मुंबई : भारतातील सर्वात मोठा डिजिटल हेल्थकेयर प्लॅटफॉर्म मेडीबडीने एक वर्कप्लेस डेटा प्रकाशित केला आहे ज्यामध्ये लवकरात लवकर निदान आणि मधुमेह (Diabetes) व्यवस्थापन याविषयी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या डेटानुसार, ३२.५ टक्के जणांमध्ये मधुमेहपूर्व स्थिती असते तर ११.३१ टक्के जणांना मधुमेह असतो. आजार लवकरात लवकर लक्षात आल्यास, नंतरच्या काळात मधुमेह होण्याची शक्यता कमी होते, मधुमेहपूर्व स्थिती जवळपास एक दशक आधी लक्षात येऊ शकते हे यामध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. मधुमेही रुग्णांपैकी १३.७ टक्के पुरुष व फक्त ५.३ टक्के महिला होत्या असेही या माहितीमधून आढळून येते.
जगभरातील मधुमेही वयस्कांमध्ये दर सात जणांमधील एक जण भारतीय आहे. टेलीमेडिसिनच्या माध्यमातून उच्च दर्जाची आरोग्य देखभाल उपलब्ध झाल्यास प्रतिबंधात्मक काळजी घेऊन आरोग्याला असलेले धोके कमी करण्यात मदत मिळते. डॉक्टर व रुग्ण यांचे गुणोत्तर प्रमाण जिथे खूपच विषम आहे अशा विकसनशील देशांमध्ये हे उपयोगी ठरू शकते.
मेडीबडीच्या मेडिकल ऑपरेशन्सच्या प्रमुख डॉ. गौरी कुलकर्णी यांनी सांगितले, “आरोग्याच्या देखभालीवरील खर्च कमी करण्यात आणि रुग्णांचे आयुष्मान वाढवण्यात, त्यांच्या जीवन गुणवत्तेमध्ये सुधारणा घडवून आणण्यात प्रतिबंधात्मक औषधे अतिशय सखोल प्रभाव घडवून आणू शकतात हे आमच्याकडील माहितीवरून दिसून येते. मेडीबडीमध्ये आम्ही प्रतिबंधात्मक आरोग्य देखभाल हा सार्वजनिक आरोग्याचा आधारस्तंभ आहे या विचाराला प्रोत्साहन देतो. आमच्या उद्योगक्षेत्राने प्रतिक्रियात्मक दृष्टिकोनाऐवजी अधिक सक्रिय व घरी किंवा कामाच्या ठिकाणी प्राथमिक देखभालीला महत्त्व देणारे मॉडेल स्वीकारले पाहिजे.”
वय आकडेवारी लक्षात घेतली तर दिसून येते की, मधुमेही रुग्णांचे सरासरी वय मधुमेहपूर्व स्थिती असलेल्या रुग्णांपेक्षा खूप जास्त आहे, मधुमेही रुग्णांचे सरासरी वय ५०+ तर मधुमेहपूर्व स्थितीत असलेल्यांचे सरासरी वय २० ते ४० च्या दरम्यान आहे. यांच्यापैकी बहुतांश रुग्ण आमच्याकडे नियमितपणे आरोग्य तपासण्या करून घेतात, या तपासण्यांदरम्यान त्यांना मधुमेह किंवा मधुमेहपूर्व स्थिती असल्याचे आढळून आले होते. यांच्यापैकी बहुतांश रुग्णांनी त्यांच्या नियमित आरोग्य तपासण्यांनंतर आमच्याकडून आरोग्य देखभाल सेवा घेतल्या, ज्यामध्ये त्यांच्या बाबतीत मधुमेह किंवा मधुमेहपूर्व स्थितीचे प्राथमिक निदान करण्यात आले.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra