विशेष: पूर्णिमा शिंदे
शरीरात होणारे बदल, निसर्गतःच तिच्या तनमनाला कलाटणी देतात. निसर्गाने मातृत्व बहाल केलेल्या तिला एक सुंदर साज निसर्गाकडून अर्पण केला जातो. “मासिक पाळी” मानसिकता परिवर्तित करणारा टप्पा. तर मनासह स्वीकारलेला बदल. आरोग्य, आहार वर्तणूक, स्वभाव या सगळ्यांच गोष्टी बदलतात. याविषयी सज्ञान होणं गरजेचं असतं. हे बदल स्वीकारण्यासाठी मनाची परिवक्वता महत्त्वाची असते.
वय तेरा-चौदा बागडण्याच्या स्थितीत अचानक होणाऱ्या बदलांना सामोरे जाताना ती कोलमडून जाते. असे काय होतं? तेच तर तिला सांगायचं असतं. तिला पटवून देताना स्त्री-पुरुष यातील फरक, तनमनातील बदल, शारीरिक, मानसिक त्याचे नैसर्गिक कारण, परिणामांची सखोल माहिती देणे आईचं काम असतं. मातेकडून लेकीला नैसर्गिक वरदानाचं, विश्वाचं, जगाचं, मातृत्वाचं जन्माचे लेणं-देणं स्वीकारणं पटवावं लागतं. नाजूक मनाला पडलेले प्रश्न उलगडावे लागतात. होणारे बदल सांगावे लागतात. घ्यावयाची काळजी कशी घ्यावी ती उलगडून सांगावी लागते. स्वसंरक्षणाचे मोल, कवच, स्वप्रतिमा जपणे आणि यातून समाजात एक व्यक्ती म्हणून जडणघडण, वैचारिक प्रगल्भता रुजवावी लागते. त्या रूपाने सुसंस्कृती, विवेकबुद्धी जागरूक ठेवून आपण आपले सतर्क कसे राहता येईल, हे सांगावे लागते. मनात भीती, संकोच तर नकोच. पण वाटेल तितके स्वातंत्र्यही नको, संयम हवाच. जोडीला नम्रता, शालिनता, वैचारिक प्रगल्भता, परिपक्वता येण्यासाठी आईने वळण लावायला हवं. अतिलाड किंवा विरुद्ध टोक अतिदडपण, अतिमोकाट सोडू नये, अतिविश्वास टाकू नये, अतिबेफिकीर जबाबदार बनवू नये, तर नम्र, आज्ञाधारक, समंजस, विश्वासू प्रामाणिक होण्यासाठी त्यांचा बौद्धिक विकास, शारीरिक सुदृढता, मानसिक प्रगल्भता आणि यातून घडणारा सर्वांगीण विकास जे जे करता येईल, ते ते पालकांनी निश्चित करावे.
आपल्या मुली वाढवताना त्यांच्याभोवती भीतीचे कुंपण, अपेक्षांचे ओझे आणि जबाबदारीचे रिंगण, इच्छा-आकांक्षा लादू नयेत. जेणेकरून मुलींची किशोरवयात मैत्रीचे संबंध पालकांनी प्रस्थापित केल्यास उत्तमच. त्यांची ती मैत्रीची भूक घरातच पूर्ण होईल. सुविचारांचा खतपाणी, विवेकाचा सूर्यप्रकाश घरातच मिळाला जावा. वळणदार शिस्तीचे धडे, घरकामाचे वळण दिल्यास मुली धांदरट, बेजबाबदार, आळशी होणार नाहीत, मस्तीखोर होणार नाहीत याची काटेकोर काळजी घ्यावी. वयात आलेल्या मुलींच्या इतरांशी सततच्या तुलना टाळाव्यात. त्यांना कमी लेखू नये, खच्चीकरण करू नये, संशय टाळावा. त्यापेक्षा हितगुज करावे, छान गप्पांतून त्यांच्या प्रश्नांना उकल करावे. सामंजस्यातून समस्यांचे निराकरण करावे आणि एक सुदृढ शरीर व निकोप मन घडेल, संस्कारी व्यक्तिमत्त्व घडेल, असे सुंदर बाळबोध, सुसंस्कृत, संपन्न व्यक्तिमत्त्व घडवताना जे जे हवं ते छंद, कला, ज्ञान, माहिती तंत्रज्ञान, मनोरंजन, कौशल्य, खेळ यांतून सर्वांगीण विकासाचा ध्यास या व्यक्तिमत्त्वाने घेण्याचा मानस असावा. ही सर्वस्वी पालकांची जबाबदारी आहे.
‘मैत्री’विषयक सोशल मीडियाचा वापर, रात्री-अपरात्री बाहेर सर्वात पॉकेटमनी जास्त देणं, कपडे परिधान करण्याच्या गोष्टींबाबत मोठ्यांनी स्वतःही पोच राखून वागले, तरच मुलेही आपली जरब, धाक, मूल्य जाणतील. आपली कष्टांची त्यांना किंमत असू द्यावी. कामाची वाटणी ठेवावी आणि मग पुढे मार्गक्रमण करावे. स्वयंशिस्त आपल्यात असली, तरच पुढच्याही पिढीला लागेल. आपणच आपल्या मोठ्या पिढीचा सन्मान केला, तरच आपल्यालादेखील त्यांच्याकडून तो सन्मान प्राप्त होईल. गरजांवर नियंत्रण असावे, त्यांच्यावर आपल्या अपेक्षांचे ओझे लादू नयेत. म्हणजे पश्चातापाची वेळ येत नाही. सर्वात महत्त्वाची म्हणजे संगत. संगतीविषयी म्हणाल, तर ती सुद्धा डोळ्यांत तेल घालून सतर्कता आणि सावधानता बाळगावी. कारण बाभळीच्या झाडाच्या कुंपणाला चंदन असेल, तर बाभळीस सुवासिक करेल आणि बाभळी मात्र चंदनाला काटे टोचेल म्हणून आपण कसे असावे! आणि कसे असू नये! हे आपल्याकडून पुढच्या पिढीला काय देण्यात यावे! हे संस्कार एका मातेकडून आपल्या मुलीकडे संस्कारित होत असतात आणि म्हणूनच आपल्या मुली वाढवताना आपली ही मुख्य कर्तव्ये आणि जबाबदारी म्हणावी लागेल.