Share

कथा: रमेश तांबे

दहा वर्षांच्या श्रवणचे बाबा खूप उत्साही होते. ते श्रवणला म्हणाले, “श्रवण आज संध्याकाळी आपण गणपती बघायला मुंबईला जायचं!” गेल्या वर्षीदेखील अगदी खांद्यावर बसून त्यांनी सर्व गणपती श्रवणला दाखवले होते. त्यामुळे या वर्षी पुन्हा गणपतीला जायचं, वेगवेगळे गणपती पाहायचे, तिथे भरलेल्या जत्रेमध्ये भरपूर खरेदी करायची, खायचं, प्यायचं आणि रात्री कधीतरी घरी परतायचं असं त्यांनी ठरवले. मग श्रवण आपल्या आई-बाबांसह रेल्वेने चिंचपोकळी स्टेशनला उतरला आणि प्रचंड गर्दीचे ठिकाण असलेल्या लालबाग परिसरात पोहोचला. त्या वेळेला गर्दीने अगदी उच्चांक गाठला होता. वेगवेगळ्या मंडपांसमोर रांगा लागल्या होत्या. विजेच्या रोषणाईने डोळे चमकत होते. रस्त्यावरची रहदारी पूर्णपणे थांबली होती. मुंगीलाही जायला जागा मिळणार नाही इतकी गर्दी रस्त्यावरती होती. पण वातावरणात एक जल्लोष होता. लोक अगदी उत्साही होते. ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष अधूनमधून करीत होते. ही सगळी मजा बघत बघत श्रवण आपल्या बाबांचा हात धरून गर्दीतून पुढे पुढे सरकत होता. एक-दोन कमी गर्दीचे गणपती त्यांना चटकन बघायला मिळाले. प्रचंड मोठी मूर्ती, तिथली सजावट, तिथले देखावे पाहून श्रवण खूपच खूश झाला. तो मनोभावे पाया पडला. प्रसाद खाल्ला, बाबांकडे हट्ट करून त्याने एक पिपाणीसुद्धा विकत घेतली. त्याचा आवाज करत करत बाबांचा हात धरून तो पुन्हा नव्या गणपतीच्या दिशेने चालू लागला.

आता श्रवण मुद्दामूनच गर्दीच्या विरुद्ध दिशेकडे बोट दाखवत बाबांना म्हणाला, “बाबा तिकडे जाऊया.” मग ते एका गल्लीमध्ये शिरले. तिथे भला मोठा मंडप घातला होता. त्या ठिकाणी म्हणावी तशी गर्दी नव्हती. पण तिथली गणपतीची मूर्ती मात्र खूपच आकर्षक होती. कृष्णाचा अवतार घेऊन गणपती कालिया नागाच्या फण्यावरती उभा राहून नर्तन करत होता. हा गणपती श्रवणला खूपच आवडला. नेमकी त्याच वेळी बाजूच्या मंचावर स्पर्धा सुरू होती. बाबांनी चौकशी केली, तर तिकडे “मला आवडलेला गणपती” अशी एक भाषण स्पर्धा सुरू होती आणि तिथे प्रवेश कोणालाही होता. श्रवणचे बाबा आणि आई छोट्या मुलांची भाषणे ऐकायला खाली बसले. एक एक स्पर्धक येऊन आपल्या तोडक्या मोडक्या भाषेमध्ये त्यांना आवडलेल्या गणपतीचे वर्णन करत होते. थोड्याच वेळात श्रवण बाबांंना म्हणाला, “बाबा माझे पण नाव देऊया ना स्पर्धेसाठी!” बाबांना थोडे नवलच वाटले. पण श्रवणचे नाव देऊन आले. बाबा म्हणाले, “श्रवण जमेल ना रे तुला?” कारण बाबांनी श्रवणला कधीच असं भाषण करताना पाहिले नव्हते. श्रवण म्हणाला, “बाबा काळजी करू नका!” अजून दोन-तीन मुलां-मुलींची भाषणे झाल्यानंतर श्रवणचे नाव घेतलं गेलं. श्रवण शरद केंद्रे! तसा श्रवण उठला आणि व्यासपीठावर जाऊन “गणपती बाप्पा मोरया” अशी घोषणा देऊन त्यांने बोलायला सुरुवात केली आणि ज्या मंडळाने स्पर्धा भरवली होती त्याच मंडळाचा गणपती आपल्याला कसा आवडला. त्यातली मूर्ती कशी आहे. पुराणांतल्या कोणत्या प्रसंगावर ती मूर्ती बनवली आहे, सजावट कशी आहे, तिथल्या रोषणाईचे मस्त वर्णन करून उपस्थितांना अगदी तोंडात बोटे घालायला लावली आणि टाळ्यांच्या कडकडाटात तो खाली बसला. श्रवणचे बोलणे ऐकून बाबा तर अवाकच झाले, तर आई ऐकता ऐकता पदराने डोळे पुसत होती. आपल्या पोराने एवढे सगळं ज्ञान कधी मिळवलं, याचं तिला आश्चर्य वाटत होतं.

तो जवळ येताच आईने त्याचे पटापटा मुके घेतले आणि त्याला पोटाशी धरले. थोड्याच वेळात स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आणि श्रवण केंद्रेचा प्रथम क्रमांक आल्याचे जाहीर होताच पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. परीक्षक मुद्दामून श्रवणाचे कौतुक करत म्हणाले, “हा मुलगा डोंबिवलीवरून इथे आला आहे. आताच दहा मिनिटांपूर्वी त्याने हा गणपती पाहिला आणि लगेच भाषणाला कोणतीही तयारी न करता उभा राहिला. खरेच या दहा वर्षांच्या मुलाला इतकी माहिती आहे याचं मला आश्चर्य वाटतं.” पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर झाला आणि एक मोठ्या रकमेचं बक्षीस श्रवणला देण्यात आलं. तिथे उपस्थित असलेल्या दोन श्रोत्यांनीही श्रवणला पाच पाचशे रुपयांचे बक्षीस जाहीर केले. अभिनंदनाचा वर्षाव झेलत श्रवण आणि त्याचे आई-बाबा मंडपाच्या बाहेर पडले. बाबा म्हणाले, “श्रवण अजून गणपती पाहायचेत का तुला.” श्रवण म्हणाला, “बाबा नको आता. गणपती हे बुद्धीच्या दैवतेचा अभ्यास करून त्याची पूजा करावी हे मला आजच्या स्पर्धेतून कळाले आहे.” हे ऐकून आई-बाबांना आपल्या मुलाचे भारीच कौतुक वाटले. त्यानंतर श्रवण आणि त्याचे आई-बाबा परत कधीच गणपती बघायला मुंबईत आले नाहीत. त्याच गणपती उत्सवाच्या दहा दिवसांत भरपूर पुस्तके वाचून गणपती उत्सव साजरा करण्याचे त्यांनी ठरवले आणि तसेच केलेदेखील…!

Recent Posts

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

25 minutes ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

60 minutes ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

9 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

10 hours ago