विशेष: सुनील गाडगीळ
मुंबईच्या लोअर परळ भागातून गाडी Phoenix palladium मॉलच्या दारात थांबते. आजूबाजूला बघताना आपण मुंबईत नसून सिंगापूर किंवा दुबईत आहोत, असा भास होत होता. तशाच उंच, गगनाला गवसणी घालणाऱ्या काचेच्या फसाडच्या इमारती, त्यावर लोकप्रिय ब्रँड्सची नावे. मॉलमध्ये प्रवेश केला आणि डोळे दीपून गेले. झगमगत्या दिव्यांनी उजळून निघालेल्या जगप्रसिद्ध ब्रॅण्ड्सच्या शोरूम्स, रेस्टॉरंट्स, गेमिंग झोन्स गिऱ्हाईकांच्या स्वागतास सज्ज होत्या. लोकांचे लोंढे आत प्रवेश करत होते. सर्वत्र उत्साह, आनंद ओसंडून वाहत होता.
अनेक दुकानांमध्ये सेल लागले होते. काही ठिकाणी ५०% तर काही ठिकाणी ‘बाय टू, गेट वन फ्री’ असे बॅनर्स लावून गिऱ्हाईकाला आपल्याकडे कसे खेचता येईल याची स्पर्धा चालू होती. लोकांची धावपळ सुरू होती. जोरदार खरेदी चालू होती. हातात मोठाल्या बॅग्ज घेऊन लोक हसत हसत बाहेर पडत होती. छान खरेदी झाल्याची, समाधानाची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. पण का कोणास ठाऊक, मॉलमध्ये प्रवेश केल्यापासूनच माझं मन उदास झालं होतं. त्या झगमगत्या दुनियेत माझे लक्ष लागत नव्हतं. त्या सेलमधल्या वस्तूंचे मला आज आकर्षण वाटत नव्हते. माझी पावले तिकडे ओढ घेत नव्हती. माझं मन ४०-४१ वर्षे मागे गेलं होतं. हा आणि यासारखे इतर गिरण्यांच्या जागेवर उभे असलेले मॉल ज्या जागेवर आज दिमाखात उभे आहे, त्याच्या मागचा रक्तरंजित इतिहास माझ्या नजरेसमोर फेर धरून
नाचू लागला.
साल १९८०-८१. मुंबईतील गिरण्या जिथे होत्या तो लालबाग, परळ, भायखळा, चिंचपोकळी, महालक्ष्मी, बॉम्बे सेंट्रल, हा सारा भाग ‘गिरणगाव’ म्हणून ओळखला जात असे. त्या भागात कोहिनूर, ज्युपिटर, पिरामल, कमला, सिम्प्लेक्स, खटाव, अशा अनेक मिल्स, गिरण्या गेली अनेक दशके दिमाखात उभ्या होत्या. बऱ्यापैकी चालत होत्या. त्यात उत्पादन होणाऱ्या कापडाला भारतातच नव्हे, तर परदेशात मुख्यत: इंग्लंडमध्ये चांगली मागणी होती. पण नंतर अनेक कारणांनी गिरण्यांना उतरती कळा लागली होती. तशातच ८१-८२ साली भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा संप इथे झाला. गिरणी कामगारांचा संप. डॉक्टर दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली चाललेला हा संप १८ महिने चालला. आश्चर्याची बाब म्हणजे हा संप सुरू तर झाला, पण खऱ्या अर्थाने तो कधी मिटलाच नाही. कुठलाच तोडगा निघाला नाही आणि एखादी ज्योत जशी हळूहळू, आपोआप विझते तसा तो विझून गेला. आधीच बऱ्याचशा गिरण्या डबघाईला आल्याच होत्या. या संपामुळे त्या उद्ध्वस्त झाल्या. बंद पडल्या. जवळजवळ तीन लाखांच्या वर गिरणी कामगार रस्त्यावर आले. यातील बहुतेक सर्व कामगार हे कोकणातून आलेले होते. गिरण्यांच्या आसपास असणाऱ्या बीडीडीसारख्या चाळीत ते राहात. गिरण्या बंद पडल्या, त्यांच्या नोकऱ्या गेल्या, त्यांची उपासमार होऊ लागली. ज्यांना शक्य होते ते खुरडत, अडखळत, कोकणात आपल्या गावी पोहोचले. तिथे देखील परिस्थिती काही फारशी चांगली नव्हती. आधीच उल्हास त्यात आला फाल्गुन मास अशी त्यांची स्थिती झाली. जे दटून मागे राहिले, त्यांची स्थिती भयानक झाली. चाळीच्या खोलीचे भाडे भरायला पैसे नव्हते. त्यांचे हाल कुत्रं खाईना, अशी झाली.
घरातल्या एकेक वस्तू, घरच्या लक्ष्मीच्या अंगावरचे दागिने विकायला लागले. थोड्या दिवसांनी तेही संपले. विकायला काहीच शिल्लक नाही अशी स्थिती झाली. डोळ्यांतले पाणी केव्हाच आटून गेले होते. हा धक्का अनेकजण पचवू शकले नाहीत. अनेकजणांनी आत्महत्या केल्या, काहींना वेड लागले. काही दारूच्या आहारी गेले, तर काही जवळ होते नव्हते ते पैसे मटक्यात घालवून बसले. त्यांच्या बायका, मुलांचे तर प्रचंड हाल झाले. तरुण मुलं, पण नोकरी नाही. वयात आलेल्या मुलींची लग्न कशी होणार, त्याला लागणारा पैसा कसा उभा करणार, असे अनेक भयाण प्रश्न “आsss” वासून त्यांच्यासमोर उभे होते. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. पैशांकरिता अनेक मुलींना वेगळ्या मार्गाला जावे लागले, तर मुलांना नाईलाजाने गुन्हेगारीची, जिथे परतीचा रस्ता नसतो, त्याची वाट धरावी लागली. पुढे मुंबई गुन्हेगार विश्वात नामचीन झालेली नावे म्हणजे अरुण (डॅडी) गवळी, सदामामा पावले, रमा नाईक, अमर आणि अश्विन नाईक, डी. के. राव, अनिल परब हे सारे गिरणी विश्वाशी निगडित होते. काही जण स्वतः गिरणी कामगार होते, तर काहींचे वडील गिरण्यांमध्ये काम करायचे.
गिरणी संपानंतर हळूहळू गिरण्या बंद पडू लागल्या आणि १९९५ पर्यंत बहुतेक गिरण्या जमीनदोस्त होऊन त्या जागी टोलेजंग इमारती आणि मॉल्स उभारण्याचा घाट घातला गेला आणि एक भयानक रक्तरंजित काळ सुरू झाला. यात अनेक गुन्हेगारांना आपला जीव गमवावा लागला, काही टोळी युद्धात, तर काही पोलीस एन्काऊंटरमध्ये मारले गेले. अनेकजण अनेक वर्षांसाठी गजाआड गेले. गिरणी संपाचे नेते डॉक्टर दत्ता सामंत, खटाव मिल्सचे मालक सुनीत खटाव यांचे खून झाले. काही युनियन लीडर्स मारले गेले. गिरण्या आणि गिरणी कामगार दोन्ही घटक कायमचे नष्ट झाले आणि मग गिरण्यांच्या जागी सध्या आपल्याला दिसतात ते भव्य मॉल्स, उंच इमारती उभ्या राहिल्या.
आता आपल्याला दिसतो त्या झगमगाटामागे किती भयाण काळोखे सत्य दडले आहे, हे आपल्याला माहीत नसते. मला ते माहीत असल्यामुळे त्या दिवशी माझी अवस्था तशी विलक्षण झाली होती. उदासी आणि निराशा यांनी माझे मन खिन्न झाले होते. कधी नव्हे ते मॉलमधून बाहेर पडताना माझ्या हातात काही नव्हते. इथे पूर्वी एक गिरणी होती याची एकमेव खूण, आकाशात उंच गेलेली एक चिमणी नजरेस पडत होती. तिच्यातून बाहेर पडणारा धूर आणि पाळी बदलताना वाजणारा भोंगा केव्हाच शांत झाला होता. त्यांचा ‘अस्त’ खूप आधीच झाला होता.