सेवाव्रती: शिबानी जोशी
तो १९७०-७२ चा काळ होता. त्यावेळी नुकत्याच बँका राष्ट्रीयीकृत झाल्या होत्या. तसेच बँकांच्या शाखाही फार कमी ठिकाणी उपलब्ध होत्या. ग्रामीण भागात तर जिथे एखाद् दुसऱ्या बँकेची शाखा होती, अशा ठिकाणी सुद्धा पांढरपेशा, मध्यमवर्गीय, सरकारी नोकर, उच्चशिक्षित लोकांचे जाणे-येणे असे; परंतु तळागाळातील, कामगार, वंचित, रोजंदारी करणाऱ्यांना बँकेत पाऊल टाकायलाही संकोच वाटत असे. त्यामुळे गरीब वर्गातील समाज हा बँकांकडे क्वचितच वळत असे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते ‘कमी तेथे आम्ही’ या तत्त्वावर समाजातल्या विविध समस्या सोडविण्यासाठी नेहमीच कार्यतत्पर असतात. समाजातला खूप मोठा वर्ग या स्तरातला असल्यामुळे त्यांनाही बँकिंग सुविधा नजीक उपलब्ध व्हावी, यासाठी ठाण्यातले काही संघ कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी एका छोट्या जागेत दि ठाणे जनता सहकारी बँक लि.ची ५ फेब्रुवारी १९७२ रोजी स्थापना केली. सुरुवातीला जागेची वानवा होती. त्यामुळे ठाण्यातील एका प्रिंटिंग प्रेसमध्ये एका छोट्या टेबलावर चार कर्मचारी व सीईओ सखाराम आगाशे यांच्या सहाय्याने बँक सुरू झाली.
कै. भगवानराव पटवर्धन हे संघ कार्यकर्ते स्वतः सनदी लेखापाल म्हणजे सीए होते. त्यांनी अध्यक्षपद स्वीकारून या कामाला सुरुवात केली. इथे कोणीच मालक ठेवायचा नव्हता, त्यामुळे सहकारी तत्त्वावर बँक सुरू झाली. पटवर्धन यांना नंतर केळकर, प्रभुदेसाई यांच्यासारखे भविष्याचा वेध घेऊन नवनवीन आव्हान स्वीकारणारे सहकारी लाभले. तीच परंपरा आजही सुरू असून आजही समाजातल्या विविध क्षेत्रांतले धुरिण संचालक मंडळात असल्यामुळे विविध अंगाने बँकेचा विकास तसेच नवनवीन योजना राबवल्या जात आहेत. बँकेच्या ठेवी १९९३ साली शंभर कोटींच्या आसपास होत्या. म्हणजेच साधारण वीस वर्षांत बँकेने रु. शंभर कोटी ठेवींचा पल्ला गाठला होता आणि मार्च २०२३ ला बँकेच्या ठेवी रु. १३७४३ कोटी झाल्या आहेत. ही मोठी घोडदौडच म्हणायला हवी. पहिल्या दिवसापासूनच बँकेचे कोणतेही संचालक व त्यांचे नातेवाईक कर्जदार किंवा जामीनदार राहणार नाहीत हे अलिखित तत्त्व बँकेच्या संचालक मंडळाने पाळले.
सहकार क्षेत्रात याच मुद्द्यावरून अनेक वादग्रस्त प्रकरणे निर्माण झाली आणि त्यामुळे रिझर्व्ह बँकेने हा नियम केला. त्यानंतर भ्रष्टाचाराला आळा बसण्यासाठी रिझर्व्ह बँकेने त्याचे कायद्यातही रूपांतर केले; परंतु टीजेएसबी बँकेत ते तत्त्व पहिल्या दिवसापासूनच पाळले जात आहे, हे बँकेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणता येईल आणि त्यामुळेच ग्राहकांचा बँकेवरचा विश्वास वाढतच गेला आहे. आज वैद्यकीय क्षेत्रापासून सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाला अतिशय महत्त्व आहे. हे बँकेच्या संचालक मंडळाने पहिल्या दिवसापासूनच ओळखले होते. त्यामुळे १९९८ सालीच नौपाडा शाखेमध्ये पहिले एटीएम केंद्र सुरू झाले. ‘क्यूआरकोड’ सुरू करणारी संपूर्ण देशामध्ये टीजेएसबी ही पहिलीच सहकारी बँक ठरली आहे.
