एकदा श्री गजानन महाराज व इतर मंडळी पंढरपूर येथे विठू माऊलीच्या दर्शनाकरिता निघाली. पंढरपूरच्या वारीचा तो काळ होता. वारीनिमित्त स्पेशल गाड्या वरच्या वर पंढरपूरला जाऊ लागल्या. महाराजांच्या बरोबर जगू आबा हरी पाटील, बापूना काळे व इतर अशी सर्व मंडळी होती. हा सर्व समूह शेगाव येथून निघून नागझरी येथे आला. या नागझरी गावामध्ये संत गोमाजी महाराज नावाचे एक संत होऊन गेले. हे गोमाजी महाराज म्हणजे महादजी पाटील यांचे गुरू. या गावी माळावर एक भुयार आहे. तेथे संत गोमाजी महाराज यांची समाधी आहे. या ठिकाणी गोड पाण्याचे जिवंत झरे आहेत. म्हणून या स्थानाला नागझरी असे नाव पडले. शेगाव येथून अतिशय जवळ असे हे स्थान आहे. आता या समाधी स्थानी संत गोमाजी महाराजांचे एक सुंदर असे मंदिर आहे. मंदिर परिसरात एक गोड्या पाण्याचे कुंड आहे. या कुंडात स्नान करून भाविक गोमाजी महाराजांचे दर्शन घेतात. जवळच नदी आहे. रमणीय असा हा परिसर आहे.
ही सर्व मंडळी नागझरी येथे आली. पाटील वंशाला या संतांचा आशीर्वाद प्राप्त झाल्याने प्रथम नागझरीला येऊन गोमाजी महाराजांचे दर्शन मग अग्निरथाने (रेल गाडी) पंढरपूरकरिता मार्गस्थ होणे असा या मंडळींचा परिपाठ होता. त्याप्रमाणे मंडळी गाडीत बसून निघाली. हरी पटलांसोबत श्री गजानन महाराज, बापूना काळे आणि इतरही पाच पन्नास माणसे होती. आषाढ शुद्ध नवमीच्या दिवशी हे सर्व पंढरपूर येथे पोहोचले. संत दासगणू महाराज यांनी त्यावेळी पंढरपूरचे वातावरण कसे होते (आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या वेळी कसे असते) याचे सुंदर आणि यथार्थ वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे :
अनेक वारकरी तेथे जमले होते. हलकासा पाऊस देखील पडत होता. वारकऱ्यांच्या येण्याने ते भूवैकुंठ पंढरपूर गजबजून गेले होते. प्रदक्षिणा मार्गावर अनेक टाळकरी आनंदाने भावविभोर होऊन “रामकृष्ण हरी” असा मोठ्याने नाम गजर करत होते. कोणाचा शब्द कोणासही ऐकू येत नव्हता. असा आनंदी आनंद त्या ठिकाणी चालला होता त्याचे वर्णन करता येणे शक्य नाही.
निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली, संत सावता माळी, संत गोरोबा काका, संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत जनार्दन या संतांच्या पालख्या पंढरपुरात आल्या. भक्तांनी या सर्व संतांचा आदर करण्याकरिता बुक्का उधळला. त्यायोगे जणू काही आकाशात बुक्क्याचे छत असावे असा आभास निर्माण होत होता. सर्व आसमंतात सुवास दरवळत होता. तुळशी आणि फुलांची नुसती उधळण होत होती. अशा या समयाला समर्थ पंढरपुरात पोहोचले आणि सर्व मंडळी कुकाजी पाटलांच्या वाड्यात येऊन उतरली. हा वाडा प्रदक्षिणा मार्गावर चौफाळ्याशेजारी होता. देवळात दर्शनाला प्रचंड गर्दी झाली होती. थोड्या थोड्या अंतरावर पोलीस उभे होते. रस्त्याने वारकरी हरिभजन करीत मंदिराच्या दिशेने येत होते.
आषाढी एकादशीला बापूना व्यतिरिक्त सर्वजण भगवत दर्शनाकरिता (विठ्ठलाच्या दर्शनास) गेले. बापूना त्यावेळी स्नानास गेला होता म्हणून त्याला वेळ झाला. स्नान करून घरी आला तो सर्व मंडळी दर्शनाला गेली, असे त्याला कळले. मग तो देखील पळत पळत विठ्ठलाचे दर्शन घेण्याचे हेतूने मंदिरात निघाला. मंदिराभोवती फार मोठ्या प्रमाणात गर्दी होती. जिथे मुंगीला देखील शिरण्याकरिता जागा नव्हती तिथे बापूना दर्शनास कसा जाऊ शकेल? शिवाय त्याच्या पदरी गरिबी होती. बापूना मनात खिन्न झाला व विठ्ठलाची आळवणी करू लागला. “हे विठ्ठला, का बरे निष्ठुर झालास मजविषयी? मला सुद्धा दर्शन देऊन तृप्त कर. अरे देवा, तू तर सावता माळ्याकरिता अरणी धावून गेला होतास ना? तसाच देवळातून बाहेर ये आणि तुझ्या दर्शनाची माझी अभिलाषा पूर्ण कर. ते अरण तरी दूर होते. मी तर तुझ्या मंदिराच्या वाटेवरच उभा आहे. तुला लोक अनाथांचा नाथ म्हणतात. मग यावेळी मलाच का उपेक्षिले?” अशी पुष्कळ प्रार्थना केली. शेवटी बापूना हताश होऊन अस्तमानाच्या वेळी बिर्हाडी परत आला. मुख म्लान झाले होते. साऱ्या दिवसाचे उपोषण घडले होते आणि त्याहीपेक्षा विठ्ठलदर्शन घडले नव्हते. मात्र चित्त विठ्ठल दर्शनास अधीर झाले होते. शरीर घरी होते पण मन मात्र मंदिराच्या सभोवार फिरत होते.
इतर मंडळी दर्शन घेऊन परत आली. बापूनाला पाहून हसू लागली. कोणी म्हणाले, “बापूना अभागी आहे हे आज कळून चुकले. हा शेगाव येथून विठ्ठल दर्शन घेण्याकरिता पंढरपुरात आला आणि इथे विविध खेळ पाहत फिरला. हा नक्कीच दांभिक आहे. याला कसली आली आहे भक्ती आणि कसला श्रीपती?” कोणी त्याची खिल्ली उडवून म्हणाले, “बापूनाला अवघा वेदांत आला आहे. मग तो कशाला दर्शनाला जाईल? वेदांत्यांचे असे म्हणणे असते की दगडात कुठे देव असतो काय?” अशा प्रकारे अनेकांनी त्याचा उपहास केला. बापूना तसाच उपोशित बसून राहिला. हे सर्व स्वामी गजानन महाराज निजल्या जागेवरून पाहत होते. महाराजांना त्याची ही अवस्था पाहून दया वाटली. महाराज बापूनाला म्हणाले,
“समर्थ म्हणती बापूना।
दुःख नको करुस मना।
ये तुला रुक्मिणी रमणा।
भेटवितो ये काळी॥”
असे बोलून महाराज कमरेवर हात ठेवून उभे राहिले. समचरण दाखविण्याकरिता दोन्ही पाय जोडले आणि बापूनाला महाराजांच्या जागी विठ्ठलाची सावळी गोमती मूर्ती, जिच्या कंठी तुळशी फुलांच्या माळा घातल्या आहेत अशा विठ्ठलाचे साक्षात दर्शन घडले. बापूनाने मस्तक पायावर टेकविले. पुन्हा त्याने वर पाहिले तो पुन्हा त्याला तिथे महाराज दिसले. (भक्तांच्या हे निश्चितच स्मरणात आहे की, असाच प्रकार महाराजांनी बाळकृष्ण बुवा या समर्थ भक्तास रामदास स्वामींच्या रूपात दर्शन दिले त्यावेळी घडून आला होता.) असे दर्शन घडल्यामुळे बापूंना अतिशय हर्षित झाला. इतर मंडळी देखील महाराजांना म्हणू लागली, “आम्हाला देखील असे विठ्ठल दर्शन घडवा. आम्हाला सुद्धा पुन्हा दर्शन घेण्याची इच्छा आहे.” त्यावर महाराज त्यांना म्हणाले,
“ऐसे ऐकता भाषण।
बोलते झाले गजानन।
बापूना सारिखे आधी मन।
तुम्ही करा रे आपुले॥”
अशा प्रकारे महाराजांनी बापूना काळे या आपल्या भक्तास कुकाजी पाटील यांच्या वाड्यात साक्षात विठ्ठल रूपात दर्शन दिले. संत आणि भगवंत हे एकच आहेत. संत दासगणू महाराजांच्या शब्दात :
पाहा समर्थांनी बापूनाला।
विठ्ठल साक्षात दाखविला।
कुकाजीच्या वाड्याला।
संतत्व हा खेळ नसे॥ ५२॥
संत आणि भगवंत।
एकरूप साक्षात।
गुळाच्या त्या गोडीप्रत।
कैसे करावे निराळे?॥ ५३॥
पंढरीच्या प्रसादाने बापूनाला पुत्र झाला. त्याने त्या बालकाचे नाव नामदेव असे ठेवले.
क्रमशः
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…