Tuesday, July 16, 2024
Homeसाप्ताहिककोलाजलाख चुका असतील केल्या...

लाख चुका असतील केल्या…

नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे

कविवर्य मंगेश पाडगावकरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे उर्दूत ज्या दर्जाच्या रोमँटिक कविता लिहिल्या जात असत तितक्याच तरल कविता त्यांनी मराठीत लिहिल्या. त्यांच्या कविता एका वेगळ्याच उमदेपणाने लिहिलेल्या असत आणि त्या जेव्हा ते त्यांच्या विलक्षण शैलीत सादर करत तेव्हा रसिकही ‘क्या बात हैं’ अशी उत्स्फूर्त दाद देत. मराठीतील या नव्या प्रवाहामुळे साठीच्या आणि सत्तरीच्या दशकांत, जसे उर्दूभाषिक लोक मुशायऱ्यांना गर्दी करतात तसे, रसिक मराठी कविता वाचनाच्या कार्यक्रमांनाही आवर्जून हजेरी लावू लागले! मात्र त्यांनी कवितेला लोकप्रिय करताना कोणतीही तडजोड केली नाही. मराठीचे शब्दसौंदर्य, संकल्पनांची समृद्धी काळजीपूर्वक जपत, तिचा आगळा पिंड सांभाळत पाडगावकर आणि त्यांच्या कवीमित्रांनी मराठीला ग्रंथालयातून बाहेर काढून रंगमंचावर नेले. मराठीला लोकाभिमुख, करण्याचे सन्मानपूर्वक सभास्थानी नेण्याचे श्रेय पाडगावकर, वसंत बापट आणि विंदा करंदीकर यांनाच जाते.

पाडगावकरांना सर्वसामान्य माणसाच्या मनाचा अचूक वेध घेऊन त्याच्या भावना जणू अंतर्ज्ञानाने जाणून घेणे अवगत होते. यौवनातील उत्कट स्वाभाविक आकर्षण, अल्लड प्रेम आणि त्याच्या वाटचालीत येणारे वेगवेगळे टप्पे, चढउतार त्यांनी इतक्या चित्रमय पद्धतीने टिपले आहेत की ज्याचे नाव ते! अव्यक्त प्रेमाच्या कोंडीपासून सुरू झालेला एकतर्फी प्रेमाचा प्रवास ज्या ज्या वळणावरून जातो, खरे तर त्या काळात जात असे, त्या प्रत्येक टप्प्यावर पाडगावकर आपल्या बरोबर असतात. सफल झालेल्या प्रेमाचा उत्सव साजरा करण्याऱ्या प्रेमिकांबरोबर जसे ते आनंद साजरा करताना दिसतात तसेच ते प्रेमकथेच्या शोकांतिकेत प्रेमिकांचे सर्वात जवळचे सुहृद बनूनही उभे असतात. अनेकदा प्रेमाची कथा सुरू होता होता संपून जाते. आयुष्यभराच्या सोबतीच्या आणाभाका घेणाऱ्यांनाच एकमेकांना साश्रुनयनांनी निरोप द्यावा लागतो. जिथे जन्मोजन्मी एकत्र राहायची वचने दिली तिथेच कायमच्या निरोपाची, पुन्हा कधीही न भेटण्याची भाषा येते. त्यावेळी दोष तुझा की माझा हे महत्त्वाचे राहत नाही. जसे एका उर्दू कवीने म्हटले आहे-
“गम तो इस बातका हैं की वो
अहदे वफा टूट गया.
बेवफा कोई भी हो, तुम ना सही,
हमही सही.”

कधी नकळत झालेला गैरसमज हाच खलनायक ठरतो, तर कधी परिस्थिती एकाला अगतिक बनवून टाकते आणि वियोग, कायमचा निरोप अटळ होतो. पण त्यामुळे होणाऱ्या जखमांचे व्रण कधीच भरून येत नाहीत. ते तसेच आयुष्यभर अंगावर, मनावर वागवावे लागतात. असाच एक प्रसंग डोळ्यांसमोर ठेवून पाडगावकरांनी प्रियकराची तडफड एका भावगीतात उतरवली होती. त्या नितांत सुंदर आणि कोणत्याही संवेदनशील मनाला आजही अस्वस्थ करून सोडणाऱ्या गाण्याला संगीत दिले होते यशवंत देव यांनी. मुळातच काहीसा पातळ, हळवा स्वर लाभलेल्या अरुण दातेंनी गाण्यातील उदास भाव अजूनच जीवघेणा करून टाकला होता. मंगेश पाडगावकरांचे ते प्रत्येक प्रेमिकाला प्रिय असणारे शब्द होते-
अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती.

