
क्रॉस, ओव्हल मैदानावर घेणार दसरा मेळावा
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची (Shivsena Dasara Melava) जोरदार चर्चा सुरु आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी शिवसेनेची सुरुवात शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेऊनच केली होती. तेव्हापासून आजतागायत ही दसरा मेळाव्याची परंपरा कायम आहे. मात्र, गेल्यावर्षी शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे शिवाजी पार्कवर मेळावा कोणाचा होणार, हा प्रश्न आहे. गेल्यावर्षी ठाकरे गटानेच (Thackeray Group) आपला मेळावा शिवाजी पार्कवर घेतला होता. तर यंदाही शिवाजी पार्कसाठी दोन्ही गटांनी मुंबई महापालिकेकडे अर्ज केले होते.
दोन्ही गटांपैकी कोणी पहिला अर्ज दिला याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही, किंबहुना पालिकेनेही तात्काळ निर्णय देण्याचे टाळले. त्यामुळे ठाकरे गट आक्रमक पावित्रा घेण्याच्या तयारीत होता. आम्हाला शिवाजी पार्क दिले नाही तर कोर्टात जाऊ, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. दसरा मेळाव्याच्या शुभप्रसंगी यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांच्या शिवसेनेने हे वेळीच ओळखून मनाचा मोठेपणा दाखवला आहे. शिवसेनेचा यंदाचा मेळावा क्रॉस किंवा ओव्हल मैदानावर होईल, अशी माहिती शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचे राजकारण केले जात होते. मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले की, शिवसेनेचा दसरा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस आणि ओव्हल मैदानावर होणार आहे. आम्हाला उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) भांडायचं नाही. त्यांना फक्त सहानुभूतीचं राजकारण करायचं आहे. आम्ही सहानुभूतीचं राजकारण करत नाही, विकासाचं राजकारण करतो. त्यामुळेच वादात न जाता शिवाजी पार्कऐवजी दुसरं मैदान आम्ही घेतलेलं आहे. दसरा मेळाव्यासाठी आम्ही महापालिकेकडे केलेला अर्ज मागे घेतला आहे. ठाकरे गट स्वत:च राजकारण करतो आणि स्वत:च प्रसिद्धी मिळवतो, हे आता जनतेनं ओळखावं, असा टोलाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लगावला. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेकडून अद्याप शिवाजी पार्क मैदानाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शिवसेनेने एक पाऊल मागे घेत जरी दसरा मेळाव्याचं ठिकाण बदललं असलं तरी, ठाकरेंना शिवाजी पार्कात दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.