
इराणी आणि चायनीज लसूण बाजारात आल्याने शेतकरी धास्तावले
मुंबई : काही दिवसांपूर्वी टोमॅटो (Tomato) आणि कांद्याच्या (Onion) दरात मोठी वाढ झाली होती. पण कांदा, टोमॅटोची आयात करुन त्याचे दर घसरवल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला होता. त्यानंतर आता इराणी आणि चायनीज लसूण (Garlic) बाजारात आल्याने भारतीय लसणाला समाधानकारक भाव मिळत नाही. त्यामुळे सरकारच्या या आयात धोरणाचा शेतकऱ्यांकडून (Farmer) पुन्हा एकदा निषेध होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या बाजारापेठांमध्ये भारतीय लसणाला समाधानकारक भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. पण इराण आणि चीनमधून लसूण बाजारपेठांमध्ये दाखल झाल्याने पुन्हा एकदा भारतीय लसणाला भाव मिळणार नसल्याचे लक्षात आल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
जळगाव बाजार समितीमध्ये सध्या मध्य प्रदेश आणि राजस्थान येथील बाजार समितीकडून या इराणी लसणाची आवक होत आहे. त्यामुळे हा लसूण खायला तितका चवदार नसतो. पण तरीही हा लसूण भारतीय लसणापेक्षा हा मोठा आणि सुंदर असतो. त्यामुळे त्याच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे. शिवाय याचे दरही भारतीय लसणाच्या दराइतकेच आहेत. त्यामुळे ग्राहक त्याला पसंती देत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
आधीच शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला त्याचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे आता हा विदेशी लसूण बाजारात आल्याने शेतकऱ्याचे अधिक नुकसान होणार असल्याचे शेतकरी संघटना नेते एस बी नाना पाटील यांनी सांगितले. सरकारकडून हे शेतकरी विरोधी धोरण असल्याचा आरोप करत कोणत्याही शेतमालाचा भाव वाढला की सरकार तो पाडण्यासाठी विदेशी माल आयात करते. तसेच निर्यात शुल्क देखील वाढवते, असा आरोपही नाना पाटील यांनी केला आहे. तसेच आता आपल्या शत्रू राष्ट्राकडून लसणाची आयात करुन लसणाचे दर पाडले जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.