बँकेला २००७ साली आपला व्यवसाय वाढविण्याची चांगली संधी मिळाली. पुण्यातील दोन छोट्या बँकांचे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह बँकेमध्ये विलीनीकरण करण्यात आले. दि सद्गुरू जंगली महाराज सहकारी बँक लि. आणि दि नवजीवन सहकारी बँक लि. या दोन छोट्या बुडीत बँका विलीन केल्यामुळे एकाच वेळी १७ शाखांची वाढ झाली. त्याच सुमारास म्हणजे २००८ या वर्षी बँकेला ‘मल्टी स्टेट ऑपरेटिव्ह बँक’ असा दर्जा मिळाला आणि महाराष्ट्र राज्याच्या बाहेर शाखा उघडण्याची परवानगी मिळाली. इतर राज्यांमध्ये शाखा सुरू झाल्यामुळे बँकेचे नाव ‘दि ठाणे जनता सहकारी बँके लि.’ ऐवजी ‘टीजेएसबी सहकारी बँक लि.’ असे सुटसुटीत करण्यात आले. आज टीजेएसबी बँकेच्या महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात आणि गोवा अशा पाच राज्यांमध्ये १३६ शाखा विखुरल्या आहेत. त्यानंतर बँकेचे प्रामाणिक काम तसेच दरवर्षी मिळत असलेला नफा इत्यादी गोष्टी पाहून रिझर्व्ह बँकेकडून बँकेला परकीय चलन व्यवसायाचा ‘आथराईज्ड डिलर कॅटेगरी-I’ म्हणून कायमचा परवाना मिळाला. त्याशिवाय बँकेच्या ग्राहकांना विमा संरक्षण मिळावे यासाठी एका विमा कंपनीबरोबर बँकेने करारही केला आहे. अशा प्रकारचा करार करणारी टीजेएसबी बँक ही देशातील पहिलीच सहकारी बँक ठरली आहे.
‘क्रसिल’ ही आर्थिक व्यवहार क्षेत्रातील नामांकन करणारी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. या संस्थेकडून स्वतःचं नामांकन करून घेणारी सुद्धा टीजेएसबी बँक ही देशातील पहिली सहकारी बँक ठरली आहे. खरं तर अशा प्रकारचा रिझर्व्ह बँकेचा काहीही नियम नाही; परंतु तरीही आपण कुठे आहोत? किंवा आपल्यात काळानुरूप काय सुधारणा घडवण्याची गरज आहे, हे लक्षात येण्यासाठी बँकेने क्रिसिलकडून मूल्यमापन करून घेतले आहे. बँकेची अद्ययावतीकरण, उच्च तंत्रज्ञानाचा वापर असे निकष पाहता बँकेला ‘आयबीए’ (इंडियन बँक्स असोसिएशन)कडून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अगदी यंदा सुद्धा महाराष्ट्र सहकारी बँक फेडरेशनच्या वतीने ५००० कोटींपेक्षा अधिक ठेवी वर्गात ‘बेस्ट बँक ऑफ द इयर – रनर अप’ हा पुरस्कार ‘टीजेएसबी’ बँकेला मिळाला आहे.
