ऐकलंत का!: दीपक परब
मराठी प्रेक्षकांबरोबरच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खळखळून हसायला लावणारे अस्सल मराठमोळे अभिनेते दादा कोंडके यांचे ब्लॉकबस्टर सिनेमे पुन्हा एकदा घरबसल्या पाहता येणार आहेत. सत्तरच्या दशकात तमाशापटांचा काळ सरला होता आणि विनोदी सिनेमाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. गावरान मातीतला अस्सल विनोद, रोजच्या जगण्यातील कथा, खळखळून हसवणारे विनोदी संवाद यांची गट्टी जमवून दादा कोंडके नावाचे एक पर्व मराठी सिनेमासृष्टीत दाखल झाले. विनोदाचा सम्राट असणारे दादा कोंडके यांनी मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीही गाजवली. दादा कोंडकेंच्या प्रत्येक सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. आता दादांचे ब्लॉकबस्टर सिनेमे प्रेक्षकांना पुन्हा एकदा घरबसल्या पाहायला मिळणार आहेत. यात ‘वाजवू का’, ‘तुमचं आमचं जमलं’ आणि ‘मुका घ्या मुका’ या सिनेमांचा समावेश आहे.
‘वाजवू का’, ‘तुमचं आमचं जमलं’ आणि ‘मुका घ्या मुका’ या सिनेमांचा आनंद प्रेक्षकांना आणि दादांच्या चाहत्यांना घरबसल्या मिळणार आहे. दादांच्या ब्लॉकबस्टर सिनेमांची मेजवानी मिळणार असल्याने चाहतेही उत्सुक आहेत. झी मराठीवर प्रेक्षकांना हे सिनेमे पाहता येणार आहेत. दादांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या सिनेमांची मेजवानी झी मराठीने प्रेक्षकांसाठी आणली आहे. ८ ऑक्टोबरपासून दर रविवारी दादांचे ३ सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सिनेमांच्या माध्यमातून दादांना मानाचा मुजरा दिला जाणार आहे.
दादा कोंडके यांनी आपल्या विनोदी अभिनयाने सत्तरच्या दशकात लहान मुलांपासून ज्येष्ठ मंडळीपर्यंत सर्वांनाच वेड लावले होते. दादा कोंडकेंच्या सिनेमांची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये कायम आहे. दादा कोंडके यांनी १९६९ मध्ये ‘तांबडी माती’ या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास १९९४ मध्ये ‘सासरचं धोतर’ या सिनेमापर्यंत येऊन थांबला. त्यानंतर गेली ५० वर्षे दादा कोंडके हे नाव आजही मराठी सिनेमावर राज्य करत आहे.