
नांदगाव : दीड महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील हिसवळ खुर्द ग्रामपंचायतीचे अनुसूचित जाती प्रवर्गातून कैलास फुलमाळी हे सरपंच झाले. पण, अविश्वास ठराव आणून त्यांना सरपंच पदावरून पायउतार करण्यात आले. मात्र त्यांनी शासकीय पातळीवर लढा दिला. रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक झाली. याच पोटनिवडणुकीत ते पुन्हा सरपंच झाले.
घटनेने दिलेल्या अधिकारापासून वंचित ठेवणाऱ्यांना आणि अविश्वास ठराव दाखल करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना सरपंच कैलास फुलमाळी यांनी चांगलीच चपराक दिली. दिड महिन्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत फुलमाळी यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा त्यांची सरपंच म्हणून नियुक्ती केली. नांदगाव तालुक्यातील ही घटना ऐतिहासिक घटना मानली जाते.
गमावलेले पद संवैधानिकरित्या परत मिळाल्याने सरपंच फुलमाळी यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मंडल अधिकारी आर एम परदेशी, तलाठी ननई, ग्रामसेवक मनीष भाबड, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आहेर, विलास आहेर, दत्तू आहेर, डॉ. पुंजाराम आहेर, दशरथ आहेर, साहेबराव जगताप, किरण आहेर, कचरू आहेर, सुधाकर आहेर, आण्णा जगताप, देवचंद फुलमाळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.