
काय आहे नेमकं प्रकरण?
कोल्हापूर : कोल्हापूर येथील अंबाबाईच्या मंदिराबाहेर (Kolhapur Ambabai Mandir) खाजगी दुकानदारांनी लावलेल्या चप्पल स्टँडवरुन (Chappal Stand) मोठा वाद निर्माण झाला आहे. या मंदिराबाहेर अनेक खाजगी दुकानदारांनी आपले स्टॉल्स, चप्पल स्टँड लावलेले आहेत. आज महानगरपालिकेने कारवाई करत हे स्टँड हटवले. त्यामुळे या परिसरात मोठा गोंधळ झाला. शिवाय कोणतीही नोटीस न देता हे स्टँड हटवण्यात आले, असा आरोप खाजगी दुकानदारांनी केला आहे.
अंबाबाई मंदिराच्या भिंतीला लागून जे खाजगी चप्पल स्टँड होते ते काढण्यासाठी महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केली. नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिराची मूळ भिंत जशीच्या तशी दिसली पाहिजे या मागणीकरता हे पथक याठिकाणी दाखल झालं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांनी ही मागणी केली होती.
मंदिराच्या मूळ भिंतीलाच लागून हे स्टँड असल्याने मंदिराचं मूळ रुप झाकलं जात आहे, त्यामुळे हे स्टँड दुसरीकडे शिफ्ट करण्यात यावेत, अशी मागणी भाविकांनी केली होती. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने अधिकृतरित्या एक नवीन चप्पल स्टँड तयार करण्यात आलं होतं. या स्टँडचा वापर करण्यात यावा, असं आवाहन करण्यात आलं होतं. यामुळेच खाजगी दुकानदारांना त्या ठिकाणाहून हटवण्यात आलं. मात्र, याला खाजगी दुकानदारांनी प्रचंड विरोध केला आणि वादाची परिस्थिती निर्माण झाली.
अंबाबाई मंदिराच्या परिसरात चप्पल स्टँड लावणार्या महिलांनी कारवाई करणार्या पोलिसांवर आरोप केले. पोलिसांनी त्यांना मारल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आमचं अख्खं कुटुंब या दुकानांवर चालतं त्यामुळे आमची दुकाने हटवल्यास आम्ही जायचं कुठे, असा प्रश्न दुकानदारांनी उपस्थित केला. अनेक वर्षांपासून आमची दुकाने इथे आहेत, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.