सुप्रसिद्ध पटकथाकार रोहिणी निनावे यांनी ‘गजाली’ कार्यक्रमानिमित्त नुकतीच दै. प्रहारच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी या प्रतिभावान नि हसतमुख लेखिकेशी साऱ्यांच्या गप्पा रंगल्या. अभिरुचीसंपन्न प्रेक्षकांसाठी व लहानांसाठी त्यांना लिखाण करायची इच्छा आहे, नाटकही लिहायचेय’, असे सांगत त्यांनी आपल्या लेखन कारकिर्दीबद्दल मनमोकळा संवाद साधला. याप्रसंगी दैनिक ‘प्रहार’चे महाव्यवस्थापक मनीष राणे, संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांनी त्यांचे स्वागत केले.
दार हे माझे आनंदाचे,
दाराशी सुरेख नक्षी
जोडीत जाती मनामनाला
नात्यांचे हळवे पक्षी…
साध्या, सुंदर शब्दांमधली ही सुरेखता, हे हळवेपण संवेदनशील माणसाला खिळवून ठेवू शकले नाही तरच नवल! नाटक सुरू होताना तिसरी घंटा झाली की, सरसावून बसणाऱ्या प्रेक्षकांप्रमाणे टीव्हीसमोरचा प्रेक्षकसुद्धा नात्यांचे कोणते बंध आज आपल्याला उलगडून दाखवले जाणार आहेत हे पाहण्यासाठी सर्व टेन्शनच्या पट्ट्या बांधून मनोरंजनाच्या आकाशात विहार करण्यासाठी सज्ज होतो. कारण समोरच्या त्या छोट्या पडद्यावर साकारणार असते आयुष्यातील सुख दु:खांच्या, चढ-उतारांच्या रंगांनी सजलेली सुबक, सुंदर ठिपक्यांची रांगोळी… मग टीव्हीवर सरकत जाणाऱ्या चित्रांमध्ये ‘आई कुठे काय करते?’ या प्रश्नावर ‘आई बरंच काही करते’ हे उत्तर मिळत जातं. आपल्याच नवऱ्याच्या बायकोला कसं वागवायचं याचे धडे मिळतात. आपल्या सासूला ‘आई’ म्हणून नुसतं हाक नाही मारायचं, तर तिच्या आयुष्यातसुद्धा आनंद कसा पेरायचा यांचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं. नात्यांचे हे अलवार बंध प्रेक्षकांचा ठाव घेत जातात. त्यांना नायक, नायिका अगदी घरात आग लावणारी खलनायिका सुद्धा आपल्याच घरातील वाटू लागतात. या आपलेपणाच्या भावनेचे छोट्या पडद्यावरचे किमयागार अनेक असतात. यातच एक नाव आहे, रोहिणी निनावे… बस्स नाम ही काफी है.
वर उल्लेखिलेल्या आपल्याच गीतातील शब्दांप्रमाणे तब्बल २७ वर्षांच्या कारकिर्दीत प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करून रोहिणी त्या शब्दांच्या किमयागार कशा आहेत हेच सिद्ध केलं आहे. नात्यांचे हळवे धागे शब्दांमधून गुंफताना ‘पुस्तकं वाचतो तशी माणसं वाचता आली पाहिजेत,’ हे त्याचं सूत्र फार उपयोगी ठरलं. त्यांच्या कारकिर्दीविषयी ‘दैनिक प्रहार’च्या ‘गजाली’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या तेव्हा शब्दाशब्दांतून त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा प्रत्यय येत होता. लिखाणाची सवय त्यांना लहानपणापासूनच होती. पण घरात वडील साहित्यिक असल्यामुळे त्यांनी कुठे आपल्या कवितांसोबत मुलीचीही कविता छापून आणली, तर त्याचं फार कौतुक लहानग्या रोहिणीला कधी वाटलं नाही. नोकरीसुद्धा मिळाली ती त्यांच्या लिखाणासाठी पोषक ठरलेल्या महाराष्ट्राच्या जनसंपर्क कार्यालयात. तिथे त्यांनी २० वर्षं नोकरी केली. दरम्यान ‘महाराष्ट्र मानस’ या जनसंपर्क कार्यालयाच्या हिंदी नियतकालिकाच्या त्या उपसंपादक आणि मग संपादक म्हणून जबाबदारी पेलत होत्या. नंतर त्या गॅझेटेड ऑफिसर झाल्या. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहा मंत्र्यांच्या जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलं. या दरम्यान अनेक माणसं भेटत असल्याने माणसं वाचण्याची कला त्यांना इथेच अवगत झाली. याच काळात त्यांना गौतम अधिकारी यांनी एका पत्रकाराची १३ भागांची एक मालिका लिहायला सांगितली. रोहिणी त्यावेळी पत्रकारिता आणि शासन व्यवहार यात कामच करत होत्या. त्यामुळे त्यांनी सहजच हे भाग लिहून काढले. ‘सत्यता शोधण्या घेऊनी लेखणी’ अशा नि:स्पृह महिला पत्रकारावर त्यांनी ही कथा लिहिली होती. त्यांनी या मालिकेला ‘न्यायदेवता’ हे नाव पण दिलं होतं. पण सहा वर्षे यावर काहीच झालं नाही. पुढे दूरदर्शनने यावर मालिका करायचं ठरवलं आणि साकारली मराठीतील पहिली दैनंदिन मालिका ‘दामिनी’. त्या आधी मराठीत दैनंदिन मालिका नसल्यामुळे आणि हिंदीत ‘स्वाभिमान’ आणि ‘शांती’सारख्या थोडक्याच मालिका असल्यामुळे मराठीतील मालिकांचं पटकथा लेखनतंत्र सुद्धा रोहिणी यांनीच विकसित केलं. म्हणजे एका अर्थी रोहिणी निनावे या मराठी मालिकांच्या पटकथा लेखनातील ‘पायोनियर’ आहेत असं म्हटलं, तर वावगं ठरणार नाही.
‘दामिनी’ या पहिल्याच मालिकेत तब्बल साठ व्यक्तिचित्रं त्यांनी रेखाटली. हाही एक प्रकारचा विक्रमच. त्याचेही एक हजार पन्नास भाग त्यांनी लिहिले, हा दुसरा विक्रम. मग रोहिणी यांनी मागे वळून पाहिलं नाही. अनेक मालिका, शीर्षक गीते त्यांच्या लेखणीतून साकारली. काही मालिकांमध्ये अभिनयही केला. त्यांची लेखणी अजूनही चालतेच आहे. नुकतीच त्यांची ‘गोडा मसाला’ ही मालिका सुरू झाली आहे. तुमच्याकडे चिकाटी, मेहनत करण्याची तयारी, स्वत:वर विश्वास आणि काळाप्रमाणे स्वत:त बदल करण्याची क्षमता असेल तर या प्रवासात तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. दूरदर्शन ते आज शेकड्याने सुरू असलेल्या वाहिन्या यात त्या टिकून आहेत त्या याच गुणांमुळे.
एका वेळी किमान चार मालिकांच्या पटकथा त्या लिहितात. त्यात एका कथेचा परिणाम दुसऱ्या कथेवर होऊ द्यायचा नाही हा कटाक्ष त्या निगुतीने पाळतात. पहाटे पाच वाजता शांत आणि ताज्या वातावरणात लिखाण सुरू करतात, ते थेट दुपारी तीन वाजता त्यांची लॅपटॉप वरची बोटं थांबतात. पहाटे उठण्याच्या त्यांच्या सवयीचं वर्णन ‘सकाळ झाली, भैरू उठला, लिहायला बसला,’ असं त्या मिश्कीलपणे करतात. मराठी आणि हिंदी अशा दोन्हीमध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतल्यामुळे त्यांचं मराठी प्रमाणेच हिंदीही उत्तम आहे. मराठीत स्मिता तळवलकर यांच्या ‘अस्मिता चित्र’च्या मालिकांचं पटकथा लेखन जसं त्यांनी केलं तसंच सुरज बडजात्या यांच्या मालिकांचं लेखनही केलं. त्यांच्या मालिकांच्या मालिकेत दामिनी, अवंतिका, अवघाची संसार, माझ्या नवऱ्याची बायको, अग्गं बाई सासूबाई, मुलगी झाली हो, अजूनही बरसात आहे अशा गाजलेल्या मराठी मालिका तर कुसुम, संजीवनी, इस प्यार को मै क्या नाम दू, दिल से दिया वचन, प्यार का दर्द है, यहाँ मैं घर घर खेली या काही लोकप्रिय मालिका आहेत.
मनोरंजनाच्या कोणत्याही माध्यमात कंटेंट म्हणजेच लिखाण हा आत्मा असतो. असं असूनही मालिका लेखकांना अजूनही म्हणावा तसा सन्मान मिळत नाही. तब्बल ७२ मालिका, त्यांचे किमान १२ हजार भाग एवढी शिदोरी असतानाही रोहिणी यांच्या अनुल्लेखाची खंत आमच्यासारख्या त्यांच्या श्रोत्यांनाही हलवून जाते. आपल्या वडिलांचं स्वप्न साकार करणाऱ्या आणि आपल्या आईची शेवटपर्यंत सेवा करणाऱ्या रोहिणी यांना त्यांचेच शब्द सोबत करतात.
राती नंतर पहाट सुंदर,
घेऊन येईल सूर्य नवा
अंधारातून गर्द सावळ्या,
फिरून घेईन जन्म नवा…
(शीर्षक गीत – मन धागा धागा जोडते नवा)
जमेल तितके केले,
तरीही करणे उरले काही
नकोस येऊ मरणा,
अजुनी लिहिणे सरले नाही…
माझ्या अनेक वर्षांच्या प्रवासात चढउतार आले व त्यातून कडू गोड आठवणी घेऊन मी माझ्या लेखनाची, साहित्याची आवड जपत आहे, पुढेही जपणार आहे. गप्पांमध्ये रंगत त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि बोलण्यातून त्यांचा प्रवास उलगडत होता. अनेक मराठी वाहिन्यांवरून सर्व परिचित झालेलं नाव, हसऱ्या चेहऱ्याची अभिनेत्री, लेखिका म्हणून सर्वश्रुत असलेल्या रोहिणी निनावे प्रहार ‘गजाली’च्या कार्यक्रमात त्यांच्याशी झालेल्या गप्पा या त्यांच्यासारख्याच मनमोकळ्या भाषेत रंगल्या…
रोहिणी निनावे यांनी अवघाची संसार, अवंतिका, ऊन-पाऊस, अधुरी एक कहाणी, कळत नकळत, मन उधाण वाऱ्याचे, पुढचं पाऊल, मोलकरीण बाई, मुलगी झाली हो, माझ्या नवऱ्याची बायको या मराठी तसेच हिंदीमध्ये यहां मै घर घर खेली, प्यार का दर्द है, मै रंग मे रंगनेवाली या हिंदी, मराठी मालिका त्यांनी लिहिल्या.
इंतजार हा त्यांचा कवितासंग्रह असून त्याला गुलजार यांनी प्रस्तावना दिली. त्यांनी मराठी, हिंदी भाषेत एम.ए. केले. त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली ती शीर्षक गीतांनी. गौतम अधिकाऱ्यांनी पत्रकारिता या विषयावर कथा लिहायला सांगितली. ती कथा म्हणजे ‘दामिनी’. ही कथा लिहिल्यावर पाच वर्षांनी टीव्हीवर आली. ती पहिली दैनंदिन मालिका होती. अवंतिका ही मालिका त्यांच्या लेखन प्रवासातले नवीन वळण ठरली. यामध्ये अनेक दिग्दर्शकांशी त्यांची छान गट्टी जमली. त्या म्हणतात कलाकारांना जेवढा मान आहे तेवढा मान लेखकांना दिला पाहिजे. लेखकाची ही पडद्यामागची भूमिका असली तरी टीव्ही हे लेखकाचे माध्यम आहे, असे त्या म्हणतात. अभिरूची संपन्न प्रेक्षकांनी एकाकी माणसाचे आयुष्य यावर नाटक लिहिले आहे. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी आयुष्याला, मनाला प्रोत्साहित करणारी कविता म्हटली, कवितेच्या शेवटच्या प्रेरणादायक ठरणाऱ्या काही पंक्ती… रोज एक नेम कर, स्वत:वर प्रेम कर! सगळे ‘नाही’चे बांध तोडून, एकदा एकटी बाहेर पड, बिचारेपणाची कात टाकून तुझी तू नव्याने घड… या ओळींमधूनच खूप काही शिकायला मिळाले.
एखादी मालिका बघितल्याशिवाय अनेकांना चैन पडत नाही. जर त्याच वेळेस लाइट गेली किंवा कोणी मधे मधे आले, तर पारा चढलाच म्हणून समजा. इतके मालिकांनी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्या माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. मग त्या कोणत्याही भाषेतल्या असोत. प्रत्येक भाषेतील मालिकांना एक वेगळा बाज आहे. त्याला लेखकांनी चढवलेला एक साज आहे आणि तो इतका विलक्षण आहे की पाहणारा मोहरून जातो. पण ही मोहिनी कोणाची कलाकाराची, दिग्दर्शक, निर्मात्याची, की लेखकाची? असा प्रश्न सामान्य माणसाला पडल्याशिवाय राहत नाही. दै. प्रहारच्या ‘गजाली’ या कार्यक्रमात गप्पांचा फड रंगला आणि मालिकांच्या लेखिका, प्रभावी शीर्षक गीतकार, कवयित्री रोहिणी निनावे यांचीशी गप्पा मारताना या चंदेरी विश्वातले अनेक कंगोरे उलगडत गेले.
करमणूक ही माणसाची एक गरज बनली आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात मनाला थोडा विरंगुळा हवा असतो. त्यासाठी लोक अनेक दशकांपासून टीव्हीचा वापर करत आहेत. टेलिव्हिजनवर बातम्या सोडल्या, तर बहुतेक कार्यक्रम हे करमणुकीशी निगडित असतात. चित्रपट, गाणी, खेळ आणि मालिका हे लोकांना सगळ्यात आवडणारे. त्यांचा एक विशिष्ट चाहता वर्ग आहे. मालिकांविषयी बोलायचे झाले, तर त्या प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत. प्रत्येकजण या कलाकृतीसाठी कस पणाला लावतो, म्हणून मालिका जिवंत वाटतात. पण हे काही एकट्याचे काम नाही, हे खरे असले तरी लेखक मालिका जन्माला घालतात. त्यातील प्रत्येक पात्रात प्राण ओततात, म्हणून ती पात्र आपली वाटतात. आपल्या भावनांना त्याचे शब्द कवटाळतात आणि आपले भान हरपते, आपण नकळत त्यातले एक पात्र होऊन जातो. त्या विषयाशी, भावनांशी एकरूप होतो. खरं तर ही एक दैवी किमया आहे. लाखात एकालाच अशी प्रतिभा प्राप्त होते, म्हणजे सरस्वतीचा वरदहस्त डोक्यावरून फिरतो; परंतु अनेक वेळा मालिका गाजतात. त्या कलाकारांच्या अभिनयामुळे, त्याचे श्रेय कलाकांना मिळते आणि त्या जन्माला घालणारा लेख बाजूला राहतो. ही खंत लेखिका रोहिणी निनावे यांनी बोलून दाखवली. रोहिणी निनावे यांनी मराठी तसेच हिंदीमधील ‘दामिनी’, ‘अवंतिका’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘यहा मैं घर घर खेली’, ‘मेरे रंग मे रंगनेवाली’ अशा गाजलेल्या अनेक मालिकांचे लेखन केले.
नामवंत कालकारांनी त्यांच्या पात्रात रंग भरला. प्रेक्षकांनी त्या मालिकांना डोक्यावर घेतले. त्या गेल्या २७ वर्षे अविरतपणे पहाटे उठून मालिका लिहिण्याचे काम करतात. त्यांच्या दिवसाची सुरुवात त्या कथानकातील पात्रांच्या संवादातून सुरू होते. सलग ५०० दिवसांहून अधिक काळ, ५ वर्षे पात्र रंगवणे, एका वेळेस ४-५ मालिका लिहिणे, त्यांना भावस्पर्श देणे, त्यांना जिवंत ठेवणे, ही एक अग्निपरीक्षाच म्हणावी लागेल. इतरांची मनं प्रफुल्लित करण्यासाठी वेळ, काळ, ठिकाणाचे बंध झुगारून वैयक्तिक आयुष्याबरोबर दुजाभाव करणे हा एक देखील एक ‘त्याग’ आहे.
दोन तपांहून अधिक काळ रोज लिखाण करणाऱ्या तपस्विनीला सध्याच्या काही मालिकांमधला उथळपणा, भाषेचा बेभानपणे केलेला वापर, अशुद्धपणा, नाटकीपणा, भरकटलेपणाचा उबग आलाय. मालिकांमध्ये समाजाचे प्रतिबिंब उमटते. त्यामध्ये विचार असतो, प्रेक्षकांची आवड बदलते, जगण्याची दिशा बदलते, निर्मात्यांची मागणी बदलते, पैशांची गणितं जुळावावी लागतात, त्यासाठी प्रत्येक ठिकाणी तडजोड करावी लागते. इतके करूनही एवढे मोठे साम्राज्य जन्माला घालणाऱ्या लेखकांना कुठेतरी गृहीत धरले जाते. चौकटीत लिहावे लागते. या सुंदर भासमान विश्वात चाहत्यांना रमवण्यासाठी केवळ टीआरपीच्या मागे पळावे लागते, त्यावेळी गुणी लेखकांचे श्वास नक्कीच गुदमरतात, हेच खरे सत्य आहे!
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…