- गोलमाल : महेश पांचाळ
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरामध्ये दीपक शिवराम जैताळकर हे जीवनज्योती क्लिनिक नावाची पॅथॉलॉजी लॅब चालवतात. त्यांना काही महिन्यांपूर्वी आपल्या फेसबुकवर मारिया जोन्स या फेसबुक अकाऊंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आली आणि नंतर दोघांमध्ये ऑनलाइन चॅटिंग सुरू झाले. नाजेरियन नागरिक असल्याची माहिती देत मारिया जोन्स नावाच्या तरुणाने जैताळकर यांच्याशी मैत्रीचा हात पुढे केला.
भारत देश आणि इथल्या माणसांबद्दल आदर असल्याचे सांगत जैताळकर यांच्या भावनिक नाते निर्माण केले. दोघांमध्ये घनिष्ट मैत्री निर्माण झाली होती. त्या दोघांनी एकमेकांचे व्हॉट्सअॅप नंबर शेअर केले होते. नेहमी गप्पा गोष्टी चालायच्या. त्यानंतर मारियाने नायजेरियावरून एक गिफ्ट पाठवत असल्याचे त्यांना सांगितले. ब्रिटिश पाऊंड ६५ हजार रकमेचे हे गिफ्ट पाठवायचे असल्याने जैताळकरांचा पत्ता त्याने घेतला. दोन दिवसानंतर या पत्त्यांवरील पार्सल दिल्ली येथील एअरपोर्टवरून सोडवून घेण्यासाठी जैताळकर यांना कस्टम विभागातून कॉल आला. कस्टम विभागातून बोलत असल्याचे सांगून या व्यक्तीने इतर कागदपत्रे काढण्यासाठी जैताळकर यांना ठरावीक रक्कम भरण्यास सांगितले. एकदा नव्हे तर त्यांनी वेगवेगळ्या तारखेत रक्कम भरणा केली; परंतु १५ दिवस होउन गेल्यानंतरही त्यांना गिफ्ट मिळाले नाही. मात्र गिफ्टच्या नादात एकूण ६२ लाख रुपये देऊन आपण फसलो, याची जैताळकर यांना कल्पना आली. त्यानंतर त्यांनी १५ ऑगस्ट रोजी बुलढाणा सायबर क्राइम पोलीस ठाण्यात तक्रार केली. अज्ञात आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांनी सुरू केला. तांत्रिक पुरावे हाती लागल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांचे एक पथक आरोपींच्या शोधार्थ दिल्लीला पाठविण्यात आले. या पथकाने दिल्लीतून दोन नायजेरियन आरोपींना ताब्यात घेऊन बुलढाण्यात आणले. निजोस फ्रँक (वय वर्ष ३०), अलाई विन्सट (राहणार संत नगर बुरारी दिल्ली) या दोघा नायजेरीयन व्यक्तींना बुलढाणा सायबर क्राइम पोलिसांनी अटक केली. आरोपींविरुद्ध कलम ४२०, ४६५, ४६८, ४७०, ४७१ भारतीय दंड संहिता सह कलम ६६ क, ६६ ड महिती व तंत्रज्ञान अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. जैताळकर यांनी तब्बल १७ वेळा या व्यवहारामध्ये एकूण ६२ लाख ६९ हजार ७०० रुपये ट्रान्सफर केले होते. पोलिसांनी दोन्ही आरोपींची बँक खाती सील करून साडेचार लाख रूपये जप्त केले.
फेसबुक फ्रेंड असलेल्या व्यक्तींकडून एवढी मोठ्या प्रमणात फसवणूक होऊ शकते, या गुन्ह्यांवरून दिसून आले आहे. हा सर्वसामान्य व्यक्तींना मोठा धडा आहे. त्यामुळे अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. तंत्रज्ञान गतीने पुढे जात असताना, स्वत:ही अपडेट होण्याचा प्रयत्न करा. फेसबुकच्या माध्यमातून अनेक जाहिराती दिल्या जातात आणि ऑनलाइन खरेदीच्या ऑफर दिल्या जातात. ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, ग्राहक आणि नागरिकांनी अनोळखी मोबाइल कॉल उचलू नये तसेच ओटीपी नंबर शेअर करू नये, अशा सूचना सायबर विभागाकडून देण्यात आल्या आहेत.