
मुंबईकरांना करावा लागणार ब्लॉकचा सामना... जाणून घ्या याचे कारण
मुंबई : पश्चिम रेल्वेने (Western Railway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रतिक्षित असलेली मुंबई सेंट्रल (Mumbai Central) ते बोरिवली (Borivali) ही सहावी मार्गिका जोडण्यासाठी पश्चिम रेल्वेवर (Western Railway) दहा दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. २५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत हा ब्लॉक लागू राहील. शिवाय या काळात २५० लोकल आणि ६१ मेल एक्सप्रेसही रद्द केल्या जाणार आहेत.
गेल्या १५ वर्षांपासून सहाव्या मार्गिकेचे काम रखडले आहे. अखेर यावर्षी ७ ऑक्टोबरपासून या कामाला सुरुवात करण्यात आली. सध्या प्राथमिक काम सुरू असून मुख्य काम दसऱ्यानंतर म्हणजेच २५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. त्यामुळे या काळात घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमध्ये रोज सरासरी २५० लोकल तर ६१ मेल एक्सप्रेस रद्द करण्यात येणार आहेत. यामुळे दसऱ्यानंतर पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थोडी कळ सोसावी लागणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, या दहा दिवसांत लोकल फेऱ्या उशीराने धावणार आहेत. मात्र, मुंबई लोकलवर कमीत कमी परिणाम होईल असं नियोजन रेल्वे अधिकाऱ्यांनी केलं आहे. रूळजोडणीच्या कामासाठी रुळांवरील वाहतूक थांबवणं गरजेचं आहे. मुंबई लोकल सलग काही दिवस बंद ठेवणं शक्य नसल्यानं ब्लॉककाळात काही लोकल आणि मेल-एक्स्प्रेस फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.
लोकल फेऱ्यांच्या एकूण क्षमतेत होणार २० टक्क्यांची वाढ
सहाव्या मार्गिकेमुळे लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सध्याच्या लोकल फेऱ्यांच्या एकूण क्षमतेत २० टक्क्यांची वाढ होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या नव्या मार्गिकेची सध्याच्या रुळांवर जोडणी देण्याचं काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी केली जाईल व तपासणीनंतर लोकलच्या फेऱ्या चालवण्यात येतील.