
पुणे: पुण्याच्या चिंचवड ते आकुर्डी या रेल्वे रूळावरील घातपाताचा मोठा धोका टळला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानाने येथे होणारा मोठा अनर्थ टळला.
काही समाजकंटकांकडून या रेल्वे ट्रॅकवर मोठमोठे दगड ठेवण्यात आले होते. मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांनी अलर्ट होत हा प्रयत्न हाणून पाडला. रेल्वे प्रशासनाने हे दगड वेळीच हटवल्याने मोठा अपघात होण्यापासून रोखता आले.
रेल्वेचे कर्मचारी या रेल्वे ट्रॅकवर नेहमीची तपासणी करण्यासाठी आले होते. यावेळेस त्यांना रेल्वे ट्रॅकवर ठेवलेले मोठमोठे दगड दिसले. संध्याकाळी चार वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यांनी तातडीने ही बाब वरिष्ठांस सांगितली. दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने मोठा अनर्थ होण्यापासून रोखता आले.
काही दिवसांपूर्वी अशीच घटना वंदे भारत एक्सप्रेससोबत राजस्थानातील भिलवाडाजवळ घडली होती.या वंदे भारत एक्सप्रेस मार्गावरील रूळावर मोठमोठे दगड तसेच लोखंडी गज ठेवण्यात आले होते. याद्वारे अपघात घडवण्याचा मोठा कट होता. मात्र लोकोपायलटने वेळीच सतर्कता दाखवल्याने हा अनर्थ टळला.