निवडणूक आयोगात अजित पवार गटाचा जोरदार युक्तिवाद
मुंबई : राज्यात राष्ट्रवादी पक्षातून (NCP) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) काही आमदारांना घेऊन बाहेर पडले त्यावेळेस ही फूट नसल्याचे वारंवार सांगण्यात येत होते. शरद पवारांनी (Sharad Pawar) देखील अजित पवारांनी केवळ वेगळी भूमिका घेतली मात्र कोणतीही फूट पडलेली नाही, असं म्हटलं होतं. मात्र, आता हे दोन्ही गट निवडणूक आयोगात आमनेसामने आले आहेत आणि युक्तिवाद करत आहेत. प्रत्येक गट राष्ट्रवादी हा आमचाच पक्ष आहे आणि चिन्हदेखील आमचंच आहे, यावर ठाम आहे. त्यामुळे कितीही नाकारलं तरी ही राष्ट्रवादीतील फूटच असल्याचं स्पष्ट झालं आहे.
अजित पवार गटाकडून आजच्या सुनावणीत तर थेट शरद पवारांवर आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यामुळे हा संघर्ष चांगलाच वाढला असल्याची ही चिन्हे आहेत. अजित पवार गटातून नीरज किशन कौल (Neeraj Kishan Kaul) आणि मनिंदर सिंह (Maninder Singh) हे युक्तिवाद करत आहेत. त्यांनी म्हटले की, पक्षाच्या अंतर्गत कामात लोकशाहीचा अभाव असल्याचं सांगत एकच व्यक्ती पक्षावर अधिकार गाजवू शकत नाही. राष्ट्रवादीमध्ये हेच सुरू होतं. शरद पवार घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवत होते, पक्षात लोकशाहीचा अभाव होता. तसेच आमदारांची संख्या आपल्याकडे मोठी आहे, त्यामुळे पक्ष आमचाच आहे असा दावाही त्यांनी केला.
राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) हे आमच्यासोबत असून त्यांच्या सहीनेच नवीन नियुक्त्या करण्यात आल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र विधानसभेचे ५३ पैकी ४२, विधानपरिषदेचे ९ पैकी ६ आणि नागालँडमध्ये ७ पैकी ७ असे ५५ आमदार आमच्या पाठिशी, तर लोकसभेत ५ पैकी १ आणि राज्यसभेतील ४ पैकी १ खासदार आमच्यासोबत आहेत, असा दावा गेल्या सुनावणीच्या वेळी अजित पवार गटाकडून करण्यात आला होता. आज अजित पवार गटाचा युक्तिवाद संपल्यानंतर शरद पवार गटाकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे.
अजित पवार गटाने युक्तिवादात काय मुद्दे मांडले?
- शरद पवार घराप्रमाणे पक्ष चालवत होते.
- शरद पवार स्वतः निवडून आले नाहीत ते इतरांच्या नेमणुका कशा करू शकतात?
- निवडणूक न घेताच पवारांची अध्यक्षपदी निवड, त्यांच्या अध्यक्षपदावर आजही आक्षेप.
- शरद पवारांची निवड नियमांना धरुन नाही.
- अजित पवार गटाकडून सादिक अली केसचा दाखला देण्यात आला. या केसमध्ये आमदारांच्या संख्येला महत्व देण्यात आलं होतं.
- वारंवार शिवसेनेच्या केसचाही उल्लेख करण्यात आला.
- राष्ट्रवादी पक्षाच्या घटनेनुसार काम झालं नाही.
- आमच्याकडे एक लाखांहून अधिक शपथपत्रं आहेत, तर शरद पवार गटाकडे चाळीस हजार शपथपत्रं देखील नाहीत.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra