Tuesday, March 25, 2025
Homeसाप्ताहिककोलाजलष्करच्या भाकऱ्या

लष्करच्या भाकऱ्या

प्रतिभारंग: प्रा. प्रतिभा सराफ

सोशल मीडियामधून म्हणजेच यूट्यूब, फेसबुक आणि व्हॉट्सॲपवरून आपल्याला सातत्याने जाहिराती येत असतात. प्रत्येक जाहिरातीचा आपल्याला उपयोग असतोच असे नाही; परंतु आपल्या जवळच्या कुणाला तरी त्याचा उपयोग होतो तेव्हा ती जाहिरात आपण त्या व्यक्तीकडे आवर्जून पाठवतो. आजच्या भाषेत गमतीने मी त्याला ‘सोशल वर्क’ असं म्हणते.मध्यंतरी ‘पुस्तकासाठीचे पुरस्कार’ या बातम्या वाचून मी ज्याचे या वर्षकाळात पुस्तक आलेले आहे त्याला ती बातमी पाठवायला सुरुवात केली, तर एका साहित्यिकाचे उत्तर आले, “तुम्ही बातमी दुसऱ्यांदा पाठवली आहे.” याचा अर्थ त्यामागे अजून एक वाक्य होते- “काय वैताग आहे”, जे त्यांनी लिहिले नव्हते पण मला वाचता आले.

दुसऱ्या साहित्यिकाने “१०००/- रुपयांच्या पारितोषिकासाठी म्हणजे प्रवास खर्च, निवास, भोजन हा खर्च मुळात जास्त होणार आहे.” असे कळवले. म्हणजे एक वाक्य जे त्यांनी लिहिले नव्हते ते असे- “बातमी पाठवताना या सर्व बाबींचा विचार करायला हवा होता.” अजून एका साहित्यिकाने ही तर बातमी ‘अक्षर साधना’ या फेसबुक पेजवर आली होती जेथे आपण दोघेही सदस्य आहोत त्यामुळे मीही वाचलीय, असा एसएमएस पाठवला. यामागे अजून एक वाक्य होते जे त्यांनी लिहिले नाही आणि मी वाचले- “तुम्ही सांगायची काय गरज आहे… मलाही वाचता येते की!”आता हे गृहस्थ साडेतीन हजार सदस्य असलेल्या फेसबुक ग्रुपवर आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी ती बातमी शंभर टक्के वाचली, हे आपण लक्षात घ्यायला हवे होते नाही का? या सगळ्या गोष्टींचा अर्थ असा आहे की आपल्याला कधी कधी कळतच नाही की कोणाला, कशी मदत करावी, का मदत करावी, केव्हा मदत करावी मदत करावी की न करावी?

आता किती साधी गोष्ट आहे की, आपले पुस्तक प्रकाशित झालेले आहे आणि त्याच्या पुरस्कारासंबंधी कोणीतरी निवेदन पाठवले आहे, तर आपल्याला पुस्तक पाठवायचे किंवा नाही ते फक्त ठरवायचे आहे. त्यासाठी परत दुसरा एसएमएस करून कशासाठी समोरच्या माणसाला दुखवायचे? हा माणूस आपल्याला मदत करतोय, आपल्यासाठी काहीतरी करू इच्छितोय, केवळ जवळचा आहे म्हणून त्यालाही वाटतंय की आपल्या पुस्तकांना पुरस्कार मिळावा… हे का त्यांच्या लक्षात येऊ नये? कोणतीही गोष्ट वाईट अर्थाने घ्यायची किंवा समोरचा माणूस बावळट आहे हे दाखवून द्यायचे किंवा आम्ही तुमच्यापेक्षा सुज्ञ आणि फॉरवर्ड आहोत किंवा आलतू-फालतू पुरस्कारांची आम्हाला गरज नाही अशा ठिकाणी आम्ही पुस्तके पाठवत नाही, हे दाखवून देऊन कमीपणा द्यायचा? ‘लष्करच्या भाकऱ्या भाजणे’, मी आता थांबवावे असे मला वाटतेय, बघू जमतेय का? अनुभवामुळे माणूस शिकत जातो, असेही नाही. परत परत त्याच त्याच चुका करून ठेचकळून घ्यायची माणसाला कधी कधी सवयच होऊन जाते. मला इथे आणखी एक गोष्ट सांगायची आहे. उगाचच ‘गुड मॉर्निंग’, ‘गुड नाईट’, “जेवण झाले का?”, असे मेसेज पाठवायचे.

दिवसभरातून दहा-दहा व्हीडिओ पाठवायचे आणि समोरच्या माणसाला त्रास द्यायचा. अशामध्ये होते काय की, त्या व्यक्तीला आपल्याला काही अतिमहत्त्वाचे सांगायचे असते, तेव्हा त्याचा मेसेज हा आपल्याकडून निश्चितपणे पाहिला जात नाही किंवा त्याला महत्त्व दिले जात नाही आणि ते संपूर्ण चॅट आपण रात्री झोपताना अर्ध झोपेत डीलिटतही मारून टाकतो. त्यामुळे लोकांनी हे जाणून घेतले पाहिजे की कमीत कमी मेसेजेस समोरच्या माणसाला पाठवले पाहिजेत, जे अति महत्त्वाचे आहेत!हे तर व्हॉट्सॲपवरील साध्या वैयक्तिक चॅटबद्दलची मी माहिती दिली. ग्रुपवर तर एखादा कार्यक्रम झाल्यावर लोकं २५-३० फोटो धडाधड टाकून देतात. प्रत्येकाला आपले कौतुक असते.. नाही असे नाही शिवाय आपण ‘काय केले’, हे दुसऱ्यांना जाणवून द्यायचे असते, याबद्दलही माझी तक्रार नाही पण त्यासाठी एक-दोन फोटोसुद्धा पुरेसे असतात.

आज २५-३० फोटो जर आपण डाऊनलोड केले, तर आपला कितीतरी मोबाइलचा मोठ्या प्रमाणात डेटा त्यात वापरला जातो मग अशा वेळेस ते फोटो पाहून आपण डाऊनलोड करतच नाही. साहित्यिक ग्रुपवर राजकीय बातम्या टाकणे किंवा फॅमिली ग्रुपवर आपल्या बाहेरच्या ग्रुपच्या बातम्या फोटो किंवा व्हीडिओ टाकणे याचा त्रास संपूर्ण ग्रुपला होतो. साहित्यिक ग्रुपवर साहित्यिक बातम्या तर फॅमिली ग्रुपवर फक्त कौटुंबिक बातम्या, फोटो, व्हीडिओ अपेक्षित असतात, हे आपल्या जवळच्या नातेवाइकांनाही आपण सांगू शकत नाही याचा त्रास सगळ्यांनाच होतो. असे लेख लिहून काही सुधारणा होणार नाहीत; परंतु लोक कमीत कमी या विषयावर विचार तरी करू लागतील. ,कोणतीही गोष्ट फॉरवर्ड करताना किंवा ताबडतोबीने समोरच्याला दुखावले जाईल, असा मेसेज टाकताना क्षणभर थांबून आपला मनातला विचार मनातच ठेवतील, तर कितीतरी पट आनंद समोरच्याला देऊ शकतील. विचार करा!

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -