Monday, July 1, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीशुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ...

शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ…

  • अध्यात्म : ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

भगवंताला शरण जाण्यात देहबुद्धी आणि अभिमान आड येतो, परिस्थिती आड येत नाही. ती व्यसनाच्या आड कुठे येते? अभिमान जाण्यासाठी उपाय म्हणजे, जे जे कराल ते ते भगवंताला अर्पण करावे. तोच कर्ता, आपण काहीच करीत नाही, अशी भावना ठेवावी; म्हणजे अभिमानही भगवंताला अर्पण करावा. आपण भगवंताशी काही ना काही कारणाने संबंध ठेवावा. त्याच्याशी बोलावे; त्याचे नाम घ्यावे. नामासारखे दुसरे खरे साधन नाही. वासरू घेऊन गेले म्हणजे जशी गाय पाठीमागून आपोआप येते, त्याप्रमाणे नाम घेतले की भगवंत त्यामागे येतो. ज्याला एकदा नामाची गोडी लागली त्याला प्रपंचाची भीती वाटू लागते. विषय त्याला कडू वाटू लागतात.

परमात्म्याच्या नामाने संसार बिघडतो हे म्हणणे चुकीचे आहे. नाम घ्यायचे म्हणून कर्ममार्ग सोडू नये. नामाची गोडी ज्याला आली त्याचीच कर्मे सुटतात. नामाचा अनुभव नाही असे म्हणणे खोटे आहे; आपण ते जितके घ्यावे तितके घेतच नाही. नामात प्रेम येईल असे करावे. जन्माला आल्यासारखे नामाचे होऊन राहावे. भगवंत आपल्या नामस्मरणात आहे. शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ आहे आणि भाव शुद्ध होण्यासाठी सत्समागमावाचून दुसरा उपाय नाही. एकदा त्याचे होऊन राहिले म्हणजे तोच सर्व उपाय काढतो.

‘मी’ अमुक एक साधन करीन, असे म्हणू नये. ‘परमेश्वरा, तूच माझ्या हातून करवून घेणारा आहेस,’ अशी दृढ भावना ठेवावी. समजा, आपण एक व्यापार केला, त्यासाठी एकाने आपल्याला भांडवल दिले, तर त्या माणसाला आपण कधीही विसरत नाही; त्याचप्रमाणे ज्या भगवंताने आपल्याला विद्या, पैसा, प्रकृती दिली, त्याला आपण कधीही विसरू नये. भगवंत हा सहजसाध्य आहे, सुलभसाध्य नाही. निसर्गाने जे आपल्याकडे येते ते ‘सहज’ होय. म्हणून, सहजसाध्य याचा अर्थ, फलाची अपेक्षा नसणे आणि कर्तव्याचा अभिमान नसणे हा समजावा.

भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवले आहे त्यात समाधान मानून त्याचा विसर पडू न द्यावा. जो स्वतःपासून दूर आहे त्याला भगवंत दूर आहे. आपण मनुष्यजन्माला आलो हीच आपण भगवंताचे होण्याची खूण आहे. भोग आणि दुःख यात वेळ न घालविता, भगवंताकडे लक्ष दिले पाहिजे. याच जन्मात सुविचाराने आणि सद्बुद्धीने भगवंत आपलासा करणे, हेच आपले खरे कर्तव्य आहे. याकरिताच सतत त्याचे ध्यान करावे आणि मनातून आपले भगवंताशी नाते जोडून ठेवावे, यासारखा दुसरा सुलभ उपाय नाही. “तुझ्या नामात मला गोडी दे”, हेच भगवंताजवळ मागावे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -