अरियलूर: तामिळनाडूच्या(tamilnadu)अरियलूर जिल्ह्यात सोमवारी एका फटाका कंपनीत लागलेल्या भीषण आगीत(fire) तब्बल १० जणांचा मृत्यू झाला तर १३ इतर जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी आपल्या विधानात या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त करताना त्यांच्या कुटुंबियांसाठी मदतीची घोषणा केली आहे.
ही घटना तामिळनाडूच्या विरालगुर गावातील एका खासगी फटाका कंपनीत झाली. फॅक्टरीमध्ये आग कशी लागली याचे कारण शोधले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ५ जखमी लोकांवर तंजावूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा
मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबाला प्रत्येकी तीन लाख रूपये तर गंभीर जखमींना एक लाख रूपये आणि साधारण जखमी झालेल्या लोकांना प्रत्येकी ५० हजारांची मदतीची घोषणा केली आहे.
प्राथमिक तपासामध्ये मिळालेल्या माहितीनुसार तेथे देशी फटाके तसेच अत्यंत ज्वलनशील रसायने होती. ही रसायने सांभाळताना घर्षणामुळे स्फोट झाला. यामुळे भीषण आग लागली. आगीत होरपळल्याने मृतदेह ओळखणेही कठीण झाले होते.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि अनेक तासांच्या प्रयत्नांनतर तेथे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. या आगीत एक टेम्पो ट्रॅव्हलर आणि दुचाकी वाहनांसह अनेक वाहने जळून खाक झाली.