Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीनंबर प्लेट नसलेल्या, अनोळखी गाडीमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण

नंबर प्लेट नसलेल्या, अनोळखी गाडीमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण

महेश साळुंके

लासलगाव : खेडलेझुंगे, कोळगाव, सारोळे थडी परिसरामध्ये अनोळखी, नंबर प्लेट नसलेली ओमिनी गाडी फिरत असल्याचे शाळेतील मुलांच्या निदर्शनास आले आहे. याबाबत मुलांनी शाळेतील प्राचार्यांना माहिती दिली आहे. संशयास्पद गाडी फिरत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

मुलांनी दिलेल्या माहितीनुसार, परम पूज्य तुकाराम बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, खेडलेझुंगेचे प्राचार्यांनी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना शाळेत येताना आणि घरी जाताना ग्रुपने रहावे. अनोळख्या गाडीत बसू नये, अशी सूचना केली आहे.

अनोळखी नंबर प्लेट नसलेली ओमिनी व्हॅन नेमकी कुणाची आहे आणि गाडीत कोण आणि कोणत्या अवस्थेत आहे याची माहिती नसल्याने कुणीही त्या गाडीकडे जाण्याचे धाडस दाखवत नाही. तसेच प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही स्वतःची काळजी घेण्याचे आणि अनोळख्या गाडीत कोणी बसू नये किंवा कुणाकडेही गाडीची मदत मागू नका, असे आवाहन केले आहे.

“सर्व पालकांना व विद्यार्थ्याना कळविण्यात येते की, शाळेत येताना सर्व मुला मुलींनी ग्रुपने शाळेत यावे. कारण रस्त्याने कधी कधी संशयित गाडी फिरत आहे. ती गाडी नेमकी कशाची आहे, ती आपल्याला माहीत नसल्यामुळे त्या गाडीत कोणीही बसू नये. अशी संशयित गाडी आपणास आढळुन आल्यास तात्काळ माहिती द्यावी. स्वतःची व आपल्या मित्रांची काळजी घ्यावी. पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पोहोचला किंवा नाही याची खबरदारी घ्यावी.” – प्राचार्य, परम पूज्य तुकाराम बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, खेडलेझुंगे

“सकाळी, दुपारी आणि सायंकाळी ग्रामीण भागामध्ये पोलीस विभागाने गस्त देणे गरजेचे आहे. शालेय परिसरामध्ये शाळेशी संबंधीत नसलेल्या सर्वांना समज देणे गरजेचे आहे. शाळेमध्ये सकाळी शाळा सुरु झाल्यानंतर शाळेचे मेन गेट बंद केले जाते. परंतु शाळेपर्यंत येताना आणि शाळेतून घरापर्यंत येताना मुलांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात पालक वर्ग शेतात राबत असल्याने मुलांना शाळेत सोडणे आणि घरी आणणे काही वेळेस जमत नाही. त्यामुळे अशा संशयास्पद वाहनामुळे सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने सुरक्षा यंत्रणेने ग्रामीण भागात गस्त देणे गरजेचे आहे.” – माया सदाफळ, सरपंच ग्रामपंचायत खेडलेझुंगे

“विद्यार्थ्यांनी अनोळख्या गाडीमध्ये ये-जा करण्यासाठी मदत मागू नये. ४-५ मुलांच्या ग्रुपने शाळेत ये-जा करावी. शक्यतो पालकांनी मुलांना शाळेत आणून आणि घेऊन जावे. अशा अनोळख्या गाड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकमेकांना संपर्क करावा. – विजय गिते, माजी उपसरपंच, खेडलेझुंगे

“आपल्या परिसरामध्ये विनानंबरची अनोळखी गाडी आढळून आल्यास किंवा संशयास्पद व्यक्ति अथवा टोळके आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये माहिती द्यावी. परस्पर आपसात हाणामाऱ्या किंवा गैरकृत्य करु नये, जेणेकरुन निरपराध्याला शिक्षा होणार नाही. तसेच ज्या शेतकरी बांधवांच्या किंवा नागरीकांच्या गाड्यांना नंबर अथवा काही अपुर्तता असल्यास त्यांनी येत्या काळात त्या पुर्तता करुन घ्याव्यात. जेणेकरुन कार्यवाही होताना शासकीय यंत्रणेला आणि आपणाला त्रास होणार नाही.” – राहुल वाघ, सहा. पोलिस निरीक्षक, लासलगांव

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -