
ओटावा : कॅनडामध्ये (Canada) विमान कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. कॅनडातील वँकूवरजवळील चिल्लीवॅक येथे हे विमान दुर्घटनाग्रस्त (Plane Crash) झाल्याची माहिती समोर आली आहे. या विमान अपघातात दोन प्रशिक्षणार्थी भारतीय वैमानिकांसह (Trainee Indian pilots) आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. दोन्ही भारतीय मुंबईतील रहिवासी होते. अभय गडरू आणि यश विजय रामुगाडे अशी या दोघांची नावे आहेत. स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचलं असून यासंदर्भात अधिक तपास सुरु आहे.
पायपर पीए-३४ सेनेका हे दुहेरी इंजिन असलेले हलके विमान चिलीवॅक शहरातील मोटेलच्या मागील झाडांवर आदळून हा अपघात झाला, अशी माहिती कॅनडाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या अपघातात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणाचे नुकसान झालेले नाही.
विमान विमानतळावर लँडिंगसाठी येत असताना हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. चिल्लीवॅक विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी विमान खाजगी मालमत्तेवर कोसळल्याची पुष्टी केली. मात्र, विमान अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट असून कॅनडाच्या वाहतूक सुरक्षा मंडळाने या घटनेचा तपास सुरू केला आहे.