दी लेडी बॉस: अर्चना सोंडे
महिलांनी कितीही प्रगती केली असली तरी, भारतातील अनेक महिलांना अजूनही सार्वजनिक ठिकाणी अंतर्वस्त्रासारख्या खासगी गोष्टीवर चर्चा करणे कठीण वाटते. दुकानात जाऊन अंतर्वस्त्र खरेदी करणे महिलांना अजूनही त्रासदायक वाटते. रिटेल स्टोअर्सच्या अंतर्वस्त्र विभागातील सेल्समनना जेव्हा महिलांना त्यांच्या गरजा समजावून सांगाव्या लागतात, तेव्हा त्यांच्यासाठी परिस्थिती आणखी वाईट असते. जेव्हा तिला समजले की स्त्रियांना अंतर्वस्त्र खरेदी करण्यात समस्या आहे, तेव्हा तिने एक ऑनलाइन स्टोअर सुरू करण्याचा निर्णय घेतला जो महिलांच्या दारापर्यंत अंतर्वस्त्र पोहोचवेल. समस्येच्या निराकरणातून तिने ब्रॅण्ड निर्माण केला तो म्हणजे झिवामे आणि हा ब्रॅण्ड प्रस्थापित करणारी उद्योजिका म्हणजे रिचा कार.
रिचा कारचा जन्म झारखंडमधील जमशेदपूर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. २००७ मध्ये नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (NMIMS) मधून अभियांत्रिकीची पदवी आणि व्यवसायात एमबीए पदवीसह बिट्स पिलानीची पदवीधर असलेल्या रिचा कारने स्पेन्सर्स आणि सॅप रिटेल कन्सल्टन्सीसाठी काम करून तिच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. एमबीए पूर्ण केल्यानंतर रिचाने ब्रँड कम्युनिकेशन्स मॅनेजर म्हणून स्पेन्सर्समध्ये प्रवेश केला. योग्यतेनुसार तिची बढती झाली. २०११ पर्यंत ती कंपनीत राहिली. स्पेन्सरच्या तिच्या कार्यकाळानंतर, तिला सॅपद्वारे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले, जिथे एका प्रकल्पावर काम करत असताना तिने महिलांना अंतर्वस्त्र शोधताना येणाऱ्या अडचणी शोधून काढल्या. तिला उमजले की, महिला कितीही आधुनिक विचारांची असली तरी देखील अंतर्वस्त्र खरेदी करताना बहुतांश महिला अवघडून जातात. त्यांना नेमके सांगता येत नाही. अनेक मुलींसाठी तर त्यांच्या आई अंतर्वस्त्र आणायच्या, तर लग्न झालेल्या महिलांचे पती त्यांच्यासाठी अंतर्वस्त्राची खरेदी करत. त्यामुळे अचूक आकाराचे अंतर्वस्त्र मिळणे कठीण. असे अंतर्वस्त्र परिधान केल्याने अवघडल्यासारखे होई. परिणामी आत्मविश्वास कमी झाल्यासारखे वाटे. यावर उपाय म्हणून रिचाने एक ऑनलाइन अंतर्वस्त्र स्टोअर सुरू करण्याची कल्पना मांडली.
रिचाने पहिल्यांदा तिचा ऑनलाइन अंतर्वस्त्र व्यवसाय सुरू केला, तेव्हा तिला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. तिने अंतर्वस्त्र विक्री व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला, ज्याला तिच्या कुटुंबाने विरोध केला. मुख्य म्हणजे रिचाच्या आईनेच आपल्या मुलीच्या अंतर्वस्त्र ऑनलाइन विक्री करण्याच्या संकल्पनेला कडाडून विरोध केला. तिच्या उद्योजकतेच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा अडथळा होता. रिचाची आई तिच्या मुलीच्या अंतर्वस्त्रे विकण्याच्या विचाराने घाबरली होती. तिने विचारले की, ती तिच्या मुलीच्या ऑनलाइन अंतर्वस्त्र व्यवसायाबद्दल तिच्या मैत्रिणींना काय सांगेल. तिला नेमकं काय करायचं आहे हे रिचाच्या वडिलांना स्पष्ट नव्हते. रिचा मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिली. तिने तिच्या निर्णयापासून न डगमगता व्यवसाय सुरू केला.
रिचाने पहिल्यांदा व्यवसाय सुरू केला, तेव्हा तिला समाजाकडून विरोधाचा सामना करावा लागला. लोक तिच्या व्यवसायाची टिंगल करत असत. तिला सुरुवातीला फर्मसाठी स्टोअर शोधण्यासाठी संघर्ष करावा लागला. भाड्याने खोली घेत असतानाही तिने ऑनलाइन कपडे विकल्याचे घरमालकाला सांगितले. रिचाच्या आईने जरी सुरुवातीला तिच्या अंतर्वस्त्र विक्री व्यवसायावर आक्षेप घेतला होता तरी नंतर तिच्या लक्षात आले की, तिची मुलगी खरं तर योग्य व्यवसाय चालवत आहे. पुढे जाऊन रिचाच्या आईने कंपनी सुरू करण्यासाठी रिचाला आपले बचत केलेले पैसे देऊ केले. त्यानंतर रिचाने तिची कंपनी लॉन्च करण्यासाठी तिचे नातेवाईक आणि मित्रांकडून ३५ लाख जमा केले. रिचाने २०११ मध्ये ‘झिवामे’ची स्थापना केली.
झिवामेद्वारे अंतर्वस्त्रांच्या पलीकडे जाऊन महिलांचे कपडे, फिटनेस वेअर आणि स्लीपवेअर ऑफर करते आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा प्रदान करण्यासाठी नावलौकिकही मिळवते. किंमत, गुणवत्ता आणि ग्राहकांचा अभिप्राय यांसारख्या घटकांचा विचार करून उत्पादन मिश्रणाच्या निर्णयांवर रिचाने लक्ष केंद्रित केल्याने खरेदीदारांमध्ये विश्वास आणि विश्वास निर्माण करण्यात मदत झाली आहे. २०११ मध्ये स्थापनेपासून, झिवामेला २५ लाख ग्राहक दर महिन्याला भेट देतात. झिवामे जसजसे वाढत गेले, तसतसे अनेक बड्या उद्योगपतींचे लक्ष वेधून घेतले. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा हे २०१५ मध्ये झिवामेमधील सुरुवातीच्या गुंतवणूकदारांपैकी एक होते. त्यांनी कंपनीला कित्येक दशलक्ष डॉलर्सच्या पातळीवर नेले.
रिलायन्स रिटेल आणि ब्रँड्स या कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी आणि त्यांची मुलगी ईशा अंबानी यांच्या नजरेत झिवामे आली, तेव्हा ती ७५० कोटी रुपयांची कंपनी होती. लवकरच रिलायन्स रिटेलने झिवामेला अनेक दशलक्ष डॉलर्सच्या डीलसाठी विकत घेतले आणि कंपनीचा आता वार्षिक महसूल रु. १००० कोटींहून अधिक आहे. निव्वळ समस्येकडे पाहू नका. प्रत्येक समस्येला उत्तर असते. समस्येच्या तळाशी त्यावर जी उपाय शोधते, तीच खरी लेडी बॉस असते. रिचा कारला महिलांची समस्या समजली या समस्येवरचे तिने उत्तर शोधले. या उत्तराने आज ती कोट्यधीश महिला उद्योजिका म्हणून गणली जाते. म्हणूनच अंतर्वस्त्र उद्योगक्षेत्रातील रिचा कार ‘लेडी बॉस’ आहे.