Wednesday, July 24, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखपश्चिम आशियात अशांततेचे पर्व

पश्चिम आशियात अशांततेचे पर्व

इस्रायलमध्ये रविवारी सकाळ उजाडली ती भयानक हल्ल्यांची वार्ता घेऊनच. योम किप्पूरच्या लढाईत विजय मिळवल्याबद्दल रंगारंग कार्यक्रमात व्यस्त असलेल्या इस्रायलींवर हमासने अत्यंत निर्घृण असा हल्ला चढवण्यात आला. यामुळे हमासची निंदा करायचे सोडून काही मुस्लीम मतांचा अनुनय करणारे पक्ष चक्क हमासची बाजू घेऊन उभे राहिले आहेत. अर्थात याचा काहीही परिणाम इस्रायलवर होणार नाही आणि शिवसेना-उबाठाच्या विश्वप्रवक्त्यांनी जरी हमासच्या बाजूने बांग दिली असली तरीही त्यांना मुस्लिमांची मते मिळतील, याची काही खात्री नाही. सेव्ह गाजावाले आता अकलेचे तारे तोडत असले तरीही इस्रायल हमासच्या या कृत्याबद्दल त्याला शिक्षा घडवल्याशिवाय राहणार नाही आणि त्याने ते कार्य सुरूही केले आहे.

हमासवर अत्यंत चोख असे हल्ले चढवण्यात आले आहेत. इस्रायलने तर हमासचे म्हणजे गाझा पट्टीचे अन्न, पाणी आणि इतरही मदत तोडणार असल्याचे जाहीर केले आहे. इस्रायलने भीषण असे हल्ले चढवण्यास सुरुवात केली असून त्याची परिणती हमासच्या संपूर्ण नष्ट होण्यातच होणार आहे. कारण इस्रायल म्हणजे भारत नव्हे. पण पश्चिम आशियात पुन्हा अशांततेचे पर्व सुरू झाले आहे आणि यात कुणाची आहुती पडणार, हे सांगता येणार नाही. सारे जग यामुळे धास्तावले आहे. युद्ध तिकडे चालू आहे, मग आपल्याला काय, ही प्रवृत्ती आपल्याकडे खूप आहे. पण याचे परिणाम साऱ्या जगावर होणार आहेत आणि आपल्यालाही याचा फटका बसणार आहे. युद्धामुळे महागाई प्रचंड वाढणार आहे आणि आपली अर्थव्यवस्था जी अगोदरच संकटातून चालली आहे, तिला आणखी खाईत जावे लागणार आहे. पश्चिम आशिया हा प्रांत कधीच शांत नव्हता. कारण तेथे मुस्लीम राष्ट्रे इस्रायलला हरवण्यासाठी जंग जंग पछाडत. पण इस्रायल अमेरिकेच्या मदतीने पुरून उरेल. अजूनही काही विचारवंत संपादक वगैरे मंडळी इस्रायलवर टीका करणे हा आपला धर्म समजतात. तसे आताही चालू आहेच. पण भारताला इस्रायलचीच बाजू घ्यावी लागणार आहे. या विचारवंतांना खूश करण्यासाठी भारताने जर हमासला पाठिंबा दिला, तर उद्या हमास भारतात घुसून येथेही असाच उच्छाद मांडतील आणि सोडवण्याऐवजी ही विचारवंत संपादकमंडळी पळून जातील. तेव्हा भारताने खंबीरपणे इस्रायलच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.

शिवसेना उबाठाचे प्रवक्ते खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करत असतात. त्यांनी इंदिरा गांधी पॅलेस्टाईनचे नेते यासिर अराफत यांना कशा भाऊ मानत होत्या, वगैरे सांगितले. प्रत्यक्षात काश्मीरचा प्रश्न आला तेव्हा याच बंधुराजांनी काश्मीरच्या विरोधात कौल दिला होता. त्यावेळी त्यानी प्रथम मी मुस्लीम आहे आणि मग नंतर बाकी माणूस वगैरे सांगितले होते. पण अराफत यांचे आपल्याकडे स्वागत वगैरे झाले होते. काँग्रेस मुस्लीम मतांसाठी म्हणून हमास आणि पॅलेस्टाईन यांची बाजू घेत आले आहेत. पण इस्रायल हाच आपला खरा मित्र आहे. इस्रायलने भारताशी संबंध नसतानाही भारताच्या मदतीसाठी शस्त्रे आणि दारूगोळा पाठवला होता. ते असो. पण हमासच्या पाठीशी आज जे पुरोगामी पत्रकार आहेत त्यांना हे माहीत आहे की, उद्या हमास हीच खेळी भारतातही खेळणार आहे.

