पुस्तक परीक्षण: डॉ. राहुल वेलदोडे
हजारो वर्षांची परंपरा व संस्कृती लाभलेल्या आपल्या भारतभूमीवरील अज्ञात कलावंतांची चित्रं व शिल्पांचा खजिना जगविख्यात आहे. कला-इतिहासात डोकावताना वर्तमानातील नामांकितांप्रमाणे अज्ञात कलावंतांवर प्रकाशाची ज्योत टाकण्याचे कठीण कार्य डॉ. गजानन सीताराम शेपाळ लिखित ‘रंगसभा’च्या माध्यमातून समोर आले. तसं पाहिले तर मागील दशकात काही कलाभ्यासकांनी लिहिलेली नामांकित कलावंतांवरील पुस्तके बाजारपेठेत उपलब्ध आहेत. त्या श्रेणीत ‘रंगसभा’ या मनमोहक पुस्तकाने आपले आगळे-वेगळे स्थान महाराष्ट्राच्या मा. राज्यपाल महोदयांच्या शुभ हस्ते प्रकाशित झाल्याबरोबर अधोरेखित करून घेतले. या ग्रंथामधील प्रत्येक लेख कला साधकांशी प्रत्यक्ष हितगुज साधून अलंकारिक केलेला असल्यामुळे वाचकाला खिळवून ठेवतो. प्रस्तावनेपासून सुरू होणारी त्यातील भाव-भावनांचे श्रेणीक्रम कलारसिकांना तृप्त करून जातात.
लेखकाबद्दल सांगायचे झाल्यास डॉ. गजानन शेपाळ हे मुंबईस्थित सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालयातील ज्येष्ठ व विद्यार्थीप्रिय अध्यापक असून, लिखाणाच्या व्यासंगामुळे त्यांनी पत्रकारितेचा पदवी अभ्यासक्रमही पूर्ण केलेला आहे. अनेक विद्यापीठांची अभ्यास मंडळे व कला संचालनालयाच्या विविध समित्यांवरील महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पेलल्यामुळे त्यांच्या पाठीशी अनुभवाची मोठी शिदोरी आहे. डॉ. शेपाळांना विद्यार्थीदशेपासून भटकंती व प्रवासाची आवड असल्याने, स्थळांचा उल्लेख येताच ठिकाणांच्या वर्णनामध्ये ऐतिहासिक तपशील गोष्टींसारखा सहज प्रकट होऊन जातो. वेगवेगळ्या विषयांवर लिहिणे हे खूपदा सहज शक्य असते. मात्र एकाच विषयावर हजारो लेख लिहिणे ही बाब अद्भुत तर आहेच शिवाय लेखकाच्या शब्दप्रभुत्वाची साक्ष पटवून देणारी आहे.
पाच लेख लिहिले की, लिखाणात तोच-तोपणा येणं, तीच-तीच वाक्यं वारंवार येणं किंवा वैविध्यतेची कमतरता सुरू होते. डॉ. गजानन शेपाळ यांच्या मनोगतात उल्लेख आहे त्याप्रमाणे २८००च्या वर, संख्येने लेख लिहिणारे ज्यापैकी १०० निवडक लेखांचा ‘रंगसभा’ या ग्रंथातील प्रत्येक लेख हा नावीन्यपूर्ण तर आहेच, पण त्याहूनही अधिक, रसग्रहणात्मक अभ्यास केलेला आहे. कुठलीही वाक्ये वारंवार आलेली नाहीत. प्रत्येक लेखाला स्वतःचे स्वतंत्र स्थान असल्याचे ध्यानात येते. आधुनिक जगात आपण वावरताना क्वचित अपवाद वगळता आपण पाहतो की, कुणीही इतरांच्या चांगल्या कामाचे स्वतः होऊन कौतुक करीत नाही. डॉ. गजानन शेपाळ यांनी अनेक दृश्य कलाकारांच्या कलाशैलीवर लिहिताना कुठेही शब्दसंकोच केलेला नाही. अचूक व शब्दांत कलाकृतीवर लिहिताना त्या त्या कलाकाराचा वैयक्तिक स्वभाव आणि त्याची शैली यांच्यामध्ये गल्लत होऊ दिलेली नाही, हे आवर्जून सांगितले पाहिजे.
कलेची मूलतत्त्वे बदलत नसल्याने दृष्यकला शिक्षण हे पारंपरिकच राहिलं पण जोड प्रगत तंत्रज्ञानाची लाभत असल्यामुळे बाजारपेठेची व्यूहरचना सातत्याने बदलते. आजचा कलावंत जागतिकीरणाचे आव्हान समर्थपणे पेलत कौतुकास्पद वाटचाल करत आहे. अशा उदयमुखांची यशोगाथा प्रस्थापितांप्रमाणे भक्कमपणे मांडण्याचे कौशल्य कलाबाह्य संकलकर्त्यांमध्ये जाणवत नसल्याची खंत कला समीक्षकांत होत असे, तशी आताही होत असते. हीच पोकळी मागील तीन दशकांपासून डॉ. गजानन शेपाळ यांनी वर्तमानपत्रासाठी सुरू केलेल्या लेखमालाने भरून काढली. ते स्वतः कलावंतांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचा कलाप्रवासवर अभ्यासपूर्ण शब्दांत लेखाला रंगसाज चढवतात. आतापर्यंत हजारो लेखांची मालिका त्यांच्या पदरी आहे. आकड्यांसाठी लेखमाला नव्हती या वैशिष्ट्यांमुळे प्रत्येक लेख नावीन्यपूर्ण माहितीसह कुतूहल वाढवतो. त्यातील निव्वळ १०० निवडक लेखांना ‘रंगसभा’मध्ये स्थानापन्न होता आले. सदर पुस्तक हे नवोदित कलावंत व कला-विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावणारे ठरणार आहे. कलाक्षेत्रातील शिक्षक प्रशिक्षण वर्गात शिकणारे कला विद्यार्थी आणि इतर कला अभ्यासक्रमांत शिकणाऱ्यांसाठी हा ग्रंथ म्हणजे संदर्भ-कलाकारांची अभ्यासपूर्वक माहिती देणारा ‘कोश’ ठरेल. शब्द व रंगांचा सुरेख संगम साधणारे डॉ. गजानन सीताराम शेपाळ यांचे उर्वरित लेख भविष्यात ‘रंगसभा’च्या येणाऱ्या खंडात प्रकाशित होऊन, हा अनोखा झरा कलासागराकडे सातत्याने मार्गक्रमण करत राहिलं असं चिन्ह आजमितीला क्षितिजावर दिसत आहेत.
[email protected]
(समीक्षक हे डॉ. डी. वाय. पाटील उपयोजित कला महाविद्यालय, आकुर्डी, पुणे येथे ज्येष्ठ अध्यापक आहेत.)