळ येताच दिनेश बोलू लागला, “माझ्या प्रिय मित्रांनो, आजपासून शाळा सुरू झाली. माझ्यासारखे काही भाग्यवान आहेत की त्यांना शाळेत जायला मिळतं. पण तुम्हा सर्वांना इच्छा असूनही शाळेत न जाता इथे रानात यावं लागतं. गाई-म्हशींच्या मागे फिरावे लागतं आणि हा चंदू तर माझा भाऊच! त्याला शाळा, पुस्तकं खूप आवडतात. पण घरच्या परिस्थितीमुळे त्याला काही करता येत नाही.” तो बोलत असताना चंदूच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. आपला सावत्र भाऊ आपल्या शिक्षणाचा एवढा विचार करतो हे पाहून त्याला अगदी गहिवरून आलं आणि तो ओक्साबोक्शी रडू लागला. तसा दिनेश त्याच्याजवळ गेला पाठीवरून हात फिरवत म्हणाला, “मित्रांनो आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण तुम्ही पण शाळेत जायचं. तुम्ही पण पुस्तकं वाचायची, अभ्यास करायचा. हे पाहा माझ्यासोबत आमच्या शाळेतले शिक्षक इथं आले आहेत. ते रोज इथेच तुमची शाळा भरवणार आहेत. तुमच्यासाठी त्यांनी वह्या, पुस्तके आणली आहेत.” हे ऐकून सारे मुले अवाक होऊन दिनेशकडे बघत राहिली.
मग सर पुढे आले आणि म्हणाले, “मी भागवत सर. मी रोज झाडाखाली शाळा भरवणार. तुम्ही सारे तयार आहात ना!” सारी मुले आनंंदाने हो म्हणाली. मग दिनेशने ती पेटी उघडली. पेटी वह्या-पुस्तके, पेन-पेन्सिली, रंगांच्या खडूने भरून गेली होती. सारी मुले आनंदली. त्यावेळी मात्र चंदूच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वहात होते. त्याने दिनेशला धावत जाऊन मिठी मारली. तसा दिनेश म्हणाला, “चंंदू , मी आहे ना तुझ्यासोबत. तूसुद्धा शिकला पाहिजे म्हणून तर मी ही शाळा सुरू करतोय!”