मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत
‘न बोलणाऱ्याचं सोनं विकलं जात नाही, पण बोलणाऱ्याचं शेणही विकलं जातं’, अशी एक म्हण प्रचलित आहे. एखादे उत्पादन आपल्यापर्यंत पोहोचते ते मुख्यतः जाहिरातींच्या माध्यमातूनच. मग ते वृत्तपत्र असो किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स. आजच्या युगात जाहिरातीची अनेक माध्यमे आहेत. हल्ली दूरचित्रवाणीवर कुठलाही कार्यक्रम असला की त्याला माध्यम प्रायोजक असतात (म्हणजे या कार्यक्रमाच्या निर्मितीसाठी लागणारा पैसा या माध्यम प्रयोजकांनी दिलेला असतो). या माध्यम प्रयोजकांना तुम्ही पाहत असलेल्या कार्यक्रमाच्या ‘कन्टेन्ट – विषय’ यापेक्षा त्यांच्या उत्पादनाची जाहिरात करणे जास्त गरजेचे असते. जेणेकरून त्यांच्या उत्पादनांचा समाजमनावर मारा होतो. पर्यायाने त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठेत प्रचंड मागणी येते. आता या उत्पादनांची जाहिरात करायची तर त्यात समाजमाध्यमांवर सदैव झळकणारे प्रसिद्ध चेहरे असतात हे कला, क्रीडा, राजकारण, शिक्षण आदी कुठल्याही क्षेत्रातील असतात. या आणि अशा सदैव झळकणाऱ्या चेहऱ्यांच्या माध्यमातून उत्पादने सर्वांसाठी कशी उपयुक्त आहेत वगैरे आपल्या मनावर बिंबविण्याचे प्रयत्न केले जातात. याच चेहऱ्यांना ‘सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स’ – म्हणजे समाज माध्यमांवरील प्रभावक म्हणतात. आपल्या देशात जाहिरातीतील अनुचित दृश्ये, छबी, मजकूर यांच्या नियमनासाठी भारतीय जाहिरात मानक परिषद (ॲडव्हर्टिझमेंट स्टँडर्ड्स कॉऊन्सिल ऑफ इंडिया – एएससीआय) ही संस्था कार्यरत आहे.
या संस्थेने आता अशा प्रभावकांची नवी मानके जाहीर केली आहेत ती अशी. सेलिब्रिटी म्हणजे अशा प्रसिद्ध व्यक्ती ज्या समाजमनावर गारुड घालू शकतात – अशी व्यक्ती जी जाहिरातीतून झळकण्यासाठी वार्षिक रुपये ४० लाखहून अधिक मानधन कमावते किंवा अशा मोहिमा कुठल्याही समाजमाध्यमाद्वारे चालवल्या जातात किंवा कोणत्याही समाजमाध्यमावर अशा सेलिब्रिटीचे ५ लाखहून अधिक फॉलोअर्स असतील (आता फॉलोअर्सचा अनुयायी असा अर्थ करणे म्हणजे त्याला धार्मिक रंग देणे होईल म्हणून आपण त्यांना फॉलोअर्सच म्हणूया). – तर अशा सेलिब्रिटींना आता एएससीआयच्या नव्या मानकानुसार प्रभावक म्हणून गणले जाईल. एएससीआयच्या सेक्रेटरी जनरल व सीईओ मनीषा कपूर म्हणतात, ‘समाजमनावर प्रभाव टाकू शकतील व ग्राहकांच्या मनात जवळचे स्थान प्राप्त करणाऱ्या समाजमाध्यमांवरील असे सेलिब्रिटी असतात. यांच्या माध्यमातून जाहिरातीत झळकणारी उत्पादने किंवा सेवा ही त्या सेलिब्रिटींच्या फॉलोवर्सकडून मानली जाते व त्या प्रभावामुळे त्या वस्तू किंवा सेवा यांचा खप वाढतो. अर्थात ग्राहकांच्या खर्च करण्याच्या सवयी यामुळे बदलतात. याचा परिणाम ग्राहकाचे आर्थिक नुकसान किंवा शारीरिक हानी यात होऊ शकते. अशा समाजमनावर विपरीत परिणाम करणाऱ्या जाहिरातींची संख्या आता वाढली आहे. २०२२-२३ मध्ये एएससीआयने समाजमनावर परिणाम करणाऱ्या अशा सुमारे ५०० जाहिरातींबाबत तक्रारी हाताळल्या ज्या त्यापूर्वीच्या वर्षात केवळ ५० होत्या.
सर्व प्रभावशाली व्यक्ती ज्या या क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांनी याबाबत योग्य ती काळजी घेऊन, ते जाहिरात करणार असलेल्या वस्तू, उत्पादने, सेवा यांच्याबद्दल सखोल माहिती घ्यायला हवी. अशा प्रभावशाली व्यक्तींच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक, निराशा होणार नाही ना, याची काळजी त्यांनी घ्यायला हवी असे ‘एएससीआय’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे. अशा प्रभावशाली व्यक्तींनी जर अशी जाहिरात करण्यापूर्वी योग्य काळजी घेतली असेल, त्यांच्या जाहितीतील भूमिकेचा परिणाम जाणून घेतला असेल, तर कायदा सुद्धा त्यांच्याबाबतीत जास्त कठोर न होता थोडी शिथिलता दाखवतो. या प्रभावकांनी उत्पादन, सेवा यांची प्रशंसा करताना किंवा मी ते वापरले आहे आणि तुम्हीही ते वापरा असे ग्राहकांना सुचवण्यापूर्वी त्याची खात्री करून घेतली पाहिजे. एएससीआयने अशा व्यक्तींना जर त्याच्या सत्यतेविषयी साक्षीपुरावे मागितले तर ते त्यांना देता आले पाहिजेत. अन्यथा जाहिरातदाराने जाहिरात नियामक मानकास अनुसरून जाहिराती बनवाव्यात. एएससीआयने अशा जाहिराती ज्यात वस्तू, उपाय, उपचार यावर औषधे व जादूटोणा विरोधी कायदा १९५४ आणि औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ अन्वये अशा जाहिरातीत सेलिब्रिटीने भाग घेऊ नये असे अनिवार्य केले आहे. अगदी २०१९चा ग्राहक संरक्षण कायदा देखील अशी योग्य काळजी घेण्याची जबाबदारी अशा प्रभावकांवर टाकतो, मग ते सेलिब्रिटी असोत की नसोत.
एएससीआयने अशीही सूचना केली आहे की, अशा सर्व सेलिब्रिटींनी कोणतेही उत्पादन किंवा सेवा यांच्या जाहिराती करण्यापूर्वी समाजमनावर त्याच्या होणाऱ्या परिणामाचा अधिक गांभीर्याने विचार करायला हवा. आपण बरेच कार्यक्रम पाहतो, त्यासोबत येणाऱ्या सगळ्या जाहिराती सुद्धा झेलतो. पण अशा जाहिरातीतील आक्षेपार्ह किंवा असत्य तथ्यांबद्दल तक्रारी न करता मुकाटपणे त्या सहन करतो. एएससीआयचा हा मंच ग्राहकांनी त्यांच्या चांगले – वाईट पाहण्याच्या अधिकारासाठीसुद्धा वापरला पाहिजे. म्हणजे खटकणाऱ्या जाहिराती निमूटपणे न बघता त्यासारख्या बऱ्या-वाईटाचा समाजमनावर होणाऱ्या परिणामाचे विश्लेषण स्वतः करायला हवे. शेवटी अशा मंचाकडे तक्रारी आल्यानंतरच त्यावर कारवाई होऊ शकते हे नेहमी लक्षात ठेवायला हवे.