
पावसामुळे सामना झाला होता रदद; 'असा' झाला विजय...
हांगझोऊ : आज सकाळी भारतीय महिला कबड्डी संघाने दमदार सुरुवात करत सुवर्णपदक पटकावले. यामुळे भारताची पदकसंख्या १०० झाली. यातच आजच्या दिवशी आशियाई क्रीडा स्पर्धांमधून (Asian Games 2023) आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट सामन्यात (Cricket Match) भारताने सुवर्णपदक पटकावले आहे. तर, अफगाणिस्तानला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे. यामुळे भारताच्या सुवर्णपदकांची आतापर्यंतची एकूण संख्या २८ झाली आहे. तर ३५ रौप्य आणि ४० ब्राँझ पदकांसह भारताची एकूण पदकसंख्या १०३ झाली आहे.
अफगाणिस्तान विरुद्ध भारत (Afganistan Vs. India) हा सामना सुरु असताना अचानक पाऊस सुरु झाला. त्यामुळे सामना मधेच थांबवावा लागला. हांगझोऊमध्ये अजूनही पाऊस सुरु आहे. त्यामुळे पुन्हा सामना सुरु करण्याची शक्यता फार कमी होती. म्हणून हा सामना रद्द करण्यात आला. आशियाई खेळांच्या नियमांनुसार, पावसामुळे सामना रद्द झाला, तर उच्च रँकिंग संघाला विजेता घोषित केलं जातं. या नियमानुसार, भारतीय संघ क्रमवारीत अफगाणिस्तानच्या पुढे असल्यामुळे भारताला सुवर्णपदक जाहीर करण्यात आलं.
भारताने आजच्या दिवसांत सहा सुवर्णपदकांची कमाई केली आहे. सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीने बॅडमिंटन पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत विजय मिळवत सुवर्ण पदकावर नाव कोरलं. योथी सुरेखा हिने महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजीत सुवर्णपदक पटकावले, तर ओजस प्रवीण देवतळे याने पुरुषांच्या कंपाउंड तिरंदाजीत सुवर्णपदक जिंकले. महिला कबड्डी संघानेही अंतिम फेरीत चायनीज तैपेईचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले, तर कबड्डी पुरुषांच्या अंतिम फेरीत भारताने इराणचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. यानंतर क्रिकेटमध्ये सुवर्ण पटकावत भारताने आज सहा सुवर्णपदकांची कमाई केली आहे. यानंतर आता वर्ल्डकप देखील भारतच जिंकणार अशा आशयाचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.