
मेफेड्रोनची कंपनी सील, १३३ किलो एमडीसह २५० कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त; नाशिक पोलीस अनभिज्ञ
नाशिक : गेली अनेक दिवस दैनिक प्रहारने नाशिक शहराला मेफेड्रोन अर्थात एमडी या घातक नशेली पदार्थाचा विळखा पडला असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर देखील स्थानिक पोलीस स्थितीप्रज्ञच राहिले. तथापी हीच बाब मुंबई पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर मुंबईच्या साकी नाका पोलिसांनी नाशिकमध्ये एमडी तयार करणाऱ्या कंपनीवर छापा टाकून ती सील केल्याचे वृत्त आहे.
मुंबई पोलिसांनी ही कारवाई करताना अतिशय गुप्तता पाळल्याने छापा टाकून कंपनी सील करेपर्यंत कुणालाही थांगपत्ता लागू दिला नाही.
नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई झाली असून ही हद्द एम डीचे भांडार असल्याच्या आजवरच्या चर्चेला या कारवाईने दुजोरा मिळाला आहे. या कंपनीचा मालक केमिकल इंजिनिअर असल्याची चर्चा असून कारवाईबाबत मुंबई पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.
स्थानिक पोलिसांची कारवाई केवळ फार्स
शहरात एम.डी.चा प्रचंड वापर सुरु असल्याची माहिती दैनिक प्रहारसह अनेक माध्यमांनी आपल्या बातमीदारीतून, प्रसंगी वरिष्ठ अधिकाऱ्यांना खासगीत वारंवार दिली आहे. एम डीचे रॅकेट उध्वस्त करण्यासाठी काही समर्पित अधिकारी कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करून अँटी एम डी ड्राइव्ह करण्याचीही विनंती वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली आहे. मात्र तिकडे दुर्लक्ष करून येरे माझ्या मागल्या प्रमाणेच कारवाया सुरु असल्याने सारे परिश्रम वाया गेले. एका बाजूला हेल्मेट ड्राईव्ह सारखे उपक्रम राबविण्यासाठी जीवाचे रान करणारी यंत्रणा दुसऱ्या बाजूला नाशिकचा जीव घेणाऱ्या एम डी बाबत उदासीन दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
एम डी पेडलर ठरतात यमदूत
एम डी ही अतिशय घातक नशा आहे, तिच्या आहारी गेलेला व्यसनी अपवाद वगळता सरणावरच या नशेपासून फारकत घेतो. काही मानसोपचार तज्ज्ञ आणि वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासकांनी या एम डी विषयी दिलेली माहिती अशी की, एम डीची नशा केल्यानंतर कमालीची उत्तेजना मिळते. टोकाची एक्ससाईटमेन्ट कुठलेही पाऊल उचलण्याची उर्मी निर्माण करते. या नशेत कुठलीही गोष्ट अशक्य नाही असा मीथ्थ्या आत्मविश्वास निर्माण होतो. बिंबवला जातो. यातून अनेक अनैतिक, गुन्हेगारी कृत्य घडतात. कधी कधी उत्तेजना आत्महत्या करण्यास, एखाद्यावर हल्ला करण्यास प्रवृत्त करते.आणि जेंव्हा आर्थिक उणीव किंवा अन्य कुठल्याही करणाने एमडी उपलब्ध होत नाही तेंव्हा टोकाच्या नैराश्यातून आत्महत्या केली जाते. यापूर्वी अशी उदाहरणे घडली आहेत. नजिकच्या भविष्यातही असे प्रकार घडणारच नाहीत याची हमी देता येणार नाही. खरे तर गेल्या काही दिवसात नाशिक शहरात घडलेल्या काही गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना, आत्महत्या एमडीच्या व्यसनातून तर झाल्या नसतील ना? अशी शंका व्यक्त होत असल्याने त्या दृष्टीने चौकशीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अडीचशे कोटींहून अधिक मुद्देमाल
ही कारवाई साकी नाका पोलिसांनी केल्याचे अधिकृत वृत्त हाती आले असून दीडशे किलो एमडीसह अडीचशे कोटींहून अधिक मुद्देमाल असलेला टेम्पो मुंबईला नेला आहे. या कारवाईने नाशिकरोड पोलिसांच्या एकूण कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुणे पोलिसांनी कारवाई केलेल्या ललित पाटील याच्याशी संबंधित कंपनीचा कारभार त्याचा भाऊ पाहत असल्याचे समजते.