- ज्ञानेश्वरी : प्रा. डॉ. मनीषा रत्नाकर रावराणे
श्रीकृष्णांना अर्जुनाविषयी वाटणारी तळमळ, जिव्हाळा आणि उत्कट प्रेम आहेच, त्याचबरोबर अर्जुनाचं श्रीकृष्णावर विलक्षण प्रेम, श्रद्धा आहे तसेच तो निर्भीड जिज्ञासू विद्यार्थी आहे. मनातील शंका तो निशंकपणे श्रीकृष्णांना विचारतो. हे असं नातं व्यासमुनींच्या प्रज्ञेनं दाखवलं आहे. ज्ञानदेवांची प्रतिभा श्रीकृष्ण-अर्जुन नात्यातील अधिक संमिश्र, गहिरे रंग चितारते. श्रीकृष्ण-अर्जुन यांच्यातील ओथंबून जाणारं प्रेम संपूर्ण ज्ञानेश्वरीत ज्ञानदेव जाणवून देतात!
“अर्जुना, मी आपल्या गळ्याची शपथ वाहून सांगतो की, या माझ्या बोलण्यात एक अक्षरदेखील खोटे नाही.”
‘यया बोला कांही। अनारिसें नाहीं।
आपली आण पाहीं। वाहतु असें गा।
(अध्याय १२ ओवी क्र. १०३)
हे बोलणं आहे साक्षात भगवंत श्रीकृष्णांचं!
बोलत आहेत लाडक्या अर्जुनाशी !
हा संवाद रेखाटणारे आहेत ज्ञानदेव!
काय ताकद आहे या वचनात! देवांनी स्वतःची शपथ घेऊन भक्ताला काही शिकवणं, पटवून देणं ही कल्पकता, ही सारी प्रतिभा ज्ञानदेवांची!
संपूर्ण ज्ञानेश्वरीत श्रीकृष्ण-अर्जुन यांच्यातील ओथंबून जाणारं प्रेम जाणवून देतात ज्ञानदेव! नेमकं सांगायचं तर, अर्जुनाची श्रीकृष्णांवर असलेली अपार भक्ती, निष्ठा! त्याचबरोबर श्रीकृष्णांना अर्जुनाविषयी वाटणारी तळमळ, जिव्हाळा आणि उत्कट प्रेम! या साऱ्याला आपल्या अमृतमय वाणीने शब्दरूप देतात ज्ञानदेव!
अर्जुनाचं श्रीकृष्णावर विलक्षण प्रेम, श्रद्धा आहे, म्हणजे तो एकनिष्ठ भक्त आहे, पण त्याच वेळी तो एक जिज्ञासू विद्यार्थी आहे. विद्यार्थी म्हणून निर्भीड आहे. मनातील शंका, प्रश्न तो निशंकपणे श्रीकृष्णांना विचारतो. हे असं नातं व्यासमुनींच्या प्रज्ञेनं दाखवलं आहे. ज्ञानदेवांची प्रतिभा या नात्यातील अधिक संमिश्र, गहिरे रंग चितारते.
बाराव्या अध्यायाच्या आरंभी अर्जुनाचा प्रश्न आहे श्रीकृष्णांना!
“भक्ती आणि योग यांपैकी कोणत्या मार्गाने तुमची प्राप्ती होईल?”
श्रीकृष्णांचं उत्तर आहे – “भक्तिमार्गाला लाग.”
केवळ एवढं सांगून श्रीकृष्ण थांबत नाहीत, हे उत्तर ते पुढे अजून स्पष्ट करतात. ही एका सद्गुरूंची वृत्ती शिष्याला जितकं स्पष्ट, सहज, सोपं करून सांगता येईल तितकं सांगणं.
म्हणून भगवद्गीतेत श्रीकृष्णांचा मंत्र येतो – “माझ्या ठिकाणी तू मन ठेव, बुद्धीची स्थापना कर, मग तू माझ्या ठिकाणीच वास करशील (एकरूप होशील).”
ज्ञानेश्वरीत हे सांगण्यासाठी किती सुंदर कल्पना करतात ज्ञानदेव! “अरे, एक मन व दुसरी बुद्धी ही माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी वतनदार करून ठेव.” (ओवी क्र. ९७)
“कारण मन आणि बुद्धी यांनी माझ्या ठिकाणी वास्तव्य केल्यावर तुझ्यात आणि माझ्यात काही दुजेपणा उरला का सांग बरे?”
‘जे मन बुद्धि इहीं। घर केले माझ्या ठायी।
तरि सांगे मग काई। मी तूं उरे?’
ओवी क्र. ९९
‘तरि सांगे मग काई। मी तूं उरे?’ ही ज्ञानदेवांची खास शैली! प्रश्न विचारणं, खरं तर प्रश्नातच उत्तर असणं! अशा रचनेतून संवाद स्वाभाविक करणं, त्यांचा श्रोत्यांच्या अंतरंगात प्रवेश होणं आणि श्रोत्यांनी या सर्व ज्ञानयज्ञात समरस होणं! हे सर्व सहज साधणारी ज्ञानेश्वरांची लेखनशैली!
याचाच एक भाग म्हणजे अप्रतिम दृष्टान्तांची मांडणी! इथेही त्याचा अनुभव येतो. दिवा मालवल्याबरोबर ज्याप्रमाणे त्याचे तेज नाहीसे होते किंवा सूर्यबिंब मावळल्याबरोबर प्रकाश नाहीसा होतो (ओवी क्र. १००)
किंवा बाहेर निघू पाहणाऱ्या प्राणाबरोबर इंद्रिये बाहेर पडतात, त्याप्रमाणे मन आणि बुद्धी एकत्र होऊन जिकडे जातील, तिकडे अहंकार हा त्यांच्याबरोबर आपोआप जातो.
(ओवी क्र. १०१)
निसर्ग आणि व्यवहारातील हे साधे दाखले देऊन ज्ञानेश्वर तत्त्वज्ञानातील कठीण असा भाग (मन, बुद्धी याविषयीची शिकवण) सहज सोपा करून रसिकांना देतात.
माऊलींच्या शब्दांत जणू,
‘हृदया हृदय येक जाले,
ये हृदयींचे ते हृदयीं घातलें!’