पुणे: पुण्यातील भोरच्या वरंधा घाटात शनिवारी एका मिनी बसला मोठा अपघात(accident) झाला. स्वारगेट येथून भोरमार्गाने महाड-चिपळूणकडे जाणारी एक मिनी बस वरंधा घाटात ६० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघाताता चालकाचा मृत्यू झाला तर काही प्रवासी जखमी झाले.
शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हा अपघात झाला. पुण्याच्या स्वारगेट येथून भोरमार्गे महाड-चिपळूणच्या दिशेने ही बस जात होती. त्यावेळेस वरंधा घाटात ही बस रस्ता सोडून धरणाच्या बाजूला असलेल्या ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळली.
या घाटात रस्त्यांना संरक्षण कडे नाहीत. चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला. दरम्यान, ही बस धरणाच्या पाण्यापासून ५ फुटांवर अडकली. नाहीतर मोठा अनर्थच घडला असता.
या अपघातात अजिंक्य कोलते हा चालक जखमी झाला होता. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर गाडीतील इतर सर्व प्रवासी सुखरूप आहे. काही जखमींना भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.