- समर्थ कृपा : विलास खानोलकर
श्रीस्वामी समर्थांचा हरिभाऊंवर कसा परिणाम झाला? त्यांना एवढे वैराग्य का आले? त्यामागचा महाराजांचा हेतू काय होता? आदी प्रश्नांचा शोध आणि बोध घेण्याचा प्रयत्न करूया. श्री स्वामींनी हरिभाऊ तावड्यांमध्ये टप्प्याटप्प्याने बदल घडवून आणले. त्यांची मनोभूमिका विरक्ती-अनासक्तीकडे वळविली. त्यासाठी त्यांनी वापरलेल्या क्लृप्त्या या अगोदरच्या हरिभाऊंशी संबंधित लीलांमध्ये आलेल्या आहेत. श्री स्वामींनी अभिमंत्रित केलेल्या पादुका हरिभाऊंच्या मस्तकावर ठेवल्या. चमत्कार घडावा त्याप्रमाणे हरिभाऊंमध्ये अवधूतत्व पूर्ण वैराग्य रोमारोमांत भिनले. आता हरिभाऊ श्री स्वामींचे सुत झाले होते.
मुंबईस आल्या आल्या त्यांनी सद्गुरू आदेशानुसार स्वतःचा संसार खरोखर लुटविला. त्याच्या पत्नीच्या अंगावरील साठ तोळे सोन्याचे तोडे, चोवीस तोळ्याच्या बांगड्या, उठरा पुतळ्यांचे गाठले, ठुशी आदी दागिने हरिभाऊंनी मित्राकरवी विकले. आलेली सर्व रक्कम ब्राह्मणांस वाटून दिली. त्यांची पत्नी ताराबाईने संसार, त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटविले जात असताना आकांत मांडला. रडून – रडून त्यांचे डोळे सुजले. थोडे तरी दागिने राहू द्यावे ही पत्नी ताराबाईची विनवणीही मानली नाही. पत्नीच्या गळ्यात मणिमंगळसूत्रही राहू दिले नाही. पत्नीस नेसावयास एक पांढरे पातळ व स्वतःसाठी अंगावरील भगवी वस्त्रेच काय ती त्यांनी ठेवली. बाकी सर्व संसार, संसारातील किडूक-मिडूक आदी वाटून ते पूर्ण विरक्त झाले. त्यांच्या वैराग्याची ही परमसीमा होती. नोकरीतला रस तर श्री स्वामींच्या प्रथमदर्शन भेटीतच निघून गेला होता. आता त्यातूनही ते पूर्ण मुक्त झाले होते.
स्वामीसुतांत एवढे वैराग्य निर्माण केले याचे कारण स्वामीसुतांनी दर्याकिनारी किल्ला बांधून, जनसेवेचा ध्वज अधिकाधिक उंच न्यावा हा लोकाभिमुख उद्देश श्री स्वामींचा होता. तेव्हा अनेकांना अक्कलकोटापेक्षा मुंबई जाण्या-येण्याच्या दृष्टीने अधिक सोयीची जवळची आणि स्वस्त होती. ते अनेकांना मार्गदर्शनासाठी स्वामीसुतांकडे पाठवत. स्वामीसुतांनी गिरगांवच्या मठात स्वामी पादुकांची फोटोची स्थापना केली . सर्व गिरगांवकरांचे कल्याणच केले.
श्री स्वामी समर्थांसारखा सद्गुरू आपल्या शिष्यांसाठी काय करू शकतो? हे सर्व का करतो? हे सहजच लक्षात येते? यासाठी स्वामीसुतांसारखी निरिच्छ-निखळ हृदयाच्या तळापासून आणि बेंबीच्या देठापासून भक्ती करावी लागते, तरच स्वामी प्रसन्न होतात. तर म्हणा मंत्र ‘स्वामी समर्थ.’
स्वामी महिमा
स्वामीकृपा जयावर झाली सारी सुखे धावत आली ॥ १॥
आनंदाचे दागिने पूर्ण ल्याली सारी दुःखे गंगातीरी वाहिली ॥ २॥
दिनरात जपा रे, दिनरात जपा स्वामीनाम दिनरात जपा ॥ ३॥
पक्षिणीसारखा बांधिला खोपा सुखी संसाराचा मार्ग सोपा ॥ ४॥
शत्रूला सांगती गोठ्यात झोपा सुखाचा कल्पवृक्ष दारी रोपा ॥ ५॥
राजापूरचे शंकरराव स्वामींना शरण दूर केले त्यांचे कर्जबाजारी मरण ॥ ६॥
केली आज्ञा, करा चांदीचे चरण चांदीच्या पादुका त्वरित केल्या अर्पण ॥ ७॥
स्वामींनी अनुग्रह देऊनी पादुका केल्या तर्पण सांगितले संसार करा गंगार्पण ॥ ८॥
गिरगावात स्थापन करा स्वामीमठ स्वामीसुत स्थापिला गिरगावमठ ॥ ९॥
गिरगावातील सारे प्रेमळ मठ दूर करती दुःखे झटपट झटपट ॥ १०॥
स्वामी आशीर्वादाने थंड झाले तापट कृपा झाली भाटवडेकर- सामंत-मिलिंद-बापट॥ ११॥
स्वामी गीत गायिले अजित कडकडे तोडले सारे दुःखाचे लोखंडी कडे ॥ १२॥
जगभर नाव फटाके तडतडे पाळणे सुखाचे आकाशी उडे॥ १३॥
गिरगाव ते गोरेगाव स्वामी पताका फडफडे भक्त सुखी होण्यासाठी स्वामी स्वतः दौडे ॥ १४॥
भिऊ नकोस पाठीशी आहे सोडवी सारे कोडे स्वामी समर्थ मंत्र जपता मन स्वर्गाशी जोडे ॥ १५॥
स्वामीसमर्थ पंचाक्षरी मंत्र भूत संबंध गाठ तोडे लक्ष्मीकृपेने हाती येती नवरत्नांचे तोडे ॥ १६॥