कवी अनेकदा जाताजाताही सर्वांना जाणवलेले पण कुणीच न बोललेले कटुसत्य सांगून जातात. अनेक प्रेमाची कथा सुरू होण्याआधीच संपून जाते. त्यावेळी मनापासून प्रेम करणाऱ्या दोन डोळ्यांत फक्त अश्रूचे काही थेंब हाच एक पुरावा त्यांनी सोडलेला असतो. पाडगावकर हे सांगताना संगममधील ‘हर दिल जो प्यार करेगा वो गाना गायेगा’ या शैलेंद्रच्या मनस्वी गाण्यासारखी एक ओळ लिहून जातात. ते म्हणतात ज्यांना प्रेमातील अपयशाच्या दु:खाने आतून जखमी केले असते तेच गाणी गातात.
इथे सुरू होण्याआधी, संपते कहाणी..
साक्षीला केवळ उरते, डोळ्यांतील पाणी.
जखम उरी होते ज्यांच्या, तेच गीत गाती..
लाख चुका असतील केल्या,
केली पण प्रीती…

पण कधी प्रेमात यशही मिळते. त्यावेळी त्या दोघांना काही काळच का असेना पण जगण्याच्या खरा, समृद्ध अनुभव येऊन गेलेला असतो. सगळे बंध तोडून नदीचा प्रवाह खाचखळग्यातून, डोंगर-पहाडातून जेव्हा वाट काढत बेफाट सुटतो तेव्हाची त्याची धुंदी हेच तर खरे जगणे! पुढे काय होईल, सागराशी मीलन होईल की रस्त्यातच जीवन संपून जाईल, हे त्या नदीला माहीत नसते. पण ती सागराच्या प्रीतीच्या आकर्षणाने भान विसरून धावत सुटलेली असते. प्रेमिकांचे नव्हाळीचे प्रेम तसेच असते. त्या बेधुंद अवस्थेलाच पाडगावकर भूमी आणि आकाशाचे मीलन म्हणतात. कारण सगळी जाणीव शोषून घेणारा, स्वत:च्या चेतनेचे अस्तित्व एकाच वेळी जाणवून देणारा आणि विसरायलाही लावणारा दुसरा अनुभव नसतो-
सर्व बंध तोडूनी जेव्हा नदी धुंद धावे,
मीलन वा मरण पुढे, हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती
लाख चुका असतील केल्या…

मात्र जेव्हा प्रीतीची कथा सफल होते आहे असे वाटतानाच वियोग होतो. ताटातूट होते. तेव्हा वाटते हे प्रीतीचे फूल काही खरे नाही! दुरून इतके मोहक वाटत असले तरी त्याच्यापर्यंत पोहोचण्याची वाट काटेरीच आहे! जीवाची कायमची घालमेल आणि शेवटी निराशाच! तरीही प्रेमाचे वेड असे असते की आशा सुटत नाही. कसेही करून जीवलगाची पुनर्भेट व्हावी म्हणून झुरणारे मन आतल्या वाळवंटात वणवण भटकतच राहते-
गंध दूर ज्याचा, आणिक जवळ मात्र काटे,
असे फूल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे.
तरी गंध धुंडीत धावे जीव तुझ्यासाठी,
लाख चुका असतील केल्या…

आता कथा संपली आहे! त्या प्रेमिकांची कायमची ताटातूट झाली आहे. तरी आठवणी कशा संपणार? अशा वेळी व्यथित प्रियकर आपली कैफियत मांडतो आहे- ‘जर तुला कधी ते प्रेमाचे चार क्षण आठवले, तुझ्याही मनात माझी आठवण तरळली तर प्रिये एकच कर. क्षणभर ते आपल्या वाट्याला आलेले सुखाचे काही क्षण आठवून तुझे मन आनंदाने फुलू दे. माझ्या आठवणीने तुझे डोळे क्षणभर जरी चमकले तरी मी तेच आपल्या प्रेमाचे सार्थक मानेन. शेवटी जरी तुला वाटत असेल की चुका फक्त माझ्याच झाल्या तरी हे मनात असू दे की मी तुझ्यावर एकदा मनापासून प्रेम केले होते! बस्स! किती निर्मळ निरोप. किती भाबडी आशा. किती प्रांजळ मन!
आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी,
गुज अंतरीचे कथिले तुला ह्या स्वरांनी.
डोळ्यांतून माझ्यासाठी लाव दोन ज्योती,
लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती…
ही मनाला दिवस दिवस घेरून टाकणारी शब्दातली आर्तता, सुरातली गंभीरता,
आता कुठे शोधायची?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -