Thursday, July 25, 2024
Homeसाप्ताहिककोलाजभारतीय वायुदल

भारतीय वायुदल

गुलदस्ता: मृणालिनी कुलकर्णी

आजपासून ९१ वर्षांपूर्वी ८ ऑक्टोबर १९३२ साली पहिल्या हवाई दलाची स्थापना झाली. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांत इंग्लंड, जर्मनीने विमानाचा केलेला उपयोग पाहून ‘हवाई युद्ध’ हे युद्ध शास्त्राचे नवे अंग स्थापन झाले. त्यानंतर सर्व लहान-मोठ्या राष्ट्रांनी हवाईदले स्थापण्यास सुरुवात करताना, ब्रिटिशांनी भारतात “रॉयल इंडियन एअरफोर्सची” स्थापना केली. १९२८ मध्ये ६ भारतीयांनी प्रशिक्षण घेऊन १९३३ मध्ये पहिली भारतीय वैमानिकाच्या प्रशिक्षित तुकडी बाहेर पडली. सुब्रोतो मुखर्जी हे भारताचे पहिले वायुसेना प्रमुख होते.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वायुसेना स्वतंत्र सेवेत विकसित झाली. पहिल्या प्रजासत्ताक दिनी भारतीय वायुदलाने रॉयल शब्द वगळून फक्त ‘इंडियन एअर फोर्स’ (IAF) या नावाबरोबरच भगवद्गीतेतील “नभ: स्पृशं दीप्तम्” (Touch the sky with glory) हे बोधवाक्य स्वीकारले आणि चौकोनात डाव्या कोपऱ्यात राष्ट्रध्वज, त्याच्या समांतर उजव्या बाजूस केशरी, पांढरा व मधोमध हिरवा रंग असलेली आकाशाच्या निळसर पार्श्वभूमीवर वर्तुळ असे बोधचिन्हही निश्चित करण्यात आले. भारताचे राष्ट्रपती हे तिन्ही सशस्त्र दलाचे (भूदल, नौदल आणि वायुदल) सर्वोच्च कमांडरपद धारण करतात.

भारताच्या हवाई दलांत ब्रिटिश, फ्रेंच, जर्मन बनावटीच्या विमानानंतर, रशियाच्या सहकार्याने लढाऊ, मालवाहू विमानांची भर पडत असतानाच १९६० मध्ये केंद्र शासनाने कानपूर येथे एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग डेपोत भारतीय हवाई दलाच्या मागणीनुसार, गरजेनुसार नवी विमान उत्पादन, दुरुस्ती सुरू केली. आज भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात अत्यानुधिक विमानाची भर पडल्याने आपले वायुदल कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. कोणत्याही देशाच्या परकीय आक्रमणापासून आपल्या देशाचे संरक्षण करणे, देशाच्या सर्व सीमारेषा शत्रूपासून सुरक्षित ठेवणे, तसेच आंतरिक समस्यांमध्ये आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये देशातील नागरिकांचे रक्षण करणे, याशिवाय युद्धांत शत्रूचे हवाई संरक्षण दडपून टाकून, मानवतावादी ऑपरेशनना समर्थन देणे. अशी एक ना अनेक कामे भारतीय वायुसेना करीत असतात.

‘गरुड कमांडो’ या भारतीय हवाईदलाच्या विशेष दलात दहशतवादी विरोधी, ओलिसांची सुटका अशा विशेष ऑपरेशनचा सहभाग असून तेथे ५२ आठवड्यांचे मूलभूत प्रशिक्षण दिले जाते. वायुसेना ही भारताची मोठी ताकद असल्याने भारतीय हवाई दलातील नोकरी प्रतिष्ठेची मानली जाते. वायुदलांत प्रवेश घेण्यासाठी अनेक पातळीच्या परीक्षा आहेत. संरक्षण मंत्री राजनाथसिंह म्हणाले, “फक्त सुरक्षित आणि मजबूत देशच यशाचे शिखर गाठू शकते. देश कितीही श्रीमंत किंवा ज्ञानाने परिपूर्ण असला तरी राष्ट्रीय सुरक्षितेची खात्री नसेल, तर समृद्धीला धोका संभवतो. लवकरच भारत संरक्षण उत्पादनाच्या गरजांमध्ये आत्मनिर्भर बनेल.” आजादी का अमृत महोत्सवात २०२२च्या ९०व्या भारतीय वायुदलाच्या वर्धापनानिमित्ताने स्वदेशात डिझाइन आणि विकसित केलेले हलके लढाऊ हेलिकाॅप्टर (एलसीएच) लाइट काॅम्बॅट हेलिकाॅप्टर सामील करून घेतल्यामुळे भारतीय वायुदलाची क्षमता वाढली. हे हेलिकाॅप्टर आधुनिक युद्ध तंत्राच्या गरजा पूर्ण करते.

स्वातंत्र्यानंतर झालेल्या युद्धांत आणि आंतरराष्ट्रीय मानवतावादी केलेल्या ऑपरेशनमध्ये विजय मिळवून देण्यात वायुदलाची खूप महत्त्वाची भूमिका होती. त्याचा थोडक्यात आढावा :-
१. द्वितीय विश्वयुद्धात जपानी सैन्य बर्माच्या दिशेने सरकताना आपल्या हवाई दलाने त्यांना रोखले, त्याच्या कॅम्पवर हल्ला करत त्यांना मागे धाडले. येथे भारतीय वायुदल ब्रिटिश आणि अमेरिकेला मदत करीत होते. या युद्धांचे हिरो फ्लाईट लेफ्टिनेट अर्जुनसिंह यांना २००२ मध्ये सरकारने मार्शल पद बहाल केले गेले.

२. १९४७ ला भारत स्वतंत्र होताना झालेल्या भारत-पाकिस्तानच्या फाळणीत जम्मू-काश्मीरवर पाकिस्तानचे समर्थन असलेल्या कबिलाई हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात अडकलेल्या काश्मीरच्या लोकांना भारतीय हवाईदलाने बाहेर काढले.

३. काँगोमधील ७५ वर्षांचे बेल्जियमचे शासन १९६० साली संपल्यानंतर काँगोमध्ये सुरू झालेला हिंसेचा उद्रेक मोठा संघर्ष करून भारतीय वायुदलाने थांबविला. संयुक्त राष्ट्राच्या ग्राऊंड तुकडीसाठी एक हवाईतळ बनविला. १९६१ ‘ऑपरेशन विजय’अंतर्गत पोर्तुगिजांचे कंट्रोल टॉवर, वायरलेस स्टेशन, हवामान केंद्र नष्ट करीत भारतीय वायुदलामुळे गोवा भारतात समाविष्ट झाले.

४. १९७१ मध्ये बांगलादेशाची निर्मिती भारतीय वायुदलामुळे झाली.

५. १९६५च्या दुसऱ्या काश्मीर युद्धात पाकिस्तानची अनेक लढाऊ विमाने, बेस कॅम्प उद्ध्वस्त करीत भारताने विजय मिळविला. आपलेही खूप नुकसान झाले.

६. ‘ऑपरेशन मेघदूत’च्या अंतर्गत काश्मीर क्षेत्रातील शियाचिनवर हल्ला करून ते भारताच्या ताब्यात घेतले.

७. ‘ऑपरेशन पवन’अंतर्गत श्रीलंकेला मदत करताना भारतीय वायुदलाने श्रीलंकेच्या १ लाख सुरक्षा दलातील सैनिकांना बाहेर काढले.

८. ‘ऑपरेशन कॅक्टस’अंतर्गत मालदीवची राजधानी माले शहराला सशस्त्र गुन्हेगारांनी केलेला कब्जा भारतीय वायुदलाने सोडविला.

९. १९९९ कारगील युद्धात भारतीय वायुदलाने रणनीती बदलत मिराज आणि मिगच्या साथीने पाकिस्तानवर हल्ला करून विजय मिळविला.

१०. बालकोट दहशतवादी संघटनेने १४ फेब्रुवारी २०१९ रोजी केलेल्या पुलवामा हल्ल्यात आपले ४६ जवान शहीद झाले.

भारताचे वायुदल प्रमुख विरेंद्र सिंह धनोआ यांच्या नेतृत्वाखाली १५ दिवसांच्या आत धाडसी हल्ला करीत भारतीय वायुदलाने बालाकोटवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ करत पाकिस्तानच्या आत घुसून मोठ्या संख्येने दहशतवाद्यांना ठार मारले. त्यांच्या जागा उद्ध्वस्त केल्या. दुसऱ्या दिवशी भारतीय वायुदलाने पाकिस्तानची लढाऊ विमाने भारतीय सीमेवर उड्डाण करताना पाहिली. त्यानंतर पाकिस्तानी विमानाची घुसखोरी रोखण्यासाठी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे मिग-२१ या लढाऊ विमानातून पाठलाग करताना ते पाकिस्तानच्या हद्दीत शिरले गेले. एका क्षेपणास्त्राला धडकही झाली. नियंत्रण रेषेपासून फक्त ७ किलोमीटर अंतरावर त्यांचे विमान कोसळण्यापूर्वीही त्यांनी पाकिस्तानचे एक विमान पाडले. ६० तासांच्या पाकिस्तानी कडक चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले. या अभिनंदन वीराला भारताने २०१९ मध्ये ‘वीरचक्र’ देऊन सन्मानित केले. सामान्य नागरिकांना वायुसेनेबद्दल आपुलकी तेवढेच आकर्षणही असते. नको ते रोज पाहण्या-ऐकण्याऐवजी या क्षेत्राची जाग दिली जाणे खूप गरजेचे आहे. तूर्तास भारतीय वायुसेनेतील सैनिकांना माझा प्रणाम!

mbk1801@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -