क्राइम: ॲड. रिया करंजकर
वकिली हा असा पेशा आहे की, आपल्या पक्षकाराला कसं जिंकवून देता येईल, आपल्या पक्षकराला कसा न्याय मिळेल यासाठी जीवाचं रान वकील करत असतात. पण केव्हा केव्हा असं होतं की, या पक्षकारांमुळेच वकिलांना नको तेवढा मनस्तापही सहन करावा लागतो.
रिमा आणि रोहित यांचं लव्ह मॅरेज होतं व त्यांना तीन वर्षांचा मुलगाही होता. संसार व्यवस्थित चालू असताना. रिमा हिचे शेजारीच असलेल्या रूपेशशी आफ्टर मेरिटियल अफेअर चालू झालं. याची जराही कल्पना रोहित याला नव्हती. त्याचे आपल्या पत्नी आणि मुलावर अतिशय प्रेम होतं व रिमाही आपण एखाद्या पतिव्रता असल्यासारखी वागत होती. त्याच्यामुळे रोहितला तिच्यावर कुठल्याच प्रकारे संशय नव्हता. पण काही काळानंतर रिमाच्या वागण्यामध्ये बदल होऊ लागला. कारण ती रोहितशी भांडू लागली. कारणंही साधीच असत. पण त्याचा एवढा मोठा इश्यू रिमा का करत आहे, हे मात्र रोहितला समजत नव्हते. रोहितला वाटले की, आपलंच काहीतरी चुकत आहे म्हणून तो रिमाला बोलला, “अगं तू अशी का वागत आहेस माझं काय चुकत असेल तर तू सांग.” तेव्हा तिने सरळ सांगितलं की, “मला तुझ्यासोबत राहायचं नाही, वेगळं व्हायचं आहे.” ऐकल्यावर रोहितला धक्का बसला आणि थोड्या वेळात वाटलं की, रिमा आपली मस्करी करत असेल. म्हणून त्याने या गोष्टीकडे कानाडोळा केला. पण त्याला हळूहळू आपल्या पत्नीचे प्रेमप्रकरण असल्याचं समजलं. त्याने आदळआपट न करता शांतपणे याबाबत रिमाला विचारले असता, सुरुवातीला तिने या गोष्टीचा स्वीकार केला नाही, पण नंतर तिने आपलं प्रेम दुसऱ्या व्यक्तीवर असल्याचं कबूल केलं. रोहित याने तिला चांगल्या प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला. “आपला एक मुलगा आहे त्याच्या भविष्याचा तरी विचार कर” असं तो तिला सांगू लागला.
आपल्या संसाराची वाट लागू नये म्हणून तिला तो समजवत होता व “तुझ्या चुकांना मी माफ करतो” एवढेही तो बोलत होता तरी पण ती ऐकत नव्हती आणि एक दिवस त्याला “आपण म्युच्युअल अंडरस्टँडिंगने घटस्फोट घेऊया मला तुझ्यासोबत राहायचं नाहीये” असं तिने सांगितलं. रोहित यांनीही विचार केला की एखादी व्यक्ती आपल्यासोबत राहत नसेल, तर तिला जबरदस्ती ठेवून काही फायदा नाही. म्हणून तोही म्युच्युअल घटस्फोट घेण्यास तयार झाला आणि दोघांनीही कोर्टामध्ये केस फाइल केली. प्रथम कॉऊन्सिलिंग झाल्यावर रिमाच्या असं लक्षात आलं की, आपण घटस्फोट घेताना रोहितकडून काहीच मागितलेलं नाही. त्याला आपण काही न घेता घटस्फोट देत आहोत आणि त्या घटस्फोटाचे टर्म्स अँड कंडिशनवर आपण लक्ष दिलं नाही हेही तिला समजलं आणि त्यानंतर ती कोर्टातच येण्याची बंद झाली. रोहितला मी कोर्टात येते असं सांगायची. पण ती कोर्टात यायचीच नाही.
म्युच्युअल घटस्फोट असल्यामुळे दोन्ही पक्षकारांचा वकील एकच होता. रिमाचे वडील रोहितला बोलायचे, माझ्या मुलीला घटस्फोट लवकर दे आणि रोहित वकिलांना सांगायचा की, घटस्फोटाची प्रक्रिया लवकर करा. त्यात एकच पक्षकार कोर्टात येत होता आणि पहिला पक्षकार कोर्टात येत नव्हता. त्यामुळे नेमकं करायचं काय? हे वकिलाला समजत नव्हतं कारण कोर्टामध्ये दोघांच्या संमतीने घटस्फोट टाकलेला होता. नवी तारीख असायची, त्यावेळी आपल्या वकील आणि रोहितला कोर्टात येते म्हणून रिमा सांगायची आणि नेमकी त्या दिवशी ती हजर नसायची. अशा रीतीने वर्ष निघून गेलं तरी अजून रोहित नी रिमा यांचा घटस्फोट झालेला नव्हता.
रोहित वकिलांच्या मागे लागलेला होता की, “तुम्ही केस फाइल केली आहे, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही मला घटस्फोट घेऊन द्या.” पण इथे दोन्ही पक्षकार असतील, तरच तो घटस्फोट होणार होता आणि या दोन्ही पक्षकारांमधला एकच पक्षकार येत होता. त्यामुळे घटस्फोट लांबणीवर चालला होता. आधी रिमा हिला कुठल्याही अटी शर्ती न ठेवता घटस्फोट घ्यायचा होता. त्याच्यामुळे कुठल्याही अटी-शर्ती कबूल करून तिने रोहितकडून काही मागितले गेले नव्हते. पण केस फाइल केल्यानंतर तिच्या लक्षात आलं की, आपण काही न घेता घटस्फोट देतोय आणि त्यामुळे ती कोर्टात हजर होत नव्हती. तिला काही न घेता घटस्फोट घेऊन तिच्या प्रियकरासोबत राहायचं होतं. पण आता रोहितकडून काही न घेता घटस्फोट देत आहोत हे तिला चूक वाटत होते म्हणून ती कोर्टात हजर राहत नव्हती आणि ती हजर राहत नव्हती म्हणून रोहितला घटस्फोट मिळत नव्हता. अटी शर्तींप्रमाणे रोहित तिला काहीही द्यायला तयार नव्हता कारण, सुरुवातीला तो घटस्फोट घ्यायला तयार नव्हता; परंतु रिमाला घटस्फोट घ्यायचा होता. तीच घटस्फोट घेते आणि तीच मागते ही गोष्ट रोहितला मान्य नव्हती. त्यामुळे दोघा पक्षकारांच्या वादामध्ये वकिलाचे मात्र मधल्या मध्ये मरण होत होते.
पक्षकार राहिले बाजूला पण दोन्ही पक्षकार आता वकिलाला दोष देत होते की, तुम्ही आमची केस व्यवस्थित फाइल केली नाही आणि एक पक्षकार हजर राहत नव्हता, तर दुसरा पक्षकार रोहित वकिलावर दबाव टाकत होता की तुम्ही आता मला घटस्फोट करून द्या. रोहित आणि रिमाचे वडील हे वकिलांना या गोष्टीसाठी जबाबदार मानत होते. रिमाला लवकरात लवकर घटस्फोट हवा होता म्हणून तिने आधी रोहितकडून कोणतीही मागणी केली नव्हती पण आता ती मागणी करत होती. ज्यामुळे रोहित आणि रिमाचा घटस्फोट थांबलेला होता. कारण, रिमाच कोर्टात येत नव्हती. पण त्याचा दोष मात्र वकिलांना दिला जात होता. (सत्यघटनेवर आधारित)