Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीToll naka Scam : राज ठाकरे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; टोलनाक्यांचा प्रश्न...

Toll naka Scam : राज ठाकरे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; टोलनाक्यांचा प्रश्न निकाली लागणार?

सगळ्यांची सरकारे येऊन गेली पण टोल बंद झाले नाहीत: राज ठाकरे

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून टोलनाक्याच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेने (MNS) आक्रमक भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केवळ व्यावसायिक वाहनांकडूनच टोल आकारला जातो असं वक्तव्य करताच राज ठाकरे पेटून उठले आणि खाजगी वाहनांकडून टोल आकारला तर टोलनाके जाळून टाकू असा धमकीवजा इशाराच त्यांनी दिला. या इशार्‍यावर मनसे कार्यक्रत्यांनीही आक्रमक होऊन ठिकठिकाणच्या टोलनाक्यांवर तुफान राडा घातला. मात्र, त्यामुळे टोलनाक्यांचे व परिणामी सरकारचे नुकसान होत आहे. म्हणून यावर तोडगा काढण्यासाठी आज राज ठाकरे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेणार आहेत. यावेळेस टोलनाक्यांसोबतच इतरही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते चर्चा करणार आहेत.

मुलुंड येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाका जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे म्होरके असणारे मुलुंडचे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्यासमवेत काही कार्यकर्त्यांना या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, एका दिवसाच्या आतच त्यांची सुटका करण्यात आली. यानंतर जोपर्यंत टोलनाक्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करण्याचा निर्धार अविनाश जाधव यांनी केला होता. मात्र, राज ठाकरे यांनी स्वतः अविनाश यांची भेट घेऊन उपोषण करणं हे आपलं काम नाही, यासंबंधी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेईन असं आश्वासन दिलं होतं. त्याप्रमाणे आता हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीत ते राज ठाकरेंना काय आश्वासन देतात हे पाहणे गरजेचे आहे. कारण राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीपर्यंत सरकारला अल्टीमेटम दिला होता. टोलबाबत सरकारची भूमिका काय यावर आजच्या बैठकीत चर्चा होईल. त्यातील माहिती राज ठाकरे स्वत: माध्यमांना देतील. जर यात सरकारकडून सकारात्मक पाऊल उचलले नाहीतर राज ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे मनसे कार्यकर्ते टोलनाक्यावर उभे राहतील आणि वाहने सोडतील, जिथे वाहने सोडली जाणार नाहीत तिथे टोलनाके जाळू असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता.

सगळ्यांची सरकारे येऊन गेली पण टोल बंद झाले नाहीत…

मनसेने याआधी टोलविरोधात आंदोलन छेडल्यापासून प्रत्येक राजकीय पक्षाने टोलमुक्तीची घोषणा केल्याचे सांगत राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व नेत्यांच्या टोलमाफीचे व्हिडिओच दाखविले. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चित्रफिती होत्या. सगळ्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू, अशी आश्वासने दिली. पण तरीही टोल बंद होत नाहीत. मधल्या काळात यांची सगळ्यांची सरकारे येऊन गेली पण आजपर्यंत टोल बंद झालेले नाहीत. राजकारणातल्या अनेक लोकांचे हे उदरनिर्वाहाचे साधन आहे. दर दिवसाला, आठवड्याला, महिन्याला यांच्याकडे यातून पैसे जात असतात. ते यामुळे टोल बंद करायला तयार नाहीत. तुम्हाला चांगले रस्ते मिळणार नाहीत. फक्त याच लोकांचा फायदा होणार आहे. या लोकांनी थापा मारल्यानंतरही पुन्हा त्याच पक्षाला मतदान होते हेच माझ्यासाठी अनाकलनीय आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -