अजित पवार गटाचा मोठा निर्णय
मुंबई : राष्ट्रवादीत (NCP) पडलेल्या फुटीमुळे राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या. अजित पवार सत्तेत सामील झाले तर शरद पवार कायम विरोधी भूमिकेत राहिले. सुरुवातीला ही कोणतीही फूट नसल्याचे वारंवार सांगण्यात आलेले असले तरी निवडणूक आयोगात सुरु असलेल्या पक्ष व चिन्हाच्या लढाईमुळे आणि करण्यात येत असलेल्या दावे प्रतिदाव्यांमुळे ही फूटच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच आता अजित पवार (Ajit Pawar) गटाने एक मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवार (Sharad Pawar) जिथे सभा घेतील त्या ठिकाणी उत्तरसभा घेणार नाही, असं अजित पवार गटाने ठरवलं आहे. त्याऐवजी पक्षसंघटनेवर भर देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.
पक्षात फूट पडल्यापासून आपल्याकडे जास्त आमदार असल्याचा दावा दोन्ही गट करत आहेत. यासंबंधीची सुनावणी निवडणूक आयोगात सुरु आहे. काल झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाने युक्तिवाद करत शरद पवारांवर थेट आक्षेप घेतले होते. तर पुढील सुनावणीत ९ नोव्हेंबरला शरद पवार गट आपला युक्तिवाद मांडणार आहे. त्यामुळे अजित पवार गटाने जोरदार हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. आमदारांचे मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यावर अजित पवार गटाकडून लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
अजित पवार गटातील मंत्र्यांना वरिष्ठांकडून पक्षातील आमदारांची खात्यांसंदर्भातील कामे तात्काळ करून देण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. उत्तर सभा घेण्यापेक्षा पक्ष संघटनेवर आणि तळागाळातील मतदार पक्षासोबत जोडण्यावर भर देण्याचा अजित पवार गटाने निर्णय घेतला आहे. तालुका, विभागीय मेळावे घेणे, जिल्हास्तरीय बैठकांचे आयोजन करण्यावर भर देण्याच्या सूचना मंत्र्यांसह आमदारांनाही देण्यात आल्या आहेत.
शरद पवारांच्या राज्यभरात सभा होत आहेत तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून संघटनात्मक बांधणीवर भर दिला जातोय. अजित पवार गटाने आपल्या नऊ मंत्र्यांवर राज्यभरातील विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे. यामध्ये नवे कार्यकर्ते पक्षात घेणे, विद्यमान नेते आणि पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन करणे अशा जबाबदाऱ्या असणार आहेत.
कोणत्या मंत्र्यावर कोणत्या जिल्ह्याची जबाबदारी?
- अजित पवार – पुणे, सातारा, सांगली व सोलापूर
- प्रफुल पटेल – भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती व नागपूर
- छगन भुजबळ – नाशिक, मुंबई शहर व मुंबई उपनगर
- दिलीप वळसे पाटील – अकोला, वाशीम, छत्रपती संभाजीनगर व बुलढाणा
- हसन मुश्रीफ – कोल्हापूर, सिंधुदूर्ग आणि अहमदनगर
- धनंजय मुंडे – बीड, परभणी, नांदेड, आणि जालना
- संजय बनसोडे – हिंगोली,लातूर आणि उस्मानाबाद
- आदिती तटकरे -रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर
- अनिल पाटील – जळगाव, धुळे आणि नंदुरबार
- धर्मारावबाबा आत्राम – गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्हयांची जबाबदारी
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra