Wednesday, October 9, 2024
Homeसाप्ताहिककोलाजफुलपाखरांची मेजवानी!

फुलपाखरांची मेजवानी!

निसर्गवेद: डॉ. महालक्ष्मी वानखेडकर

रंगीबिरंगी, अतिशय सुंदर, आकर्षक, स्वर्गीय पंखांच्या सौंदर्याने ओतप्रोत भरलेले, नाजूक, स्वच्छंदी, निस्वार्थी, संवेदनशील, सकारात्मक, सक्रिय, निसर्गाचा आनंद घेणारे आनंद देणारे, मनःशांती देणारे, शांत असे निसर्गाच्या सौंदर्यनिर्मितीतला एक अप्रतिम जीव म्हणजे फुलपाखरू. फुलपाखराच्या रूपात असणारे सर्वांचे आवडते असे धरतीवरचे देवदूत.

मी जेव्हा फुलपाखरांचे चित्र काढण्याचा विचार केला, तेव्हा दुर्मीळ असणाऱ्या फुलपाखरांची निवड केली. या कलाकृतीत अनेक फुलपाखरे, त्यांची जन्माअवस्था आणि त्यांचे स्वच्छंदी जीवन साकारले आहे. निरीक्षणांतर्गत ते तुमच्याशी संवाद साधत आहेत असेच वाटेल. एवढासा जीव अगदी सव्वा सें.मी.पासून ते २८ सें.मी.पर्यंत असणारा. कधी दचकवणारे, तर कधी उत्सुकता वाढवणारे असे निसर्गमय आकार असतात. ब्ल्यू मॉरमॉन फुलपाखरू हे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे. ‘राज्य फुलपाखरू’ असलेले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. महाराष्ट्रात एकूण १२९ प्रजाती आहेत. महाराष्ट्रात कवड्या, केशर टोक्या, अरंड्या, कृष्णराजा, गुलाबी राणी अशी अनेक नावे आहेत. भारतात तीन नावे आहेत जी अजून राज्य फुलपाखराच्या लिस्टमध्ये आहेत.

“फुलपाखरांचा हल्ला” या विषयावर ही चित्ररचना आहे. या पेंटिंगचा आकार : ६० सेमी × ९२ सेमी आहे. साधारणपणे फुलपाखरांचा हल्ला झाडांवर झाला असे म्हणतात, पण मी म्हणते की ते आपला आनंद साजरा करण्यासाठी मेजवानीसाठी एकत्र आलेले आहेत आणि त्याचे कारण त्यांना त्यांचे आवडते अन्न मिळाले आहे. मग त्यांना ‘ॲटॅक ऑन द ट्री म्हणावं की पार्टी ऑन द ट्री म्हणावं?’ या चित्रात खूप विविध प्रकारची फुलपाखरे आहेत जी नामशेष झाली आहेत किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या चित्रात मोनार्कची जन्मावस्था, घोस्ट ,लॉन्गटेल, गोल्डन, ग्लास विंग, मियामी ब्ल्यू, मृत पानांचे (डेड लीफ), सुरवंटाचे विविध प्रकार, लीफ इन्सेक्ट, गोल्डन, व्हाईट बटरफ्लाय व्हॅम्पायर, जगातील सर्वात मोठे फुलपाखरू न्यूगीनीतील क्वीन अलेक्झांडरा बर्डविंग, लुना मॉथ, जगातील सर्वात लहान अमेरिकेतील फुलपाखरू वेस्टन पिग्मी ब्ल्यू आणि भारतातील सर्वात लहान फुलपाखरू ग्रास ज्वेल इत्यादी सर्व फुलपाखरे या कलाकृतीत पाहायला मिळतात. दक्षिण अमेरिकेतील मॉर्फो ही इंद्रधनुषी, चमकदार आणि ऊर्जावान अशी फुलपाखरं. पण त्यांचे सौंदर्यच त्यांच्यासाठी शाप ठरले. त्यांच्या शिकारीमुळे ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ही सर्व फुलपाखरं जेव्हा झुंडीने स्थलांतर करतात, तेव्हा एखाद्या झाडावर रस पिण्यासाठी एकत्र येतात जे पाहून आपल्याला वाटतं की, त्यांनी त्या झाडावर हल्ला केलाय. खरं तर ते त्यांच्या आनंदाचे क्षण असतात आणि हेच क्षण मी टिपले. दुसरे आपले राज्य फुलपाखरू मोनार्क म्हणजेच सम्राट तेही पानांवर आनंदाने भिरभिरत आहेत, असे पाहायला मिळते.

पतंग आणि फुलपाखरांच्या सुमारे १७.५०० प्रजाती आहेत. मादी नरापेक्षा मोठी असते फुलपाखरांचे जीवन कमाल ४ दिवस ते १० ते ११ महिने. स्त्रिया सामान्यतः पुरुषांपेक्षा जास्त काळ जगतात. फुलपाखरू सुद्धा आपल्यासारखी पानांच्या आत पंख दुमडून किंवा पानांना खोडांना लटकून झोपतात. दुपारच्या वेळेस फुलपाखरं सक्रिय असतात. मादीला आकर्षित करण्यासाठी पंखांची उघडझाप करतात आणि भिरभिरतात. यातून येणारा मधुर आवाज हा फक्त तिलाच समजतो. जेव्हा आपण फुलपाखरांना स्पर्श करतो, तेव्हा त्यांचे रंगीत मखमली चूर्ण आपल्या बोटांना लागते आणि पंखांचा रंग उडतो. असं म्हणतात की मग ते उडू शकत नाहीत; परंतु ते उडू शकतात. खरं तर फुलपाखरांवरील स्केल त्यांना उडण्यासाठी आणि रंगांसाठी मदत करतात. आपल्या स्पर्शाने ते स्केल तुटतात आणि त्यांचे ते मखमली पंख कमकुवत होतात. त्यामुळेच त्यांना उडताना त्रास होतो. आपल्यासारखेच फुलपाखरंसुद्धा आजारी पडतात. बऱ्याचदा आपल्याला फुलपाखरं जमिनीवर पडलेली दिसतात. जर ती मृत नसतील, तर त्यांना साखरेचे पाणी किंवा मध पाणी, केळे किंवा फळांचा गर द्यावा. जेणेकरून परत त्यांना शक्ती येईल. फुलपाखरे सुद्धा स्थलांतरित होत असतात. किंबहुना प्रत्येक जीव अन्नासाठी स्थलांतरित होतात.

एकदा माझ्या मित्राने मला एक अनुभव सांगितला. जेव्हा तो शिर्डीला जात होता, तेव्हा रस्त्यात येणाऱ्या बसच्या पुढे अनेक फुलपाखरे येऊन बसला धडकून जमिनीवर पडत होती. प्रत्येकाला ती आत्महत्या करीत आहेत का? असे वाटत होते. याची दोन कारणे आहेत. एक तर आजूबाजूचा परिसर हा ओसाड होता. स्थलांतरित झालेल्या या सर्व फुलपाखरांना अन्न मिळाले नसावे. दुसरे कारण रस्त्यावरील लाइटला आकर्षित होऊन यांच्या झुंडी तिथे येत असाव्यात आणि रस्त्यावरून येणाऱ्या बसला धडकत असाव्यात. मोनार्क फुलपाखराचे पंख काळ्या किनारी शिरा आणि काठावर पांढरे ठिपके असलेले केशरी रंगाचे आहेत. हे फुलपाखरू हंगामी स्थलांतरासाठी प्रसिद्ध आहे. ईस्टर्न मोनार्क फुलपाखराचे वार्षिक स्थलांतर यूएस आणि कॅनडापासून ३,००० मैलांवर होत असते.

ग्लासविंग फुलपाखरू मध्य आणि दक्षिण अमेरिका, मेक्सिको आणि टेक्सासमध्ये आढळते. या फुलपाखराला काचेसारखे दिसणारे रंगीत किनारी असलेले स्पष्ट पंख आहेत. नॅनोपिलरच्या संरचनेमुळे पंखांना पारदर्शकता असते ज्यातून प्रकाश प्रतिबिंबाची क्रिया ही कमी प्रमाणात असते.फुलपाखरे भरपूर तणयुक्त झाडे खातात आणि इतर प्राण्यांसाठी अन्न स्रोत देतात. फुलपाखर फक्त परागकण प्रसारक नाहीत, तर जीवसृष्टी संतुलन कार्यकारी अनमोल जीव आहेत. पण ही नैसर्गिक रचना आहे. त्यांच्या पायाला फुलातील परागकण लागून ते सर्वत्र विखुरले जातात. म्हणूनच तर म्हणते की, नैसर्गिक सर्व घटक कळत-नकळत पर्यावरण संतुलन करत असतात आणि म्हणूनच परमेश्वराने सर्व घटक अगदी विचारपूर्वकच बनवले आहेत. ज्याचे गूढ अनाकलनीय आहे. जसे फुलपाखरांना सहजतेने परागकणांपर्यंत पोहोचता यावं म्हणून परमेश्वराने त्यांना खूप नाजूक केले. आहे. जी फुलपाखरे मोठी आहेत तिथली फुले ही मोठीच आहेत; परंतु परमेश्वराने ज्यांना बुद्धी देऊन आणि परिपूर्ण करून येथे पाठवले आहे, तेच या पृथ्वीचा विनाश करण्यास कारणीभूत झाले आहेत. मानवाने स्वतःच्या सोयीसाठी केलेल्या निसर्गाच्या विध्वंसामुळे आज फुलपाखरांच्यासुद्धा अनेक प्रजाती नष्ट झाल्या आणि संतुलित निसर्गचक्राची साखळी तुटत चालली. यावर एकच उपाय म्हणजे योग्य ती वृक्षलागवड करणे आणि कडक निर्बंध योजना लागू करणे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -