प्रतिभारंग: प्रा. प्रतिभा सराफ
मला अजूनही आठवत आहे तो दिवस… त्या दिवशी माझी मुलगी तिचे चेंबूरचे छोटेसे विश्व आणि घराजवळची शाळा सोडून पहिल्यांदाच झेव्हियर्स कॉलेजमध्ये शिकण्यासाठी बाहेर पडली होती. ट्रेनने स्वतंत्रपणे एकटे जाण्याचा तिचा पहिलाच दिवस. घरात आल्यावर तिची चिडचिड चालू होती. मी विचारले, “काय झालं?” तर म्हणाली, “पॉप्युलेशन इतकं वाढलं आहे की, मी तरी यात आणखी वाढ करायचं नाही हे ठरवूनच घरी आले आहे.” तिची समज आणि चिडचिड समजण्याइतके माझे वय वाढलेले नव्हते. त्यामुळे तिच्या एकाच वाक्याने मी हबकूनच गेले. तिने हा घेतलेला ‘लोकसंख्येचा धसका’ माझ्यासाठी मोठा धक्का होता.
वाढणारी लोकसंख्या ही समस्या अधूनमधून कानावर पडलेली होती त्यावर विचार करायला सुरुवात केली. ‘लोकसंख्या’ म्हणजे ‘एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या. लोकसंख्या मोजण्याला जनगणना किंवा खानेसुमारी म्हणतात. प्रत्येक (देश) आपल्या लोकसंख्येची ठरावीक कालखंडानंतर गणना करतो. हा कालखंड बहुतेक १० वर्षे एवढा असतो. हे वाचून किंवा बातम्यांमधून ऐकलेले होते. आमच्या बिल्डिंगच्या बाजूलाच ‘आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था’ आहे. तेथे बाहेर रोजची जनसंख्या लिहिली जाते. रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जाता जाता त्याकडे लक्ष जातेच. आजची लोकसंख्या आहे – १,४३२,०१९,७४२ (बुधवार ४ ऑक्टोबर २०२३).
सर्वाधिक लोकसंख्या असलेले दहा देश जेव्हा आपण विचारात घेतो, तेव्हा त्यात ‘भारत’ हमखास असतो. फक्त भारताविषयी जर आपण बोललो, तर अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी-परंपरा या कारणामुळे लोकसंख्येत वाढ होते. उदाहरणार्थ अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा असतात त्यापैकी प्रामुख्याने असणारी अंधश्रद्धा म्हणजे ‘मुलगा म्हणजे वंशाचा दिवा.’ मेल्यावर पाणी पाजणे व अग्नी देणे यासाठी ‘मुलगा’ लागतो हा समज. त्यामुळे मुलगा होईपर्यंत कुटुंब नियोजन केले जात नाही. घराण्याच्या संपत्तीचा ‘वारस’ मुलगा असतो, कारण ‘मुलगी’ ही परक्याचे धन समजले जाते. अलीकडे या गोष्टी थोड्या फार कमी झाल्या असतील. पण कित्येक समाजात अजूनही या अंधश्रद्धा टिकून आहेत, त्यामुळे लोकसंख्या वाढत आहे.
साधारण दोन महिन्यांपूर्वी मी घरकामासाठी एक बाई ठेवली. अंघोळ करून मी बाहेर आले, तर स्वयंपाकघरात ती बाई आडवी पडलेली. मी खूप घाबरले. तिच्या तोंडावर पाणी मारले. शेजारच्या बाईला मदतीसाठी बोलवले, तोपर्यंत ती उठून बसली होती. मी तिला थोडा वेळ झोपून राहण्यास सांगितले. मी ‘नको’ म्हणत होते तरी ती उठून उभी राहिली. मी तिच्यासाठी गॅसवर चहासाठी आधण चढवले. तिला मी विचारले, “काय झाले?” तर ती अर्धवट राहिलेली भांडी घासता घासता म्हणाली, “पेट से हूँ।”
मी चिडून म्हटले, “तुम्हे तीन बच्चे हैं ना?” “हा पर लडका नही हैं ना?” “तो क्या?” मी चहा गाळत म्हटले. सोबत एका ताटलीत दोन-तीन बिस्किटेही काढली. ती तिला दिली. ती म्हणाली, “मेरे सांसने कहा की अगर तेरे को लडका नहीं हुआ तो मै मेरी सारी प्रॉपर्टी तेरे जेठानी के बच्चे के नाम कर दुंगी!” मी कपाळावर हात मारून घेतला. त्या बाईच्या अंगावरचे कपडे पाहिले. या तीन मुलांना सांभाळताना त्या बिचारीच्या पोटात चांगले चांगले पौष्टिक तर जाऊ द्या; परंतु पोटभर चार घास सुद्धा जात नसतील अशी हिची परिस्थिती. तिची सासू किती श्रीमंत असणार, काय तिच्याकडे प्रॉपर्टी असणार, जी हिच्या मुलाला मिळणार नाही? तिला मुलगा केव्हा होणार आणि हिला ती प्रॉपर्टी केव्हा मिळणार? आता तर ती दोन जीवांची आहे, पण तेव्हा ती असणार की नाही? या चार मुलांचे पालनपोषण ही बाई प्रॉपर्टीच्या आशेने किती काळ आणि कशी करणार? सगळ्याच प्रश्नांनी माझे डोके ठणकायला लागले. चहा पिता-पिता तिच्या चेहऱ्यावर निर्विकार भाव जणू काही दहा मिनिटांपूर्वी ती चक्कर येऊन जमिनीवर पडलीच नव्हती!
खरं तर लोकसंख्या वाढीची अनेक उदाहरणे देता येतील. त्यामागची कारणे, माणसांची मानसिकता यावर कितीही लिहिता येईल. पण फार खोलात मी जात नाही. साधारण पन्नास वर्षांपूर्वी आम्ही छोट्या-मोठ्या खरेदीसाठी म्हणजे अगदी घरातले चमचे घ्यायचे असेल की कपाट, सणासुदीला देवासाठी मोठ्या प्रमाणात फुले घ्यायचे असोत की पाहुणे आल्यावर त्यांच्यासाठी कपडे घ्यायचे असोत, दादरला खरेदीला जायचो. ‘सामंत ब्रदर्स’चे लोणी घेऊनच तूप कढवायचो किंवा दादरला गेल्यावर मामा काणे यांचा वडा खायचो. आता काय करायचो हे फार महत्त्वाचं नाही; परंतु यानिमित्ताने एवढेच सांगायचे आहे की, १५ ते २० मिनिटांमध्ये चेंबूरवरून दादरला पोहोचायचो. आता तेच अंतर साधारण एक-दीड तास किंवा त्यापेक्षा जास्त काळाचे झाले आहे. या मागचे कारण म्हणजे वाढलेली रहदारी आणि लोकसंख्या वाढ. त्यामुळे छोट्या तर जाऊ द्या, पण मोठ्या खरेदीसाठी सुद्धा चेंबूरवरून दादरला जाणे अत्यंत कठीण आणि वेळखाऊ झालेले आहे.
मुलीच्या प्रश्न समजून घेऊन मी जेव्हा तिला बोलते केले, तेव्हा ती वयाच्या पंधराव्या-सोळाव्या वर्षी म्हणाली होती, “आई, आपल्यासारख्या शिकल्या-सावरलेल्या लोकांनी लोकसंख्या वाढीचा विचार केला नाही, तर दुसऱ्या कोणाकडून काय अपेक्षा करायची?” आज हाच प्रश्न प्रत्येकाने समजून घेऊन विचार करण्याची आवश्यकता आहे की दुसऱ्यांकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करण्यापेक्षा लोकसंख्या वाढीसाठी आपण आपल्या पातळीवर नेमकेपणाने काय करू शकतो?
pratibha.saraph@gmail.com
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…