
मुंबई : नवरात्र उत्सवादरम्यान (Navratri) मुंबई मेट्रो मार्ग २ अ आणि ७ या मेट्रो (Metro) मार्गांवर अतिरिक्त सेवा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी लाखो नागरीक घराबाहेर पडतात. या काळात त्यांना रात्रीच्या वेळी प्रवास करावा लागतो. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुलभ आणि सुरक्षित करण्याच्यादृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार दिनांक १९ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर या कालावधीत मेट्रो मार्ग २ अ च्या अंधेरी पश्चिम आणि मेट्रो मार्ग ७ च्या गुंदवली या स्थानकांवरून शेवटची मेट्रो ही १२:२० वाजता सोडण्यात येणार आहे.
या निर्णयाबाबत मुख्यमंत्री शिंदे, म्हणाले, "मुंबई मेट्रो ही नागरीकांना सुरक्षित आणि आरामदायक सेवा अविरतपणे पुरवीत आहे. उत्सवादरम्यान रात्री घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायक व्हावा यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्याचा फायदा प्रवाशांना नक्कीच होईल आणि या विस्तारित सेवेमुळे मुंबईकरांना नवरात्र उत्सव उत्साहाने साजरा करता येईल."
१९ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीत सुमारे १५ मिनिटांच्या अंतराने एकूण १४ अतिरिक्त सेवांचा समावेश असणार आहे. सध्या मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वर गुंदवली ते अंधेरी पश्चिम दरम्यान सोमवार-शुक्रवार सकाळी ५:५५ ते रात्री १०:३० या कालावधीत सुमारे २५३ इतक्या सेवा या साडेसात ते साडेदहा मिनिटांच्या अंतराने सुरू आहेत. तसेच शनिवारी २३८ आणि रविवार २०५ इतक्या सेवा या ८ ते साडेदहा मिनिटांच्या अंतराने सुरू आहेत.
नवरात्र उत्सवाच्या कालावधीत दिनांक १९ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर, २०२३ दरम्यान नियमित सेवांनंतर १५ मिनिटांच्या अंतराने १४ अतिरिक्त सेवा सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे या अतिरिक्त सेवांच्या कालावधीत मेट्रो मार्ग २अ वरील अंधेरी (पश्चिम) आणि मेट्रो मार्ग ७ वरील गुंदवली या स्थानकावर शेवटची मेट्रो ही रात्री ०१:३० वाजता पोहचेल.
अतिरिक्त सेवांमध्ये कामाच्या दिवशी २६७ सेवा तर सुट्टीच्या दिवशी या सेवा २५२ इतक्या असतील.
या वाढीव सेवांबाबत भाष्य करताना एमएमआरडीए महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से., म्हणाले, "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबईकरांना सुरक्षित आणि आरामदायक मेट्रो सेवा प्रदान करत आहोत. मुंबईकर नागरीक मेट्रोला पसंती दर्शवत असून मेट्रोच्या प्रवासी संख्येत दरमहा सरासरी ५ टक्क्यांची वाढ पाहायला मिळत आहे. नवरात्र उत्सवाच्या काळात आता अतिरिक्त सेवा सुरू करत असल्याने प्रवासी संख्येत नक्कीच वाढ होईल तसेच नागरीकांना या कालावधीत सुरक्षित आणि आरामदायक प्रवास अविरतपणे करता येईल."