
एक फूल आणि एक हाफ यांनी आम्हाला सांगू नये
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सणसणीत टीका
नवी दिल्ली : कोविड काळात मुख्यमंत्री असूनही घरी बसलेले उबाठाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री व महायुती सरकारवर अनेक आरोप केले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काही वेळातच उद्धव ठाकरे यांना खडे बोल सुनावले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी नवी दिल्ली येथे बोलावलेल्या सभेला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. यावेळेस माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी पलटवार करत उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोरोना काळात मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार त्यांच्या सरकारमध्ये झाला. नांदेडमधील प्रकार दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. पण, यात राजकारण केलं जात आहे ते आणखी दुर्दैवी आहे. ज्यांना मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याची सवय लागली आहे, त्यांच्याकडून आपण अधिक काही अपेक्षा करु शकत नाही, असं प्रत्युत्तर शिंदे यांनी दिलं आहे.
पुढे ते म्हणाले, कोरोना काळात डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले, तीनशे ग्रॅम खिचडीऐवजी १०० ग्रॅम देवून पैसे खाल्ले, ऑक्सिजन प्लांटमध्ये पैसे खाल्ले. हे बाहेर येत असल्याने लक्ष हटवण्यासाठी सीबीआयची मागणी केली आहे. ही मागणी चांगली आहे. यामध्ये कोरोना काळातील नक्की चौकशी होईल. औषधांची खरेदी चुकीच्या प्रकारे केली असेल तर त्याचीही चौकशी केली जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
असे मुख्यमंत्री जगाने पाहिले नाहीत
नांदेडच्या प्रकरणाची देखील चौकशी सरकार करत आहे. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, असं शिंदे म्हणाले. कोरोना काळात हे तोंडावर मास्क लावून घरात बसून फेसबुक लाईव्ह करत होते, आम्ही रस्त्यावर उतरुन काम करतो. पीपीई कीट वापरुन हॉस्पिटलमध्ये गेलो, तेव्हा हे लोक घरात बसले होते. अशा प्रकारचे मुख्यमंत्री जगाने पाहिले नाहीत, असं मुख्यमंत्री म्हणाले.
एक फूल आणि एक हाफ यांनी आम्हाला सांगू नये
ठाकरे घरात बसून पैसे मोजत बसले होते. कोरोना काळात त्यांचा खरा चेहरा समोर आला. मुंबई महापालिकेचे भ्रष्टाचाराचे पैसे कुठे गेले हे बाहेर येईल. नगरसेवक देखील घरात बसून काम करु शकत नाही. त्यामुळे घरात बसून काम करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये. उद्धव ठाकरेंच्या 'एक फूल दोन हाफ' या वक्तव्यावर शिंदे यांनी एक फूल आणि एक हाफ यांनी आम्हाला सांगू नये, अशा सणसणीत शब्दांत ठाकरेंना फटकारले.