
नवी दिल्ली : दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पी-२० परिषदचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी भारत लोकशाहीची जननी असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, दहशतवादाविरुद्ध भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलली पाहिजेत, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
पी-२० परिषदेत संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताची संसदीय प्रक्रिया काळानुरूप सुधारली आहे. भारताने जी-२० शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केले होते आणि आता पी-२० चे आयोजन करत आहे. पी-२० शिखर परिषद लोकशाहीची जननी आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही सुद्धा भारतात आहे. हे चर्चेसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. तसेच, भारतातील सार्वत्रिक निवडणुका एखाद्या सणासारख्या असतात. स्वातंत्र्यानंतर भारतात १७ सार्वत्रिक निवडणुका आणि ३०० हून अधिक विधानसभा निवडणुका झाल्या आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले
याचबरोबर, भारत जगात केवळ सर्वाधिक निवडणुकाच घेत नाही तर मोठ्या संख्येने लोकांचा सहभाग देखील पहायला मिळतो. २०१४ ची निवडणूक इतिहासातील सर्वात मोठी निवडणूक होती आणि या निवडणुकीत ६० कोटी लोकांनी भाग घेतला होता. २०१९ मध्ये ७० टक्के मतदान झाले आणि ६०० हून अधिक पक्षांनी सहभाग घेतला. तसेच, भारताच्या जी-२० अध्यक्षतेच्या चौकटीत भारतीय संसदेद्वारे ही शिखर परिषद आयोजित केली जात आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
दरम्यान, पीएमओने म्हटले आहे की, जी-२० सदस्य देशांतील संसदीय वक्त्यांसह, आफ्रिकन युनियन जी-२० मध्ये सामील झाल्यानंतर पहिल्यांदाच पॅन-आफ्रिकन संसदेसारखे आमंत्रित देश सहभागी होत आहेत. दरम्यान, कॅनडाच्या सिनेटचे अध्यक्ष रेमंड गग्ने हे पी-२० शिखर परिषदेला आलेले नाहीत. भारत आणि कॅनडात सुरू असलेल्या वादामुळे ते आले नसल्याचे म्हटले जात आहे.