सरकारी आर्थिक व्यवहार हे मुख्यत्वे स्टेट बँक किंवा राष्ट्रीयीकृत बँकांतूनच होताना आपण पाहतो; परंतु टीजेएसबीची एकूण कामगिरी, तंत्रज्ञान व कार्यपद्धत पाहता गोवा राज्य सरकारने त्यांचा वीज बिल भरणा करण्यासाठी टीजेएसबी बँकेत भरण्याची परवानगी दिली आहे. म्हणजे सहकारी बँक असूनही सरकारी कामकाज करण्याची बँकेला त्यामुळे संधी प्राप्त झाली. ते काम पाहून गोवा राज्य सरकारच्या पीडब्ल्यूडी विभागाची कामे सुद्धा आता टीजेएसबी बँकेत होतात. त्यानंतर मुंबईत बेस्टची बिले भरण्याचे सुद्धा काम टीजेएसबी बँकेला मिळाले आहे.
बँकेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, १९७२ साली स्थापना झाल्यापासून आजतागायत बँक कायमच नफ्यात राहिली आहे आणि शेअर होल्डर्सना कमीत कमी १५ टक्के डिव्हिडंड देत आली आहे. आज बँकेत सर्व शाखांत मिळून सोळाशे कर्मचारी, अधिकारी कार्यरत आहेत. बँकेचे नुकतेच सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे झाले. एखादी सहकारी बँक पन्नास वर्षे तीव्र स्पर्धा असतानाही सतत नफ्यात राहत बँकिंग क्षेत्रातील सर्व घडामोडींबरोबर पुढे जात सातत्य राखते ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षात बँकेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात अध्यक्षांनी बँकेला यश मिळण्याची ४-५ सूत्रे सांगितली होती. त्यांचे पालन केल्यामुळे बँक आज सतत नफ्यात आहे. सर्वात प्रथम म्हणजे बँकेच्या संचालक मंडळातील कोणीही व्यक्ती/त्यांचे नातेवाईक कर्जदार किंवा जामीनदार राहात नाहीत. त्यामुळेच विश्वासार्हता राखली पाहिजे, हे सुद्धा एक तत्त्व पाळले जाते.
तिसरे तत्त्व म्हणजे बँक आज ग्राहकांकरिता फिजिकली आणि डिजिटल दोन्ही माध्यमांतून सेवा देत आहे. चौथे तत्त्व म्हणजे ग्राहकांना युनिक सोल्युशन उपलब्ध करून देणे. या तत्त्वांमुळेच टीजेएसबी सतत नफ्यात चालणारी आणि ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरणारी बँक ठरली आहे. बँकेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सीएसआर फंड, कॉर्पोरेट सोशल रिस्पोंसिबिलिटी हा प्रकार सरकारने नुकताच आणला; तिथेही स्थापनेपासूनच बँक याचे पालन करत आहे. केवळ नफ्यासाठी नाही तर लोकांच्या उपयोगासाठी बँकेची स्थापना झाल्यामुळे आपल्या नफ्यातील काही भाग समाजासाठी कार्य करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्थांना बँक देत आली आहे. बँकेची निर्मितीच संघ विचारसरणीने समाजाच्या विकासाचा हेतू मनात ठेवूनच झाली होती. निव्वळ नफा कमवणे हा हेतू बँकेचा कधीच नव्हता. त्यामुळे आपण जे काही कमावतो त्यातील काही भाग समाजासाठी देण्याची प्रथा बँकेत पहिल्या वर्षापासूनच पाळण्यात आली आहे. ‘भरोसे का बँक, भविष्य का बँक’ हे बँकेचे ब्रीदवाक्य आहे, पन्नास वर्षे ते बँकेने तंतोतंत निभावलं आहे. भविष्यात बँक टीसीएस या देशातील नामवंत कंपनीचे बँकेकरिता बीएएनसी सीबीएस (कोअर – मुख्य गाभा – बँकिंग प्रणाली) लागू करण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे सर्व ग्राहकांना अधिक तत्पर ग्राहकाभिमुख सेवा मिळणार आहे.
joshishibani@yahoo. com