कोण कोण कलाकार मंडळी असणार?
मुंबई : काही दिवसांपूर्वी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या आयुष्यावरील ‘गडकरी’ (Gadkari Movie) या सिनेमाची पोस्टर लाँचद्वारे घोषणा करण्यात आली होती. मात्र, या पोस्टरमध्ये नितीन गडकरींची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता पाठमोरा उभा होता. काही दिवसांपूर्वी याचा टीझरही लाँच करण्यात आला होता, मात्र यातही चेहरा दाखवण्यात आला नव्हता. त्यामुळे हा हायवे मॅन साकारणारा अभिनेता नेमका कोण असेल याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. आता या सिनेमाचे दुसरे पोस्टर लाँच झाले असून यातील ‘गडकरी’ यांचा चेहरा समोर आला आहे. राहुल चोपडा (Rahul Chopda) असं या मुख्य अभिनेत्याचं नाव आहे.
नितीन गडकरी यांची भूमिका राहुल चोपडा साकारणार आहेत. तर त्यांच्या पत्नीची म्हणजेच कांचन गडकरी यांची भूमिका ऐश्वर्या डोरले साकारणार आहे. या व्यतिरिक्त नितीन गडकरी यांचे सहकारी रमेश हिमते यांच्या भूमिकेत अभिलाष भुसारी, प्रमोद बुरावार यांच्या भूमिकेत पुष्पक भट दिसणार आहेत. तर गिरीश व्यास आणि श्रीपाद रिसाळदार यांच्या भूमिकेत अनुक्रमे अभय नवाथे, वेदांत देशमुख दिसतील. पत्रकाराची भूमिका तृप्ती प्रमिला केळकर हिने साकारली आहे.
View this post on Instagram
भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरींच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट २७ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे अक्षय अनंत देशमुख निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. प्रेक्षकांना आता या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.