भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानचा खेळ खल्लास!
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजयाची हॅटट्रिक
अहमदाबाद : जसप्रित बुमरा, मोहम्मद सिराज यांची नेतृत्व करणारी गोलंदाजी, कुलदीप-जडेजा या फिरकीपटूंचा टिच्चून मारा आणि हार्दिक पंड्याची अप्रतिम साथ या गोलंदाजीतील सर्वच टप्प्यावर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीच्या बळावर फलंदाजांना अनुकूल अशा अहमदाबादच्या खेळपट्टीवर भारताने पाकिस्तानला लोटांगण घालायला प्रवृत्त केले. या पाचही गोलंदाजांनी प्रत्येकी २ विकेट मिळवत मोठ्या विजयात आपले योगदान दिले. एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेतील बहुप्रतिक्षीत अशा हायव्होल्टेज लढतीत शनिवारी भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या भारताने १९२ धावांचे लक्ष्य सहज पार करत विश्वचषकात विजयाची हॅटट्रिक केली.
प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या भारताचा कर्णधार रोहित शर्मा (८६ धावा), श्रेयस अय्यर (नाबाद ५३ धावा) यांनी दमदार खेळी खेळत भारताला विजय मिळवून दिला. माफक लक्ष्य असल्याने भारताला फारसे कष्ट करावे लागले नाहीत. भारताने ३०.३ षटकांत ३ विकेट गमावून विजयी लक्ष्य गाठले.
भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीकरिता पाचारण केले. मोठे फटके मारण्यापेक्षा विकेट वाचवून संयमी खेळीवर पाकने लक्ष दिले. ही चाल ध्यानात आल्यावर सिराजने स्टम्प टू स्टम्प गोलंदाजी करण्यावर भर दिला. त्याच्या सापळ्यात सलामीवीर अब्दुल्ला शफीक अडकला. इमाम उल हकला पंड्याने माघारी धाडत पाकिस्तानच्या सलामीवीरांची जोडी उद्ध्वस्त केली. शफीकला २० आणि हकला ३६ धावा जोडता आल्या. मधल्या फळीतील बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान ही खंदी जोडी मैदानात तळ ठोकून होती. ही जोडी पाकला संकटातून बाहेर काढणार अशी अपेक्षा होती. या जोडगोळीने चिवट खेळ करत तसे संकेत दिले होते. इथे पुन्हा सिराज भारताच्या मदतीला धावून आला. त्याने बाबरचा त्रिफळा उडवून भारताला तिसरी विकेट मिळवून दिली. बाबरने ५० धावांची संघातर्फे सर्वाधिक खेळी खेळली. बाबर बाद झाल्यानंतर संघाला सांभाळण्याची मदार रिझवानच्या खांद्यावर आली. दुसऱ्या बाजूने मात्र कुलदीप यादवने पाकिस्तानवर हल्लाबोल केला. त्याने सौद शकील आणि इफ्तिकार अहमद या फलंदाजांना स्वस्तात बाद करत रिझवानवर दबाव वाढवला. इथे रोहितची बुमराला पुन्हा गोलंदाजीला आणण्याची चाल चांगलीच फळली. बुमराने विलक्षण स्लोवर इनस्विंग टाकत रिझवानचा त्रिफळा उडवला. अवघ्या एका धावाने त्याचे अर्धशतक हुकले. रिझवान बाद झाल्यावर पाकिस्तानची फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली. हसन अली (१२ धावा) वगळता त्यांच्या तळातील एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. पाकिस्तानचा डाव ४२.५ षटकांत १९१ धावांवर आटोपला.
भारताची गोलंदाजी हिट…
पाकिस्तानविरुद्धच्या दबावाच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व दिसले. जसप्रित बुमरा, मोहम्मद सिराज कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या या भारताच्या पाच गोलंदाजांनी प्रत्येकी २ विकेट मिळवल्या. अहमदाबादच्या फलंदाजांना फायदेशीर अशा खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांचीच चलती पहायला मिळाली. भारतीय गोलंदाजांनी विकेट मिळवत धावाही रोखण्यात यश मिळवले.
बाबर-रिझवानची चिवट खेळी
अहमबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या जोडीच्या चिवट फलंदाजीमुळे पाकिस्तानला कसेबसे २०० धावांपर्यंत पोहचता आले. बाबर आझमने भारताच्या गोलंदाजीचा संयमी सामना करत पाकिस्तानची धावसंख्या हलती ठेवली. बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान यांनी अर्धशथकी भागिदारी करत पाकिस्तानचा डाव सावरला. बाबरने ५८ चेंडूंत ५० धावा केल्या. रिझवानने ६९ चेंडूंत ४९ धावा केल्या. मोहम्मद सिराजने बाबर आझमला त्रिफाळाचीत बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. बुमराहने स्लोव्हर इनस्विंगवर रिझवानचा अप्रतिम त्रिफळा उडवला.
दोनशेच्या आत सर्वबाद करण्यात टीम इंडिया सरस
भारताने पाकिस्तानचा पराभव करत विक्रमाला गवसणी घातली. दोनशेच्या आत विरोधी संघाला गुंडाळण्यात टीम इंडियाची आजवर मास्टर राहिली आहे. वर्ल्डकपच्या इतिहासात भारताने आतापर्यंत अशी कामगिरी करताना तब्बल २६ वेळा विरोधी संघाला दोनशेच्या आत गुंडाळण्याची कामगिरी केली. सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत दोन संघांना दोनशेच्या आत गुंडाळण्याचा पराक्रमही टीम इंडियाने आतापर्यंत केला आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra