नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे
दूरदर्शनवरची पहिली हिंदी मालिका होती ‘हम लोग’. एकेकाळी घराघरांत पाहिली जाणारी ही अत्यंत लोकप्रिय मालिका मेक्सिकोमधील ‘व्हेन काँमिगो’ (म्हणजे इंग्रजीत ‘कम विथ मी’) या मालिकेवर बेतलेली होती. त्याचे असे झाले की, तत्कालीन माहिती आणि नभोवाणी मंत्री वसंत साठे १९८२ला मेक्सिकोच्या दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांनी तिथल्या दूरचित्रवाणीवर ही आयरिन साबिडो यांनी १९७५ला निर्माण केलेली मालिका पाहिली. ती त्यांना फार आवडली. साठे साहेबांना असेही कळले की, साक्षरतेला प्रोत्साहन देणाऱ्या त्या टीव्ही मालिकेमुळे मेक्सिकोत प्रौढ साक्षरतेच्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या ९ पटीने वाढली! हे समजल्यावर तर आपल्याही दूरदर्शनवर अशी एखादी मनोरंजनातून लोकशिक्षण साधणारी मालिका असावी, असे मंत्र्यांना वाटले. (त्या काळी मंत्र्यांच्या मनात असे देशहिताचे विचारसुद्धा येत असत!) त्यांनी लगेच लेखक मनोहर श्याम जोशी यांना पाचारण करून त्यांच्याशी चर्चा केली. स्वत: केंद्रीय नभोवाणी मंत्री सांगतात म्हटल्यावर सिनेदिग्दर्शक पी. कुमार वासुदेव यांनी मालिका निर्मितीची सर्व जबाबदारी उचलली.
मनोहर श्याम जोशी यांनी मात्र मेक्सिकोतील मालिकेची जशीच्या तशी कॉपी करण्याचे टाळले. केवळ प्रौढशिक्षणाचा प्रचार करण्याचा हेतू न ठेवता त्यांनी या संधीचा उपयोग करून भारतीय समाजापुढील प्रमुख समस्या, रूढी-परंपरा याबाबत समाजाचे प्रबोधन करण्याचा हेतू ठेवून लेखन केले. तशी ही ८०च्या दशकातील एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या आशा-आकांक्षाची कथा! तशीच ती समाजातील अगदी साध्या माणसांनी आपल्या आकांक्षांच्या पूर्तीसाठी केलेल्या संघर्षाचीही कथा होती. ‘हम लोग’मधून सरकारने हुंड्याचे दुष्परिणाम सांगितले, समाजमनावर स्त्रीशिक्षणाचे महत्त्व बिंबवले, त्याशिवाय सामाजिक सलोखा, जातीयवादातून मुक्ती, परस्पर प्रेम असे कितीतरी विषय हाताळले. पण हे सर्व लेखकाने आणि दिग्दर्शकांनी इतक्या कौशल्याने केले की, प्रेक्षकांना जराही असे वाटले नाही की, काही प्रचाराचा उद्देश ठेवून ही मालिका लिहिण्यात आलेली आहे.
देशाच्या या पहिल्याच टीव्ही मालिकेतील सर्वच पात्रे १९८४-८५ मध्ये घराघरात पोहोचली होती. ती पात्रे सर्वच कुटुंबाचे सदस्य होऊन गेली होती. मग ते बसेसर रामच्या रूपातले विनोद नागपाल असोत, भगवंती बनलेल्या जयश्री अरोरा असोत, की लल्लू (राजेश पुरी), दादाजी (लाहिडी सिंह), गुणवंती ऊर्फ बडकी (सीमा पहावा), रूपवंती ऊर्फ मझली (दिव्या सेठ), प्रीती ऊर्फ छुटकी (लवलीन मिश्रा) लाजवंती ऊर्फ लाजो (सुप्रिया चितळे), इमारतीदेवी ऊर्फ दादी (सुषमा सेठ) असोत, सगळे देशभरात जिथे जिथे हिंदी भाषा समजते तिथल्या कुटुंबात रोज चर्चिले जाऊ लागले होते. बडकीची भूमिका करणाऱ्या सीमा पहावा त्यावेळी एका कंपनीत ६०० रुपये महिना पगाराची नोकरी करत होत्या. त्यांना जेव्हा कळले की, ‘हम लोग’चे शूटिंग रोजच्या रोज होणार आहे. त्यामुळे आपली इतकी चांगल्या पगाराची नोकरी रोजच्या शूटिंगमुळे हातची जाईल, असे वाटल्याने त्यांनी भूमिका स्वीकारण्यास नकार दिला. नंतर त्यांना या नव्या कलाप्रकाराचे महत्त्व समजावून देण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले, हा भाग वेगळा! सीमा पहावा यांनी एकदा स्वत: सांगितले होते की, जुन्या काळच्या मालिकाचे पूर्ण ५२ भागांचे कथानक सर्व कलाकारांना आधी दिले जायचे. शेवट आधी लिहिला जायचा, त्यामुळे रोज पुढे काय आहे याची कल्पना नसण्याचे हल्ली सारखे टेन्शन कलाकारांना नसायचे. पूर्ण मालिका एकच लेखक लिहीत असल्याने कथेत एकसूत्रीपणा, एकजीनसीपणा आपोआपच येत असे.
भारतीय समाजमनावर ‘हम लोग’चा इतका प्रभाव पडला होता की, श्रीमती सीमा पहावा (आता सिनेकलाकार सीमा भार्गव) या जी समाजकार्यकर्त्याची भूमिका करत होत्या, तिच्यामुळे लोक आपल्या व्यक्तिगत समस्या घेऊन त्यांच्याकडे येत असत आणि त्यांचा सल्ला मागत आणि गंमत म्हणजे त्या लोकांची समस्या ऐकून घेऊन त्यांना योग्य तो सल्ला देतही असत! या मालिकेचे प्रेक्षकांना भावलेले अजून एक अंग हे होते की, मालिका संपता-संपता प्रसिद्ध अभिनेते अशोककुमार पडद्यावर येत आणि प्रेक्षकांशी जणू बोलत. मालिकेत घडत असलेल्या गोष्टींवर हिंदीतील सुंदर दोहे उद्धृत करून एक-दोन रोचक वाक्ये बोलत. कधी कधी ते प्रेक्षकांना मालिकेतील पात्रांचा परिचयही करून देत. त्यामुळे वातावरण अगदी घरगुती राहत असे. तसे दादामुनी आधीपासूनच लोकांना प्रिय होते. पण या केवळ १७ महिन्यांच्या काळात त्यांना ‘हम लोग’ पाहणाऱ्या तब्बल ४,००,००० तरुण प्रेक्षकांची पत्रे आली होती. काय होते त्या पत्रात? बिचाऱ्या तरुण-तरुणींनी अशोककुमारांना विनंती केली होती की, ‘मला माझ्या पसंतीच्या जोडीदाराशी लग्न करू द्यायची परवानगी द्यायला तुम्ही माझ्या आई-वडिलांना तयार करा ना!’
जुलै ७ला सुरू झालेली हम लोग १७ डिसेंबर १९८५ला संपली आणि तिचे सुमारे ६ कोटी प्रेक्षक अक्षरश: गहिवरले. जणू एक अगदी जवळचे, जिव्हाळ्याचे परिचित कुटुंब कुठेतरी कायमचे निघून गेले अशी रुखरुख अख्ख्या देशाला लागली होती. ती लावण्याची क्षमता लेखकाच्या लेखणीत आणि दिग्दर्शकाच्या बुद्धीत होती, असा तो काळ! आज बहुतेक मालिकातून असे चित्र हेतुपूर्वक उभे केले जाते की, प्रत्येक घरातले सदस्य अत्यंत कुटिल आहेत. कुणाचेच कुणाशी पटत नाही. एकही पुरुष किंवा स्त्री आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक नाही! सर्व घरात सुपारी किलिंगसाठी गँगस्टरना ‘गिऱ्हाईके’ उपलब्ध आहेत! सर्व कुटुंबात खून मारामाऱ्या सुरूच असतात. विशेषत: सुशिक्षित कुटुंबात एखाद्याला जोरात थोबाडीत मारायची पद्धत रूढच झालेली आहे! एक स्त्री ही घरातीलच दुसऱ्या गर्भार स्त्रीला काहीतरी करून इजा पोहोचवून तिचा गर्भपात घडवून आणायला टपलेली असते!
पोलीस श्रीमंत कुटुंबांचे घरगडी असल्यासारखे त्यांनी बोलावले की, तत्काळ घरी येतात आणि त्यांच्याकडून कुणाच्याही अटकेसाठी, कोणत्याही पुराव्याशिवाय ऑर्डर्स घेत असतात!! पत्रकार कुणाच्याही घरच्या भांडणाचे शूटिंग करायला शहरभर फिरत असतात. ते घरगुती भांडणात पडून कुणालाही, काहीही प्रश्न विचारतात! हल्लीचे लेखक, दिग्दर्शक हे असे आपल्या अशा अगम्य सामान्यज्ञानाचे प्रदर्शन प्रेक्षकांपुढे रोज करतात. पण हे सगळे कितीही हास्यास्पद असले तरी विवेकबुद्धी शिल्लक नसलेल्या काही दुर्बल मनावर या गोष्टींचा प्रभाव पडतो. आजचे वाढते गुन्हे, परस्परद्वेष, जातीयवाद, सर्व संस्कारांचा अभाव, वडीलधाऱ्यांविषयी थोडाही आदरभाव नसण्याची मानसिकता हे सर्व त्याचेच निदर्शक नाही का? कुठे संपूर्ण भारतीय समाजाचे हित साधण्यासाठी अत्यंत कौशल्याने लिहिलेल्या, १००% खऱ्या वाटणाऱ्या जुन्या कसदार मालिका आणि कुठे सध्याचे कोणताच दर्जा नसलेले समाजविघातक लेखन! कधी स्वत:लाच विचारावेसे वाटते “ये कहाँ आ गये, हम लोग?”