
महिला कबडडी संघाने कमावले शंभरावे पदक आणि २५ वे सुवर्णपदक...
हांगझोऊ : चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई खेळांमध्ये (Asian games 2023) भारताने आतापर्यंतची सर्वांत चमकदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. भारताच्या खेळाडूंनी पदकांचे शतक (Century of medals) गाठले आहे. २५ सुवर्ण (Gold), ३५ रौप्य (Silver) आणि ४० ब्राँझ (Bronze) पदकांची कमाई करत भारत सर्वाधिक पदकांच्या यादीत चौथ्या स्थानावर स्थिरावला आहे. आज महिलांच्या कबड्डी संघाने तैपेईचा पराभव करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आणि भारताच्या एकूण पदकांची संख्या १०० झाली.
आशियाई स्पर्धेच्या चौदाव्या दिवशी महिलांच्या वैयक्तिक कंपाउंड तिरंदाजीमध्ये अदिती गोपीचंद स्वामीला दिवसाचे पहिले पदक कांस्यपदक मिळाले. तिने कांस्यपदकाच्या लढतीत इंडोनेशियाच्या रतिह फदलीचा १४६-१४० असा पराभव केला. याच स्पर्धेत ज्योतीने दक्षिण कोरियाच्या चावोन सोचा या खेळाडूचा १४९-१४५ असा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. थोड्याच वेळात, भारताने तिरंदाजीमध्येही सुवर्ण कामगिरी केली. ओजस देवतळेने पुरुषांच्या कंपाऊंड फायनलमध्ये आपला देशबांधव अभिषेक वर्माविरुद्ध १४९-१४७ असा विजय मिळवून सुवर्णपदक मिळवले.
अखेर महिला कबड्डी संघाने अंतिम फेरीत चायनीज तैपेईचा २६-२५ असा पराभव करत भारताच्या पदकांची संख्या १००वर नेली. तैवानसोबत होत असलेल्या सामन्यात हाफ टाईमपर्यंत भारतीय टीम १४-९ ने आघाडीवर होती. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये तैवानने जोरदार मुसंडी मारली. अटीतटीच्या या सामन्यात भारताने विजय मिळवला. आज दुपारी पुरूष कबड्डी टीम आणि पुरूष क्रिकेट टीम या दोन्हींचा अंतिम सामना आहे. या दोन्ही टीम्सकडून गोल्ड मेडलची आशा आहे.
Hangzhou Asian Games: Indian women's Kabaddi team win Gold beating Taiwan 26-24.
100th overall medal and 25th Gold medal for India at the Asian Games. pic.twitter.com/WGMkFNym9j
— ANI (@ANI) October 7, 2023
भारताची २५ सुवर्णपदके...
भारताने आतापर्यंत नऊ खेळांमध्ये कमीत कमी एक सुवर्णपदक जिंकले आहे. यातील सर्वाधिक ७ सुवर्णपदके शूटिंगमध्ये मिळाली आहेत. तर, अॅथलेटिक्समध्ये ६ सुवर्णपदके मिळाली आहेत. आर्चेरीमध्ये ५ तर स्क्वाशमध्ये २ सुवर्णपदके मिळाली आहेत. यासोबतच टेनिस, हॉकी, कबड्डी, घोडेस्वारी आणि क्रिकेटमध्ये आतापर्यंत एक-एक सुवर्णपदक मिळाले आहे.