
कल्याण स्थानकावर नेमकं काय घडलं?
कल्याण : आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःची काळजी घेणं विसरुनच जातो. रोज कामावर जायच्या घाईत असणारे लोक उशीर होऊ नये म्हणून कसेही धावत्या ट्रेनमध्ये चढताना दिसतात. तर संध्याकाळी घरी जातानासुद्धा ट्रेनमध्ये बसायला जागा मिळावी म्हणून पुन्हा जीवघेणा प्रवास सुरु होतो. पण असंच घाई करणं दोन प्रवाशांना चांगलंच महागात पडलं आहे. कल्याण स्थानकावर (Kalyan Station) धावती डेक्कन क्वीन एक्स्प्रेस (Deccan Express) पकडण्याच्या नादात दोघांचाही तोल गेल्याने एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर सध्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
डेक्कन क्वीन एक्स्प्रेस खरं तर कल्याण स्थानकावर थांबत नाही. तिथे फक्त तिचा वेग थोडा कमी होतो. यामुळेच काही लोक प्लॅटफॉर्मला थांबून ती धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतात. मात्र आज ही धावती ट्रेन पकडत असताना दोन ते तीन प्रवाशांचा पाय घसरला अशी इतर प्रवाशांची माहिती आहे.
ही घटना घडताच प्लॅटफॉर्मवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. मात्र, यात एकाचा मृत्यू झाला. दरम्यान, जखमीला रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. ही घटना स्थानकात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.