पारंपरिक क्रीडा महोत्सवाचे डिसेंबरमध्ये आयोजन
मुंबई : देशी खेळांना प्रोत्साहन मिळावे तसेच पारंपरिक क्रिडा प्रकार जपले जावेत यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात डिसेंबर २०२३ मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रिडा महोत्सव’ आयोजित केला जाणार आहे. महोत्सवाचे नियोजन देशी मैदानी क्रीडा संघटनांनी समन्वय साधून काटेकोरपणे करावे, असे निर्देश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
देशी मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री लोढा बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवी, मालाडचे उपजिल्हाधिकारी धनाजी तोरस्कर, उपजिल्हाधिकारी संदीप निचीत, क्रीडा भारतीचे श्रीकांत धर्माधिकारी, डॉ. उत्तम केंद्रे, सदस्य गणेश विचारे तसेच विविध देशी मैदानी क्रीडा संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
मंत्री लोढा म्हणाले, आपले पारंपरिक क्रीडा प्रकार लुप्त होवू नयेत यासाठी अशा प्रकारचे क्रीडा महोत्सव केले जावेत, अशी मागणी वारंवार केली जाते. ही मागणी पाहता डिसेंबर महिन्यात खो-खो, दंड बैठक, मल्लखांब, लंगडी, विटी-दांडू, लगोरी, अखाडा कुस्ती, मानवी मनोरा (पिरॅमिड), रस्सी खेच, दोरी उडी, सूर्यनमस्कार, पावनखिंड दौड, शरीरसौष्ठव, तलवार बाजी, ढाल तलवार आदी मैदानी खेळांचा समावेश करुन पंधरा दिवसांच्या क्रीडा महोत्सवाचे नियेाजन करण्यात येणार आहे. क्रीडा महोत्सवास संपूर्ण सहकार्य केले जाईल. या महोत्सवा दरम्यान खेळाडूंना विविध सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात. नियोजन काटेकोरपणे करावे अशा सूचना पालकमंत्री लोढा यांनी यावेळी केल्या.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra