कथा: प्रा. देवबा पाटील
खरं तर आम्ही म्हणजे तुमच्याएवढी व तुमच्यासारखीच ज्ञानवर्धिनी शाळेतील आठव्या वर्गातील मुले-मुली. आमच्या वर्गातील सारी मुली-मुले आधी तुमच्यासारखीच अभ्यासात थोडीफार कमी-जास्त, कच्ची-पक्की होती. पण आता मात्र सारी मुले-मुली हे खूपच अभ्यासू व हुशार झाले होते. त्याला कारणही तसेच होते. ते म्हणजे आमचे रसायनशास्त्राचे शिक्षक देशमुख सर. सातव्या वर्गापर्यंत आम्हाला विज्ञानाचे सामान्य विज्ञान नावाचे एकच पुस्तक होते; परंतु आठव्या वर्गापासून आम्हाला विज्ञानाची तीन पुस्तके अभ्यासाला आली होती. ती म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र. अशी विज्ञानातील तीन विषयांची तीन वेगवेगळी पुस्तके होती. अभ्यासक्रमही खूप मोठा होता, म्हणजे आम्हाला आधी विज्ञानाचे एकच पुस्तक बघणाऱ्या मुला-मुलींना तीन पुस्तके मोठीच वाटत होती. पण आमच्या देशमुख सरांनी आमच्या मनातील ती भीती पूर्णपणे काढून टाकली. आम्हाला खूपच अभ्यासू बनविले होते. आमच्यात अभ्यासाची गोडी निर्माण केली होती.
ते कधीच कुणावरही रागावत नसत की कुणाही विद्यार्थ्याला शिक्षा करीत नसत. ते प्रेमाने, आपुलकीने व खेळीमेळीने वर्गात शिकवित. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या तासात खूपच रस यायचा व त्यांच्याबद्दल अतोनात आदर असायचा. त्यांच्या तासाची विद्यार्थी आतुरतेने वाट बघायचे. त्यांचा तास असला म्हणजे सारे आनंदाने वर्गात कान टवकारून बसायचे नि त्यांचे शिकवणे कानात प्राण आणून ऐकायचे. असेच त्या दिवशी ते वर्गात आले व “मुलांनो, मी आता तुम्हाला आपल्या पृथ्वीभोवतीच्या वातावरणाविषयी शिकविणार आहे” असे सांगत आपल्या वातावरणाबद्दल त्यांनी शिकविण्यास सुरुवात केली. “वातावरण म्हणजे काय असते हे माहीत आहे ना मुलांनो तुम्हाला?” देशमुख सरांनी सहजतेने प्रश्न केला.
“हो सर.” सारी मुले एकसाथ म्हणाली.“सांगा बरे. काय असते ते?” सरांनी विचारले. “वातावरण म्हणजे वायूंचे आवरण.” पुन्हा साऱ्या मुलांनी उत्तर दिले.“पण सर, हे वातावरण पृथ्वीभोवती कशासाठी असते?” वृंदाने उभे राहून सरांना पहिला प्रश्न विचारला.सर आनंदाने सांगू लागले, “वात म्हणजे वायू. वातावरण म्हणजे त्या ग्रहाभोवती असलेले वायूंचे म्हणजेच हवेचे आवरण. प्रत्येक ग्रहावर कोणत्या ना कोणत्या तरी वायूचे किंवा अनेक वायूंच्या मिश्रणाचे आवरण असते त्यालाच वातावरण म्हणतात. आपल्या पृथ्वीच्या सभोवतीसुद्धा असेच काही विशिष्ट वायूंचे आवरण म्हणजे वातावरण आहे.” “या वातावरणाचा पृथ्वीला काय फायदा होतो सर?” प्रियवंदाने प्रश्न केला. सर म्हणाले, “आपल्या पृथ्वीभोवतीचे वातावरण हे सूर्यापासून येणाऱ्या सजीवांना आवश्यक अशा किरणांना आत येऊ देते असे तर आहेच, पण त्याच वेळी ते सूर्याच्या घातक किरणांनाही थोपविते नि त्या हानिकारक किरणांपासून पृथ्वीचे म्हणजेच पर्यायाने पृथ्वीवरील सजीवांचे अर्थात आपलेही रक्षणसुद्धा करीत असते. तसेच याच वातावरणात पृथ्वीवरील सजीवांच्या जीवनास आवश्यक असलेले पाणी व वायूसुद्धा साठवलेले असतात.
वातावरणामुळेच पृथ्वीवर पाऊस पडतो. सृष्टीची शोभा वाढते. या वातावरणामुळे पृथ्वीवरील उष्णता व थंडी यांचा समतोल राखला जातो.” “सर, या वातावरणाचा मला आणखी एक उपयोग माहीत आहे. सांगू का?” असे जोगेंद्राने म्हणता, सरांना खूपच आनंद झाला. ते आनंदाने त्याला प्रोत्साहन देत म्हणाले, “अरे सांग ना. असा घाबरतोस का?” “या वातावरणातच आवाजाला वाहून नेणाऱ्या ध्वनिलहरी असतात म्हणून आपण एकमेकांचे बोलणे ऐकू शकतो. वातावरण नसते, तर कोणाचेच बोलणे कोणालाही ऐकू आले नसते.” जोगेंद्राने सांगितले. “बरोब्बर. शाब्बास जोगेंद्रा.” सर अत्यानंदाने म्हणाले. “म्हणजे रसायनशास्त्रासोबत तुमचा भौतिकशास्त्राचाही अभ्यास चांगलाच सुरू आहे.” सरांचे शिकवणे सुरू असतानाच तास संपल्याची शाळेची घंटी वाजली. त्यांनी टेबलावरील आपले हजेरीचे पुस्तक व खडू डस्टर हाती घेतले नि ते वर्गाबाहेर जाण्यासाठी दरवाजाकडे वळले.