वास्तविक हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धाची पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे. इस्रायलमधील जेरूसलेम येथील ३५ एकर जागा ही ख्रिश्चन, मुस्लीम आणि यहुदी या तिन्ही धर्मियांसाठी अत्यंत पवित्र आहे. त्यामुळे त्या जागेवरील ताबा सोडण्यास तिन्ही धर्म तयार होणार नाहीत. हा संघर्ष असा धार्मिकही आहे. मुस्लीम राष्ट्रांनी जसा हवा तसा समझोता घडवून आणला असता तर हा संघर्ष इतका पेटला नसता. पण ते झाले नाही. मुस्लीम राष्ट्रांनी टाळाटाळ केली. त्यामुळे इस्रायल अमेरिकेच्या मदतीने मुस्लीम राष्ट्रांशी लढत राहिला. काही पत्रकारांनी जे स्वतःला फार मोठे विचारवंत वगैरे म्हणवतात, त्यांनी इस्रायलला पडद्याआडचा खलनायक वगैरे म्हटले आहे. त्यांच्या म्हणण्याकडे फार लक्ष देण्याची काहीच गरज नाही. पण त्यांच्या विचारांमुळे येथेही हमास आणि पॅलेस्टाईनसाठी सहानुभूतीदार तयार होतात, ते चिंतेचे आहे. यापूर्वीही इस्रायलने नेहमीच हमासच्या हल्ल्यांना चोख उत्तर दिले आहे. आताही ते देतीलच. त्यात गाझा पट्टीतील निरपराध नागरिकांचा बळी जाणार, हे विधिलिखितच आहे.

गाझा पट्टी हा चिंचोळा प्रदेश असून तेथे लोकसंख्या मात्र लाखो आहे. त्यामुळे लहानशा हल्ल्यातही ठार झालेल्यांची संख्या प्रचंड असते. तेच आता चालू आहे. इस्रायलवर झालेल्या भीषण हल्ल्यांकडे पाहायचे नाही आणि हमास आणि गाझावरील हल्ल्यांबाबत बोलायचे हे डावे पत्रकार नेहमीच धोरण ठेवत असतात. आताही त्यांनी तेच केले आहे. त्यांचे ढोंग आता समोर येते आणि त्यांच्या ढोंगाला कुणी बळी पडत नाही, हेच सुदैव आहे. पूर्वी चीनने भारतावर हल्ला केला तेव्हा चीनला पाठिंबा देताना भारतीयांची अन्यायातून सुटका करण्यासाठी चीनने हल्ला केला आहे, असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. इस्रायल त्याच्यावरील हल्ल्याचा बदला घेईल. पण त्या निमित्ताने भारतात जी पुरोगाम्यांची बडबड सुरू आहे, ती चिंताजनक आहे. इस्रायलची गुप्तचर संघटना ही सर्वात खतरनाक समजली जाते आणि तिलाही या हल्ल्याची जराही कुणकुण लागली नाही, याबद्दल सारे जग आश्चर्य व्यक्त करत आहे. इतकेच नव्हे तर इस्रायलने विकसित केलेली अँटी मिसाईल यंत्रणा ही परवा साफ अपयशी ठरली. याचाही इस्रायलला फटका बसला आहे. पण आता इस्रायलने हमासला खतम करण्याचा इरादा केला आहे आणि पंतप्रधान नेतान्याहू यांनी तर युद्धाचे इरादे जाहीर केले आहेत. आता हमास आणि त्यांच्या साथीदारांना त्राही माम करत इश्वराचा धावा करण्याची वेळ येणार आहे, हे निश्चित आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -