
दुर्गंधीने नागरिक त्रस्त
ठाणे : गेल्या काही वर्षांपासून मुंबई कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राऊंड मधून येणार्या दुर्गंधीसंदर्भात (Kanjurmarg Dumping ground) स्थानिकांनी वारंवार आंदोलनाची मागणी केली होती. मात्र, अजूनही त्यावर तोडगा काढण्यात आलेला नाही. मुंबई उपनगरातील डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने (Shivsena) कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. शिवसेनेचे नेते अनिल पांगारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे.
आंदोलकांनी डम्पिंग ग्राऊंडच्या समोर असलेला रस्ता म्हणजेच पूर्व द्रुतगती मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे ठाण्याची सर्व वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनिल पांगारे म्हणाले की, या मार्गावर कितीतरी दुर्गंधी येत आहे. गेली कित्येक वर्षे इथे राहणारे लोक ही दुर्गंधी सहन करत आहेत. आजारांना सामोरे जात आहेत. आमचं सरकार हे गोरगरिबांचं आहे, त्यामुळे त्यांनी हे कुठेतरी थांबवलं पाहिजे म्हणून हा रास्ता रोको आणि आंदोलन आम्ही करत आहोत. यामुळे इथे अडवण्यात आलेल्या लोकांनाही कळेल की थोडा वेळ थांबलं तरी किती दुर्गंधी सहन करावी लागते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
आंदोलकांची ही मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचून आठ ते दहा दिवसांत प्रश्न सोडवला गेला पाहिजे अन्यथा आंदोलन आणखी तीव्र होईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. प्रशासन आणि आंदोलक यांच्यात मात्र अजूनही कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आंदोलनाची दखल घेऊन आठ ते दहा दिवसांत हा प्रश्न सुटणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.