Sunday, August 10, 2025

अजित दादांचा दौरा दिंडोरीला पावणार का?

अजित दादांचा दौरा दिंडोरीला पावणार का?

निधी अभावी रखडली रस्त्यांची कामे अजित दादांच्या दौऱ्याने दिंडोरीच्या रस्त्यांचा वनवास संपणार का?


दिंडोरी (प्रतिनिधी) - महाराष्ट राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार हे शनिवार ७ऑक्टोबरला दिंडोरी तालुक्यातील काही ठिकाणी भेट देऊन पुढे कळवणकडे जाणार आहेत.


या दौऱ्यानिमित्त दिंडोरी तालुक्यातील मंजूर असलेल्या परंतु निधीअभावी रखडलेल्या रस्त्यांना निधी मिळणार का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.गेल्या युती शासन काळात रस्त्यांना पुरेसा निधी मिळाला नाही तर या शासनाचे पहिले दोन वर्षे कोरोनामुळे रस्त्यांना निधी मिळाला नाही.त्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे पाठपुराव्याने दिंडोरी तालुक्यातील विविध रस्त्यांची कामे मंजूर झाली.कामे सुरूही झाली. मात्र ठेकेदारांना बिले न मिळाल्याने अनेक कामे रखडली आहेत .


ठेकेदारांनी नाशिकला बिले मिळण्यासाठी आंदोलने केली.मात्र अद्यापही निधी वर्ग न झाल्याने बिले अदा झालेली नाहीत.पाऊस उघडताच रस्त्यांची कामे सुरू होतील अशी आश्वासने दिली जात असली तरी ठेकेदार बिले न मिळाल्याने कामे सुरू करण्याबाबत सांशकता व्यक्त होत आहे.त्यातच राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर काही कामांना स्थगिती मिळाली आहे.दिंडोरी तालुक्यातील रस्त्याची पूर्णपणे वाट लागली आहे.त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींवर जनतेचा रोष निर्माण होत आहे


राष्ट्रवादी काँग्रेससह अजित पवार सत्तेत सामील झाल्याने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीही त्यांना साथ दिल्याने प्रलंबित निधी मिळत रस्त्याचे कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा नागरिकांना आहे. गेल्या अर्थसंकल्पात मतदार संघात नरहरी झिरवाळ यांनी सुमारे २७०कोटींच्या विकासकामांना मजुरी मिळवली आहे.मात्र जुन्या कामांची बिले न मिळाल्याने नवीन कामे करायला कुणी ठेकेदार धजत नाही.उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार प्रथमच दिंडोरी तालुक्यात दौरा करत आहे.त्यामुळे दादांचा दौरा हा दिंडोरी तालुक्याला फलदायी होत प्रलंबित निधी वर्ग होत नवीन कामांना निधी मिळून तालुक्यातील रस्त्यांचा वनवास संपेल अशी अपेक्षा तालुकावासिय करत आहेत .



नाशिक कळवण रस्त्याचे चौपदरीकरण होणार का?


नाशिक कळवण हा रस्ता वणी गडावर जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी गुजरात राज्याला जोडणारा व शेतकरी व नागरिकांसाठी महत्वाचा आहे.हा एकमेव रस्ता जिल्ह्याला जोडणारा कमी रुंदीचा रस्ता आहे. त्यातच हा रस्ता खाजगी कंपनीला हायब्रीड अन्युटी प्रोग्राम अंतर्गत नूतनीकरण आणि २०३१ पर्यंतदेखभाल दुरुस्तीसाठी दिला आहे परंतु याचे पुरेसे रुंदीकरण झाले नसून वेळीच देखभाल दुरुस्तीही होत नाही. आज अजित पवार हे वाहनाने या रस्त्याने प्रवास करणार असून त्यांनाही या रस्त्याची दुरवस्था समजणार आहे, तरी सदर रस्ता चौपदरीकरण होण्यासाठी पवार यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा दिंडोरी कळवण वासियांनी व्यक्त केली आहे

Comments
Add Comment